मुंबई: आयसीआयसीआय लोम्बार्ड या भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बिगर-आयुर्विमा कंपनीने एक खास ‘कोविड-१९ संरक्षण योजना’ आणली आहे. ही पॉलिसी गटविमा स्वरूपात लाँच करण्यात आली आहे. या संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर, ही पॉलिसी कोविड-१९चे निदान ‘पॉझिटिव्ह’ आल्यास १०० टक्के इन्शुअर्ड रक्कम पॉलिसीधारकाला देईल. यात विमाधारकाला रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च आला की नाही हा निकष लावला जाणार नाही. आपल्या ‘निभाए वादें’ (वायदे पूर्ण करूया) या घोषवाक्याशी सुसंगती राखत ग्राहकांसाठी नवीन योजनांचा पाया उद्योगक्षेत्रात सर्वप्रथम घालण्याच्या प्रयत्नांतील पुढील पाऊल म्हणजे हे नवे उत्पादन होय.
पॉलिसीधारकाने कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त केंद्रात केलेली कोविड-१९ चाचणी पॉझिटिव आली, तर कंपनी त्याला इन्शुअर केलेली संपूर्ण रक्कम देईल. पॉलिसीच्या कालावधीतील कोविड-१९च्या पहिल्या निदानानंतर १४ दिवसांचा प्रारंभिक प्रतीक्षाकाल पार पडला की पॉलिसीधारकाला हे पैसे एकरकमी दिले जातील. या संरक्षणाची व्याप्ती भारताच्या भौगोलिक सीमांमध्ये असेल आणि ही पॉलिसी केवळ भारतीय नागरिकांपुरतीच मर्यादित आहे.
या आरोग्य संरक्षणाचा हप्ता परवडण्याजोगा म्हणजेच १४९ रुपयांचा आहे आणि इन्शुअर्ड रक्कम २५,००० रुपये आहे. यामध्ये आरोग्य सहाय्य आणि चॅट/व्हर्च्युअल सहाय्य, टेली-कन्सल्टेशन आणि रुग्णवाहिकेबाबतचे सहाय्य हे अतिरिक्त लाभ उत्पादनाचा भाग म्हणून दिले जाणार आहेत.
कोविड-१९ विमा संरक्षणाचा अनोखा लाभ १८ ते ७५ या वयोगटातील सर्व व्यक्तींना देण्यात येईल. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम वयोवृद्धांवर होत आहे असे म्हटले जात आहे. त्यांनाही विमा संरक्षण देऊ करण्यात आले आहे.
आयसीआयसीआय लोम्बार्डच्या अंडररायटिंग, दावे व पुनर्विमा विभागाचे प्रमुख संजय दत्ता नवीन कोविड-१९ संरक्षण उत्पादनाबद्दल म्हणाले, “करोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर, एक खास तयार केलेले विमा संरक्षण उत्पादन ही काळाची गरज होती. हे लक्षात घेऊन आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये आम्ही ग्राहकांच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी एक अनोखे उत्पादन आणले आहे. आमची कोविड-१९ संरक्षण विमा पॉलिसी करोना विषाणूची लागण झालेल्यांना आर्थिक मदत पुरवेल. आम्ही पहिल्या निदानानंतरच विमाधारकाला त्याने निवडलेली इन्शुअर्ड रक्कम एकरकमी देऊ. याशिवाय व्हर्च्युअर/चॅट आणि रुग्णवाहिका सहाय्यासारखे अतिरिक्त लाभही आहेत. सध्याच्या आव्हानात्मक काळात हे संरक्षण खूप महत्त्वाचे ठरणार आहे.”
या पॉलिसीचा कालावधी १ वर्षापुरता मर्यादित आहे आणि व्याप्ती भारताच्या भौगोलिक सीमांपुरती आहे. ३१ डिसेंबर २०१९ नंतर परदेशात कोठेही प्रवास केलेल्यांना हे विमा संरक्षण मिळणार नाही. तसेच इन्शुअर्ड व्यक्तीचे कोविड-१९च्या संशयावरून अलगीकरण (क्वारंटाइन) करण्यात आले असेल किंवा जोखीम निर्माण होण्यापूर्वीच (रिस्क इन्सेप्शन डेट) वा १४ दिवसांच्या प्रारंभिक प्रतिक्षाकाळात तिला तिला कोविड-१९ची लागण झाल्याचे निदान झाले असेल, तर तिला हे संरक्षण मिळणार नाही.