एसबीआय लाईफ इन्श्युरन्सला डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 389.77 कोटी रुपयांचा भरघोस निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात 47.5 टक्क्यांची घवघवीत वाढ झाली आहे. एसबीआय लाईफ इन्श्युरन्स ही स्टेट बॅंक ऑफ इंडियाची सहाय्यक कंपनी आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 264.28 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
एसबीआय लाईफ इन्श्युरन्सचे एकूण उत्पन्न 12,156.39 कोटी रुपयांवरून वाढून 15,779.05 कोटी रुपयांवर पोचले आहे. तिसऱ्या तिमाहीअखेर कंपनीच्या व्यवस्थापनाखाली असलेली एकूण मालमत्ता 1,34,150 कोटी रुपयांवरून वाढून 1,64,190 कोटी रुपयांवर पोचली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात कंपनीचा एकूण महसूल 38,167.93 कोटी रुपयांवर पोचला असून 891.52 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने या कालावधीत कमावला आहे. नवीन प्रिमियम व्यवसाय 35 टक्क्यांनी वाढून 12,790 कोटी रुपयांवर पोचला आहे.