आजच्या जगात ‘शेअरिंग’ सर्रास घडताना दिसते आणि सोशल मीडियाचे पेव फुटलेले असल्याने आपणही स्वाभाविकपणे त्यामध्ये सहभागी होतो. आपण सोशल मीडियामध्ये काही वैयक्तिक गोष्टी शेअर करतो. मात्र, आर्थिक तपशील देत असताना आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे आणि आपली संवेदनशील वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम पद्धती वापरायल्या पाहिजेत.
ग्राहकांसाठी आज अमर्याद माहिती उपलब्ध आहे – पासवर्ड सुरक्षित ठेवण्यापासून ते मालवेअर, हॅकर्स व अन्य धोक्यांपासून आपले डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यापर्यंत. अधिकाधिक ग्राहक मोबाइल बँकिंगचा अवलंब करू लागले असल्याने त्यामध्ये असलेले धोके व काळजी हेही समजून घेणे आवश्यक आहे.
तुमच्या आर्थिक व्यवहारांना असणारे धोके कमी करण्यासाठी आणि ऑनलाइन बँकिंग सुरक्षितपणे करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा टिप्स पुढे दिल्या आहेत -
1. तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा: विशिष्ट कालावधीसाठी तुमचा फोन वापरला नाही तर तो आपोआप लॉक होईल, याची खात्री करा. त्यासाठी सक्षम पासवर्ड ठेवा.
2. अॅपच्या बाबतीत काळजी घ्या: अॅप स्टोअरवरील अॅपमध्ये मालवेअर असण्याची शक्यता कमी असते आणि त्यांचे प्रामाणिकपणे मूल्यमापन केलेले असण्याची शक्यता असते. मालवेअर हे एक सॉफ्टवेअर असते. हे सॉफ्टवेअर तुमचा मोबाइल अनधिकृतपणे वापरू देईल अशा अॅपद्वारे तुमच्या मोबाइलमध्ये प्रवेश करू शकते. यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होतो. गुगल किंवा आयओएस अॅप स्टोअर अशा विश्वासार्ह ठिकाणावरूनच अॅप डाउनलोड करा आणि व्यवहार करण्यासाठी तुमच्या बँकेने तयार केलेल्या अधिकृत बँकिंग अॅपचा वापर करा.
3. तुमच्या पैशांचे संरक्षण करा: अनोळखी किंवा संशयास्पद ठिकाणाहून आलेल्या कोणत्याही लिंकवर जाऊ नका किंवा सूचना पाळू नका. मोबाइलवरून बँकिंग व खरेदी करत असताना साइट सुरक्षित असल्याची खात्री करा. ईमेलमधील हायपरलिंक टाळा.
4. संशय असेल तर प्रतिसाद देऊ नका: घोटाळेखोरे टेक्स्ट व कॉलिंग यामध्ये वाढ होत आहे. घोटाळेखोरांच्या ईमेलप्रमाणेच, वैयक्तिक माहिती विचारणारी विनंती किंवा तातडीने कृती करण्यासाठी केलेला कॉल जवळजवळ नेहमीच गैरव्यवहाराशी संबंधित असतो. तसेच, अनोळखी एंटिटीकडून आलेल्या आणि क्रेडिट कार्ड किंवा बँक अकाउंटचा तपशील, ऑनलाइन बँकिंग पासवर्ड अशी संवेदनशील आर्थिक माहिती विचारणाऱ्या ऑनलाइन ऑफर्स किंवा योजना यापासून कटाक्षाने दूर राहा. तुम्ही ऑनलाइन लॉटरी किंवा प्रमोशन यामध्ये मोठी रक्कम जिंकला आहात, असा दावा करणाऱ्या ईमेलना किंवा मेसेजना कधीही रिप्लाय करू नका.
5. पब्लिक वाय-फाय हॉट स्पॉट वापरू नका: तुम्ही व्यवहार कोठे आणि कसे करत आहात याकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी असुरक्षित वाय-फाय नेटवर्कमध्ये तुमचे डिव्हाइस वापरू नका. असुरक्षित वाय-फायला पासवर्डचे संरक्षण नसते आणि अशा खुल्या नेटवर्कच्या मदतीने तुम्ही केलेल्या व्यवहारांद्वारे घोटाळेखोरांना बँकिंगची माहिती मिळवता येऊ शकते.
6. एसएमस किंवा ईमेल याद्वारे वैयक्तिक माहिती पाठवू नका: बँक अकाउंट नंबर किंवा अन्य संवेदनशील आर्थिक तपशील कॉल, ई-मेल किंवा टेक्स्ट मेसेज याद्वारे पाठवू नका, कारण असे पाठवणे नेहमी सुरक्षित असेलच असे नाही. क्रेडिट कार्ड नंबर किंवा अकाउंटचा तपशील असी माहिती केवळ सुरक्षित वेबसाइट किंवा आयव्हीआर यामार्फतच पाठवा.
7. वैयक्तिक माहिती नियमित अपडेट करा: तुमच्या वैयक्तिक संपर्काच्या तपशिलामध्ये कोणताही बदल झाला तर त्याची माहिती बँकेला दिली जाईल, याची नेहमी दक्षता घ्या. यामुळे, तुमच्या बँक अकाउंटच्या बाबतीत कोणतीही घडामोड झाली तर तुम्हाला लगेचच कळवले जाईल.
8. तुमच्या बँक अकाउंटवर बारकाईने देखरेख ठेवा: ऑनलाइन बँकिंग करत असताना, तुमच्या बँक अकाउंटवर बारकाईने देखरेख ठेवणे आणि त्यामध्ये काहीही संशयास्पद आढळले तर बँकेला कळवणे, तसेच दर थोड्या दिवसांनी तुमचा ऑनलाइन बँकिंग पासवर्ड बदलणे अत्यंत गरजेचे आहे. विविध वेबसाइट व सिस्टीम यांसाठी विशेष असा पासवर्ड ठेवण्याचा प्रयत्न करा. याबरोबरच, सायबर कॅफेमधून किंवा शेअर्ड पीसीवरून तुमचे बँक अकाउंट वापरणे टाळा.
9. डेबिट कार्ड व पिन सुरक्षित ठेवा: समजा डेबिट कार्ड हरवले तर तातडीने बँकेला तसे सूचित करा. असे करण्यात विलंब झाला तर घोटाळा होण्याची शक्यता आणखी वाढते. बँका व बँकिंग पार्टनर तुम्हाला कधीही डेबिट कार्ड नंबर, एक्स्पायरी डेट, कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (सीव्हीव्ही), वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) किंवा पिन नंबर विचारत नाहीत, हे कायम लक्षात ठेवा. म्हणूनच, तुमची बँक, भारतीय रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर विभाग किंवा अन्य नियमनात्मक मंडळाकडून असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ही माहिती कधीही देऊ नका. एटीएम वापरत असताना अनोळखी व्यक्तीकडे कधीही मदत मागू नका आणि मर्चंट लोकेशन किंवा एटीएम येथे तुमचा पिन देत असताना किपॅड झाकलेले असेल, याची दक्षता घ्या.
10. नेहमी लॉग आउट करा: बॅलन्स पाहणे, अन्य खात्यात पैसे ट्रान्स्फर करणे किंवा बिले भरणे अशी कामे करून झाल्यावर अकाउंटमधून लॉग आउट व्हायला विसरू नका.
11. फिशिंगपासून सावधान: बँकिंगविषयीची महत्त्वाची व संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी घोटाळेखोर अनेकदा फिशिंग या तंत्राचा वापर करतात. हे तंत्र वापरत असताना, घोटाळेखोर लोकांना त्यांची वैयक्तिक माहिती द्यायला लावण्यासाठी ईमेल, टेक्स्ट मेसेज, फोन कॉल याद्वारे अधिकृत कंपनी असल्याचे भासवतात. एकदा ही माहिती मिळवली की घोटाळेखोर तिचा वापर तुमचे अकाउंट वापरण्यासाठी व पैसे चोरण्यासाठी करू शकतात. अनोळखी एंटिटींना कधीही प्रतिसाद देऊ नका आणि अपघाताने तुम्ही बँक अकाउंटचा तपशील दिला तर बँकेला तातडीने तसे कळवा. हे सर्व मुद्दे लक्षात ठेवले तर तुम्हाला स्मार्ट व सुरक्षित पद्धतीने बँकेचे व्यवहार करता येऊ शकतात. ही सोपी पथ्ये लक्षात ठेवून पाळली तर डिजिटल बँकिंगचा सुलभ व सुरळित अनुभव घेण्यासाठी मदत होईल.
सेफ बँकिंगसाठी शुभेच्छा!
कार्तिक जैन, कार्यकारी संचालक, डीबीएस बँक इंडिया