मोठ्या वाढीनंतर शेअर बाजारात सुस्ती दिसत असून, अजून काही दिवस बाजार खाली-वर होत राहील. मागील काही महिन्यांच्या मोठ्या खरेदीनंतर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार नफावसुली करताना दिसत आहेत. चालू महिन्यात आतापर्यंत २२८४ कोटींची खरेदी केली असून, जून व जुलैच्या तुलनेत ही फार कमी आहे. परकी वित्तीय संस्था तर मागील अनेक महिन्यांपासून नफावसुली करीत आहेत. सध्या बाजाराच्या वाढीला बाधा आणणारे घटक प्रबळ असून, कच्च्या तेलाचे वाढणारे भाव आणि रुपयाचा घटणारा विनिमय दर हे मोठी चिंता वाढविणारे आहेत. कच्चे तेल ८० डॉलर प्रतिपिंप होण्याची शक्यता असून, दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा घटणारा दर ७३ रुपयांपर्यंत गेला आहे. यात अजून घट झाल्यास बाजार वेगाने खालच्या दिशेने जाण्याची शक्यता राहील. जर ‘निफ्टी’ ११,३५० अंशांखाली घसरला, तर ११,००० अंशांच्या दिशेने जाण्याची शक्यता राहील. ११,००० अंशांपर्यंत ‘करेक्शन’ गतीने झाल्यास बाजार स्थिर व वाढीत राहण्यास मदत होईल.
१०,००० अंशांपासून ‘निफ्टी’त वाढ होण्यास सुरवात झाल्यापासून आतापर्यंत १५०० अंशांची वाढ झाली आहे. या वाढीत केवळ पाच कंपन्यांनी ९४४.८ अंशांची भर टाकली आहे. ५० ते १०० अंशांची भर टाकणाऱ्या आठ कंपन्या असून, त्यांनी एकूण ५३५ अंशांची भर घातली आहे. १० ते ५० अंशांची भर टाकणाऱ्या १३ कंपन्या असून, त्यांनी एकूण २६० अंशांची भर टाकली आहे. या आकड्यांवरून आपल्या बाजारात सर्वांगीण वाढ झाली नसल्याचे दिसत असून, बाकी कंपन्यांनी अजून तेजीत सहभाग नोंदविलेला नाही.
तांत्रिक कल कसा राहील?
मागील शुक्रवारी ‘निफ्टी’ वायदा भाव ११,५३७ अंशांवर बंद झाला असून, या आठवड्यासाठी ११,३५० व ११,६८० अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. ११,६८० अंशांच्या वर ‘निफ्टी’ टिकल्यास बाजार पुन्हा सकारात्मक झाला, असे मानता येईल. परंतु, ११,६८० अंशांच्या वर ‘निफ्टी’ टिकण्याची शक्यता कमी आहे. ११,४६० अंशांखाली ‘निफ्टी’ घसरला तर पुन्हा ११,३५० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता राहील. या आठवड्यात बाजारात मोठी घसरण किंवा वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. ११,३५० ते ११,६८० अंश या पातळीदरम्यान ‘निफ्टी’ राहण्याची शक्यता आहे. परंतु, बाजारातील ‘करेक्शन’ अजून संपलेले नाही, असेच संकेत मिळत आहेत.
(डिस्क्लेमर - वाचकांनी शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन गुंतवणुकीचे निर्णय आपापल्या जबाबदारीवर आणि तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)