मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 'ऍम्फी म्युच्युअल फंड समिट 2018'मध्ये अनेक नामवंत उपस्थित होते. या परिषदेत बोलताना त्यांनी देशातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या भविष्याविषयी सकारात्मक भावना व्यक्त केल्या. त्यातील निवडक नामवंतांचे मनोगत.
देशातील म्युच्युअल फंड उद्योग 50 लाख कोटींचा टप्पा गाठेल : एचडीएफसी'चे अध्यक्ष दीपक पारेख
येत्या पाच वर्षांत देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) 50 लाख कोटींचा टप्पा गाठेल, असे वाटते. लोकांची वाढती क्रयशक्ती, वाढत्या रोजगाराच्या संधी आणि गुंतवणुकीच्या आधुनिक साधनांमुळे म्युच्युअल फंडांकडे लोकांचा ओढा वाढत आहे. जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे असलेला कल बघता, भारतात अजूनही हे प्रमाण खूपच कमी आहे. भारतात म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे प्रमाण 'जीडीपी'च्या तुलनेत फक्त 11 टक्के आहे, तर जागतिक पातळीवर याचे प्रमाण सरासरी 62 टक्के इतके मोठे आहे. त्यामुळे भारतात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी अधिक वाव आहे. सध्या म्युच्युअल फंडांची मालमत्ता आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. मध्यमवर्गामध्ये म्युच्युअल फंडांबाबतच्या वाढत्या जागरूकतेमुळे यात आणखी नवे उच्चांक गाठले जातील.
निकोप स्पर्धेची आवश्यकता : सेबी'चे अध्यक्ष अजय त्यागी
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फक्त 'टॉप'च्या काही म्युच्युअल फंड कंपन्यांमध्येच एकवटत राहणे ही चिंतेची बाब आहे. सध्या म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेपैकी चार आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांकडे 50 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक एकवटलेली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड व्यवसायात निकोप स्पर्धा होण्याविषयीचे वातावरण निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये (एक्सेन्स रेशो) कपात करण्याचाही विचार 'सेबी' करीत आहे. काही निवडक म्युच्युअल फंडांना होत असलेला भरघोस नफा हा गुंतवणूकदारांकडून वसूल केल्या जाणाऱ्या जास्तीच्या "एक्सपेन्स रेशो'मुळे होतोय का, याचा देखील 'सेबी' अभ्यास करीत आहे.
प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी : 'ऍम्फी'चे अध्यक्ष ए. बालासुब्रमणियन
म्युच्युअल फंड व्यवसाय खासगी क्षेत्राला खुला होऊन आता 25 वर्षे झाली. या काळात म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणुकीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. लवकरच 25 लाखांचा टप्पादेखील पार केला जाईल. उत्पन्नाचा एक उत्तम पर्याय म्हणून सर्वसामान्य नागरिकांना म्युच्युअल फंडाकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी 'म्युच्युअल फंड सही है' यासारखे प्रभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच, 'ऍम्फी'च्या 'एमएफ युटिलिटी (एमएफयू)' या डिजिटल प्लॅटफॉर्मला प्रभावीपणे सक्रिय करण्यासाठी सर्व 'एएमसीं'चे सहकार्य घेण्यात येत आहे. 'एक्सपेन्स रेशो'बद्दल बोलायचे झाले, तर सध्याच्या कमिशन पद्धतीत कपात केल्यास ते म्युच्युअल फंड व्यवसायाला घातक ठरू शकते. कारण पीएमएस, एआयएफ आणि युलिप यासारख्या योजनांमधील कमिशन अधिक आकर्षक असल्याने एजंट्सना म्युच्युअल फंडाकडे वळविणे अवघड जात आहे.
(संकलन ः गौरव मुठे)