आदित्य बिर्ला कॅपिटलने मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत 258.40 कोटी रुपयांचा भरघोस नफा नोंदवला आहे. कंपनीच्या नफ्यात दणदणीत 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत आदित्या बिर्ला कॅपिटलला 169.45 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 31 मार्च अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 25 टक्क्यांच्या वाढीसह एकूण 870.94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.
चौथ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वाढ होत ते 3,578.44 कोटी रुपयांवरून 4,730.80 कोटी रुपयांवर पोचले आहे. आदित्य बिर्ला कॅपिटल ही एक नॉन बॅकिंग फायनान्स कंपनी आहे. कंपनीने 352.70 कोटी रुपयांचा नफा करांपूर्वी मिळवला आहे. कंपनीच्या कर्ज वितरणाच्या व्यवसायात वर्षभरात 23 टक्क्यांची वाढ झाली आहे.
चलन तरलतेचे संकट असतानासुद्धा 11,000 कोटी रुपयांचे दिर्घकालीन भांडवल उभारण्यात कंपनीला यश आले आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या विमा व्यवसायातसुद्धा 30 टक्के वाढ होत तो 8,008 कोटी रुपयांवर पोचला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 2.65 लाख कोटी रुपये इतकी आहे.