कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू केल्याने देशातील अनेक औद्योगिक क्षेत्रे प्रभावित झालेली आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. असे असले तरी औषधनिर्माण आणि हेल्थकेअर (आरोग्य सेवा) उद्योगाचा अत्यावश्यक सेवेत समावेश असल्याने इतर क्षेत्रांच्या तुलनेत या क्षेत्रांवर कमी परिणाम जाणवेल. सरकारने फार्मा क्षेत्राला नेहमीच्या पद्धतीने कार्यरत राहण्यास परवानगी दिली आहे. परिणामी पुरवठा साखळी वगळता इतर कामकाजावर फारसा परिणाम झालेला नसल्याने उद्योगांना संरक्षण मिळाले आहे. दुसरीकडे आरोग्य सेवा पुरविणारी हॉस्पिटल्स किंवा निदान केंद्रे मात्र लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी कर्मचाऱ्यांसहित कार्यरत आहेत.
कोविड १९च्या उपचारासाठी आवश्यक औषधांची मागणी वाढल्याने आणि ग्राहकांनी देखील विशिष्ट औषधांचा साठा केल्याने औषधनिर्माण उद्योगाला चालना मिळाली आहे. दुसरीकडे रुपयात घसरण होत असल्याने निर्यात केंद्रित कंपन्यांना देखील त्याचा फायदा होत आहे. विशेषतः डॉलर आणि युरोमध्ये व्यवहार करत असलेल्या कंपन्यांना त्याचा लाभ मिळत आहे. मात्र दुसरीकडे चलनातील घसरणीमुळे उदयोन्मुख बाजारपेठांकडे निर्यात होत असलेल्या कंपन्यांना मात्र त्याचा फटका बसणार आहे. लॉकडाउनमुळे जेनेरिक औषधांच्या किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा निर्यातीसाठी मोठा फायदा होणार आहे.
जेनेरिक औषध निर्यात कंपनीच्या व्यवसायात मागील काही तिमाहींमध्ये सरासरी ८ टक्क्यांची वाढ झाल्याने त्यांच्यावरील किंमतींचा दबाव कमी होण्याची शक्यता दीर्घकालीन पातळीवर दिसून येऊ येईल. अमेरिकेत लागणाऱ्या वैशीष्ट्यपूर्ण किंवा जटिल स्वरूपाच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केल्यास या उत्पादनांच्या मागणीत वाढ होऊ शकते. काही कंपन्यांना अगोदरच अशा प्रकारच्या उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत विक्रीला परवानगी मिळाली आहे. विशेषतः कोविड १९च्या पार्श्वभूमीवर चीनबरोबर असलेल्या विविध देशांच्या द्विपक्षीय व्यापारावर परिणाम होऊन त्याचा भारताला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आरोग्य सेवेवर केल्या जाणाऱ्या खर्चात देखील वाढ होण्याची जास्त शक्यता आहे. तसेच आवश्यकतेनुसार उत्पादन घेण्याऐवजी उत्पादनाच्या उपलब्धतेवर आणि सुरक्षिततेवर जास्त लक्ष केंदित होईल.
आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचा विचार करता, कोविड १९च्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये आरोग्याच्या काळजीबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे विमा संरक्षण किंवा इतर माध्यमातून आरोग्यावरील खर्चात वाढ होईल. त्याचबरोबर सरकारकडून खर्चात वाढ झाल्याने आणि टेस्टिंगवर खर्च अपेक्षित असल्याने त्याचा या क्षेत्राला मोठा फायदा होईल. दुसरीकडे लॉकडाउनच्या काळात अनेक असंघटित उद्योगांना आपला व्यवसाय गुंडाळण्याची वेळ ओढावल्याने या क्षेत्रातील संघटितता वाढीस लागेल. या काळात संघटित क्षेत्राला फायदे मिळत असल्याचे पाहून त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
एकंदरीतच औषधनिर्माण किंवा हेल्थकेअर क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या मागे पडल्या असून मागील काही तिमाहींपासूनच हे क्षेत्र आता सकारात्मक कल अनुभवत आहे. तसेच कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राकडे पाहण्याचा ग्राहकांचा दृष्टिकोन बदलला असल्याने त्याचा देखील मोठा फायदा भविष्यात दिसून येईल.
व्रिजेश कसेरा, फंड व्यवस्थापक, मिरे अॅसेट हेल्थकेअर फंड