म्युच्युअल फंडांमधील 'एसआयपी' ही संकल्पना गुंतवणूकदारांमध्ये आता चांगलीच रुजली असून, आज महिन्याला साधारणपणे 7600 कोटी रुपये म्हणजेच वर्षाला 90,000 कोटी रुपये म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये गुंतविले जात आहेत. ही एक अतिशय समाधानाची गोष्ट आहे. कारण यामुळे गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते, जोखीम विभागली जाऊन त्यांचा गुंतवणुकीवरील परतावा वाढतो आणि परकी गुंतवणूकदारांची आपल्या शेअर बाजारावरील मक्तेदारी मोठ्या प्रमाणात कमी होते.
असे असले तरीही 'एसआयपी'संबंधी गुंतवणूकदारांच्या मनात आजही बरेच प्रश्न आहेत. काय आहेत ते प्रश्न आणि त्याची उत्तरे, थोडक्यात पाहूया,
1) 'एसआयपी' ही योजना आहे की गुंतवणूक पद्धत आहे?
- ही एक योजना नसून एक गुंतवणूक पद्धत आहे.
2) 'एसआयपी'चे किती प्रकार आहेत?
- 'एसआयपी'चे पुढील प्रकार आहेत.
अ) स्थिर 'एसआयपी' -
यामध्ये तुमची गुंतवणूक रक्कम बदलत नाही.
ब) लवचिक अर्थात फ्लेक्झिबल "एसआयपी'-
यामध्ये तुमची महिन्याची गुंतवणूक रक्कम स्थिर नसून, ती कमी किंवा जास्त होऊ शकते. समजा शेअर बाजारामध्ये अचानक तात्पुरती तेजी आली तर अशा वेळी फंड व्यवस्थापक तुमची "एसआयपी'ची रक्कम कमी करतो आणि बाजार जर खूप खाली घसरला तर ती रक्कम वाढवितो.
क) साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक "एसआयपी'-
तुम्ही तुमच्या सोयीनुसार "एसआयपी'ची पुनरावृत्ती अर्थात फ्रीक्वेन्सी ठरवू शकता. बाजारामध्ये रोज प्रचंड अस्थिरता, चढ-उतार असतील तर तुम्हाला साप्ताहिक "एसआयपी' फायदेशीर ठरू शकते; परंतु सर्वात जास्त लोकप्रिय प्रकार "मासिक एसआयपी' हाच आहे.
ड) 'टॉपअप एसआयपी' -
यामध्ये तुम्ही एका वर्षानंतर "एसआयपी' रकमेमध्ये आपोआप ठराविक वाढ करू शकता. जसे की, पहिल्या वर्षी तुमचा मासिक हप्ता 5000 रुपये आहे. तुम्हाला माहिती आहे, की दर वर्षी तुम्हाला पगारामध्ये कमीत कमी 10 टक्के वाढ मिळते, तर तुम्ही "एसआयपी' रक्कमसुद्धा दर वर्षी 10 टक्क्यांनी वाढविण्याच्या सूचना सुरवातीलाच देऊ शकता. पुढील वर्षी तुमच्या "एसआयपी'चा हप्ता असेल 5,500 रुपये. यामुळे तुमचे उद्दिष्टसुद्धा कमी कालावधीमध्ये साध्य होऊ शकते.
3) 'ई मॅंडेट' म्हणजे काय व ते का द्यावे लागते?
- 'ई मॅंडेट' अर्थात 'ईसीएस मॅंडेट' हा एक अर्ज तुमच्या बॅंकेकरीता असतो, ज्यायोगे तुमच्या सूचनेनुसार बॅंक ठराविक कालावधीनंतर नियमितपणे तुमच्या खात्यातून ठराविक पैसे दुसऱ्या (म्युच्युअल फंडाच्या) खात्यामध्ये जमा करतात. "एसआयपी' नियमितपणे म्युच्युअल फंड योजनेमध्ये होण्याकरीता हा फॉर्म आवश्यक असतो.
4) 'एक्स एसआयपी' म्हणजे काय?
- बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने "एसआयपी'द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जी पद्धत व फॉर्म्स सुरू केले आहेत त्याला "एक्स एसआयपी' असे म्हणतात.
5) 'आय एसआयपी' म्हणजे काय?
- ही एक ऑनलाइन "एसआयपी' करण्याची पद्धत आहे. ज्यामध्ये तुमच्याकडे नेट बॅंकिंग असणे आवश्यक आहे.
6) 'एसआयपी प्लस' काय आहे?
- काही ठराविक म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपी सुरू केली तर आयुर्विमा मोफत मिळतो, त्याला "एसआयपी प्लस' असेही म्हणतात.