अर्थिक वर्ष २०१८-१९ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यास सुरुवात झाली असून ही प्रक्रिया काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. हे रिटर्न भरण्यात काही चुका झाल्यास रिफंड मिळण्यात अडचणी निर्माण होतात आणि आपला त्रास वाढतो. त्यामुळे प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी खालील गोष्टी टाळायला हव्यात.
रिटर्न भरण्यास विलंब नको
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे या मुदतीपर्यंत विवरणपत्र न भरल्यास किमान एक हजार ते कमाल दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
उत्पन्न मर्यादा तपासा
कोणत्याही व्यक्तीचे उत्पन्न आयकर विभागाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला टॅक्स रिटर्न भरावेच लागते. सामान्य करदात्यांसाठी ही सीमा २.५ लाख आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये तर अधिक वरिष्ठ नागरिकांसाठी ही सीमा ५ लाखपर्यंत आहे.
रिटर्न फाइल न करणे
मी जर करमर्यादेत येत नसेन, तर मी कशासाठी रिटर्न भरायचा अशी अनेकांची समजूत असते. असा विचार तुमच्या मनात येत असेल, तर तो प्रथम बाजूला सारा. रिटर्न न भरण्याची मोकळीक केवळ अशाच व्यक्तींना आहे ज्यांचे ढोबळ वार्षिक उत्पन्न (ग्रॉस इन्कम) बेसिक एक्झम्पशन मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे.
फॉर्म सिलेक्शन
कर भरणाऱ्यांपुढे नेमकी समस्या असते ती कोणता फॉर्म भरावा हीच. नोकरदार वर्गाला याबाबत योग्य ती माहिती नसल्याने चुकीचा फॉर्म भरण्याच्या घटना जास्त प्रमाणात होतात. मात्र आयटीआर १ हा फॉर्म भरणे गरजेचे असते. आपण जर उद्योगपती असाल तर तुम्हाला फॉर्म ३ किंवा फॉर्म ४ भरणे गरजेचे आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हे फॉर्मचे नंबर बदलले असल्याने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
लक्ष देऊन अर्ज न भरणे
जर तुम्ही ई-फायलिंग करीत असाल आणि त्यासाठी डिजिटल स्वाक्षरी आणि ई-व्हेरिफिकेशनचा पर्याय वापरत नसाल तर, तुम्हाला रिटर्नचे प्रिंट काढून बेंगळुरू येथे पाठवणे अनिवार्य आहे. बऱ्याचदा करदाते अॅक्नॉलेजमेंट पाठविणे विसरून जातात. त्यामुळे रिटर्न नाकारला जाण्याची शक्यता आहे. ऑनलाइन रिटर्न भरल्यानंतर चार महिन्यांच्या आत अॅक्नॉलेजमेंट बेंगळुरूला पाठविणे आवश्यक आहे. अॅक्नॉलेजमेंटचा अर्ज प्रामुख्याने साधारण पोस्ट अथवा स्पीड पोस्टने पाठविणे आवश्यक आहे.
फॉर्म १६ न घेणे
जर तुम्ही आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर, जुन्या कंपनीकडून फॉर्म १६ घेणे अत्यावश्यक आहे. जुन्या कंपनीमध्ये कार्यरत असताना करण्यात आलेली गुंतवणूक आणि पगार यांची माहिती नव्या कंपनीला न दिल्यास त्यांच्याकडून करकपातीमध्ये घट होण्याची शक्यता असते. मात्र, ही चलाखी लवकरच पकडली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी कापण्यात आलेल्या करावरील दंड व्याजासह तुमच्याकडून वसूल करण्यात येण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, प्राप्तिकर विभागाला २६ एएसच्या माध्यमातून तुमचे रिटर्न पडताळून पाहू शकते. २६एएसमध्ये तुमचा अॅडव्हान्स टॅक्स, मिळणारे व्याज, टीडीएस आणि अन्य उत्पन्नाच्या स्रोतांचे विवरण नमूद करण्यात आलेले असते.
व्याजाचा अनुल्लेख
१० पैकी जवळपास ६ करदात्यांना मुदत ठेवींवरील व्याज करमुक्त असते असे वाटते मात्र या ठेवी टॅक्सची रक्कम कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाचे विवरण रिटर्नमध्ये देणे अत्यावश्यक आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सीसी अन्वये मुदत ठेव करवजावटीसाठी मदत करते. कारण त्यावर मिळालेल्या व्याजावर कर देण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे मिळालेल्या व्याजाकडे दुर्लक्ष करू नका.
उत्पन्न एकत्र न दाखवणे
बरेच करदाते पत्नी आणि मुलांच्या नावे गुंतवणूक करतात. तुम्ही तुमच्या पत्नीला कितीही रक्कम भेट म्हणून देऊ शकता. मात्र, भेट म्हणून दिलेल्या रकमेची गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर कायदा कलम ६४ समोर येतो. त्यानुसार भेट देण्यात आलेल्या रकमेतून आर्थिक प्राप्ती झाल्यास ते तुमचे करपात्र उत्पन्न मानण्यात येईल. पत्नी नोकरी करते की नाही, याचा या कराशी काहीही संबंध राहत नाही.