मागील अंकात आपण "फायर' (फिनान्शियल इंडिपेन्डन्स, रिटायर अर्ली) या लाइफस्टाइल चळवळीबद्दल माहिती घेतली. या चळवळीची सुरुवात कशी झाली, त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या ठळक सवयी आणि गुण यावर ही नदर टाकली. लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळविणे हे प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीचे स्वप्न असले तरी या मार्गावर अनेक साप व शिड्यांचा सामना तिला करावा लागतो. पारंपरिक "साप-शिडी'च्या खेळाप्रमाणेच या मार्गावरील "साप' आपल्या आर्थिक अधोगतीला कारणीभूत होतात, तर "शिड्या' आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळवून देण्यास मदत करतात. अशा काही ठळक आर्थिक साप आणि शिड्यांवर नजर टाकणे सर्वांच्याच हिताचे ठरेल. प्रथम आर्थिक शिड्या समजून घेऊयात.
आर्थिक शिड्या ः
1) परिपूर्ण असा, आर्थिक नियोजनाचा आराखडा तज्ज्ञांच्या मदतीने बनवून घेणे.
2) प्रत्येक आर्थिक उद्दिष्टांसाठी एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत "एसआयपी' सुरू करणे.
3) कमाई सुरू होताच "एसआयपी' सुरू करणे व ही "एसआयपी' उत्पन्न वाढेल तसी वाढवीत नेणे.
4) आपल्या संपत्तीची वेगवेगळ्या ऍसेट क्लासमध्ये विभागणी करणे.
5) ही विभागणी करताना सुरक्षितता, तरलता व करपश्चात परतावा याचा विचार करणे.
6) आपल्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी पुरेसा वेळ देणे.
7) "चक्रवाढ व्याज' या जगातील "आठव्या आश्चर्या'चा पुरेपूर फायदा उठविणे.
8) पुरेसा "टर्म प्लॅन,' आरोग्य विमा आणि घातक आजारांसाठीचे कव्हर खरेदी करणे.
9) आपल्या 6 ते 12 महिन्यांच्या खर्चाएवढा "इमर्जन्सी फंड' तयार करणे.
10) आर्थिक विषयांवर सतत व भरपूर वाचन करून व कोर्सेस करून, आपले आर्थिक ज्ञान अद्ययावत ठेवणे.
आता आर्थिक समृद्धी व स्वातंत्र्याच्या मार्गावरील आपली संपत्ती गिळंकृत करण्यास टपलेल्या सापांवर आणि अजगरांवर नजर टाकूया.
1) अल्पावधीत दामदुप्पट करून देणाऱ्या "पॉझि' योजनांमध्ये पैसा गुंतविणे.
2) आपला सर्व पैसा "आगापीछा' माहीत नसलेल्या संस्थेत अथवा कंपनीत गुंतविणे.
3) फारसा परिचय नसलेल्या मित्रांना, नातेवाइकांच्या कर्जाला जामीन राहणे.
4) शेअरबाजाराचा अभ्यास न करता डे-ट्रेडिंग, पेनी स्टॉक्स वायदा बाजारात मोठे व्यवहार करणे.
5) महागडे मोबाईल फोन्स, कार्स, घरे, "ईएमआय'वर सतत खरेदी करणे.
6) "फॉरेन टुर्स,' "क्लब मेबरशिप' हॉटेलिंग, मॉल्स वर अनाठायी खर्च करणे.
7) महागाई विचारात न घेता, परंपरागत गुंतवणुकीवर भर देणे.
8) जास्ती प्रीमियम व कमी कव्हर देणाऱ्या विम्याच्या पॉलिसी खरेदी करणे.
9) आपल्या गुंतवणुकीच्या वाढीला पुरेसा वेळ न देता, मार्केट पडत असताना "एसआयपी' थांबविणे.
10) कर्जे आणि क्रेडिट कार्डाचा अयोग्य वापर करणे.
11) तज्ज्ञांची मदत न घेता सर्व व्यवहार स्वतःचे स्वतः करणे.
12) रिअल इस्टेटमध्ये नको इतकी गुंतवणूक करणे.
13) आपल्या मुलाच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, घरासाठी निवृत्तीचे पैसे वापरणे.
आपल्याला आर्थिक समृद्धी आणि स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळवायचे असेल, तर वरील आर्थिक शिड्यांचा चांगला उपयोग करून घ्या आणि आर्थिक सापापासून सावध राहा असे सुचवावेसे वाटते.