मानवी आयुष्याची किंमत किती, या प्रश्नाचे उत्तर अर्थातच "अमूल्य' असे दिले जाते आणि ते बरोबरही आहे. एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी भरून निघणे अशक्य; परंतु व्यक्तीच्या नसण्याने होणारे आर्थिक नुकसान आयुर्विमा अंशतः भरून काढू शकतो. "सर्वसाधारण' विम्याद्वारे नुकसान झालेल्या वस्तूची भरपाई करता येते; पण आयुर्विम्यात मात्र फक्त आर्थिक नुकसान भरपाई मिळते. आयुर्विम्याची गरज वेगवेगळ्या वयात बदलत जाते. व्यक्ती कमावती झाल्यावर आणि तिच्यावर कोणी अवलंबून असले तरच विमा आवश्यक असतो. मात्र, विमा घ्यायचा ठरल्यानंतर तो किती रकमेचा घ्यावा याबद्दल स्पष्टता असणे जरुरीचे आहे. कित्येक पॉलिसीधारक फक्त आपण वर्षाला किंवा महिन्याला किती हप्ता भरतो, ते सांगतात. पण किती रकमेचा विमा (म्हणजे जोखीम संरक्षण) उतरवला आहे, ते त्यांना माहीत नसते; किंबहुना त्याचा विचारही त्यांनी फारसा केलेला नसतो.
किती रकमेचे संरक्षण घ्यावे, यासंबंधी वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. एका पद्धतीत "मानवी जीवन मूल्य' (ह्यूमन लाइफ व्हॅल्यू) काढले जाते. यासाठी मिळवती व्यक्ती पुढील आयुष्यात किती उत्पन्न मिळवू शकणार आहे, याचा अंदाज घेतला जातो. थोडक्यात त्या व्यक्तीच्या जाण्याने नंतर किती उत्पन्न मिळू शकणार नाही, याची चाचपणी करून त्या व्यक्तीची उत्पन्न मिळवण्याची क्षमता काढून रक्कम ठरवण्यात येते. उदा ः एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न रु. दोन लाख आहे आणि त्यातील 70 टक्के रक्कम व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी खर्च होते. त्या व्यक्तीचे आजचे वय 30 वर्षे असेल आणि अजून 30 वर्षे ती व्यक्ती कमावती असेल, असे गृहीत धरून पुढील 30 वर्षात त्या व्यक्तीकडून मिळवली जाणारी रक्कम आजच्या घटकेला अंदाजे 20 लाख रुपये असेल. म्हणजेच आजचे 10 लाख रुपये गुंतवून पुढची 30 वर्षे दरवर्षी रु. 1 लाख 40 हजार एवढी रक्कम 6 व्याज दराने मिळू शकेल.
आवश्यक दृष्टिकोन
किती "विमा रक्कम' असावी, हे ठरवताना दुसऱ्या प्रकारेही विचार केला जातो. कमावत्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांची आर्थिक गरज किती आहे, याचा विचार केला जातो. यामध्ये सुरवातीला व नंतर त्यांची एकूण आर्थिक गरज किती राहील, याचा अंदाज घेतला जातो. या रकमेतून सध्या असलेल्या व नंतर उपलब्ध होऊ शकणारा निधी वजा करून उरलेली रक्कमही "विमा रक्कम' ठरू शकते. अवलंबून असलेल्या व्यक्तींना किती काळ या मदतीची गरज लागेल याचाही यात अंदाज घेणे जरुरीचे ठरते. जर पत्नी किंवा पती मिळवणारे असतील व मुलेही थोड्या काळात मिळवणारी होत असतील किंवा कामावर असलेल्या कंपनीतून काही आर्थिक मदत असेल, तर "विमा' रक्कम कमी होऊ शकते. हा अंदाज घेताना दर महिन्याचा खर्च किती आहे व त्यामध्ये दर वर्षी कसा बदल होईल, हे बघायला लागते. कारण "गरजा' या कमी-जास्त होत राहणार. मुख्यतः लहान मुले असतील आणि दुसरी व्यक्ती कमावणारी नसेल तर "विमा रक्कम' जास्त लागते.
कोणता मार्ग निवडावा?
"मानवी जीवनमूल्य' काढण्याच्या पद्धतीत व्यक्तीच्या भविष्यकाळातील एकूण उत्पन्नाचा विचार केला जातो. "विमा रक्कम' ठरवताना याचा फारसा उपयोग नाही. अवलंबून असणाऱ्यांच्या आर्थिक गरजा जास्तीत जास्त पूर्ण करणे, हा विम्याचा उद्देश असल्याने त्यांच्या आवश्यकतांचा विचार करून रक्कम ठरवावी. ही रक्कम ठरवताना, सध्या उपलब्ध असलेला व नंतर होऊ शकणारा (कंपनीच्या योजनांतून मिळणारी रक्कम) निधी यातून कमी करावा. म्हणजे 10 लाख रुपयांची गरज असेल व सध्या दोन लाख रुपये उपलब्ध असतील, तर एकूण गरज आठ लाख रुपये एवढी राहील. भविष्यकाळातील खर्चाच्या गरजेचा अंदाज करताना दर वर्षी वाढणारी महागाई विचारात घ्यावी लागेल.