मागच्या सोमवारी "मिस-सेलिंग'चे बळी ठरला आहात का? या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर अनेकांचे फोन "सकाळ'कडे आले. काहींनी मेलवरून, तर काहींनी पत्ररूपाने आपले अनुभव कथन केले. गुंतवणुकीच्या बाजारपेठेत नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून विविध प्रकारच्या योजना चुकीच्या पद्धतीने गळ्यात मारल्या जातात. पण, कालांतराने अशा योजना आपल्यासाठी योग्य नाहीत, अशी जाणीव संबंधित गुंतवणूकदाराला होते.
आपले वय, उत्पन्न, जबाबदारी, आर्थिक उद्दिष्ट आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गरज, या पाच निकषांना डोळ्यांसमोर ठेवूनच गुंतवणुकीचा निर्णय घेतला पाहिजे, असे या क्षेत्रातील जाणकार नेहमी सांगत असतात. आपली गरज लक्षात न घेता; तसेच पुरेशी माहिती न घेता, केवळ कोणी तरी सांगितले म्हणून पैसे गुंतविणे म्हणजे अंधारात विहिरीत उडी मारल्यासारखे आहे, असे मागच्या वेळी म्हटले होते. त्याविषयीचे मार्गदर्शनपर लेख "सकाळ मनी'च्या माध्यमातून सातत्याने वाचकांसमोर मांडले जात असतात. गुंतवणूकदार जनजागृती हा त्याचा मूळ हेतू असतो. गुंतवणुकीचे निर्णय अधिक सजगपणे घेतले जावेत आणि आपली फसवणूक होऊ नये, ही त्यामागची भावना असते. आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत "मिस-सेलिंग' झालेले प्रॉडक्ट म्हणजेच योजना नाहीत ना, हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे. आपला हेतू आणि खरी गरज यांना साजेशा योजनेत गुंतवणूक केलेली नसेल, तर मूळ आर्थिक उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यामुळे याबाबत वेळीच सावध होण्याची गरज असते, कारण नंतर पश्चात्ताप करून उपयोग नसतो.
प्रश्न अत्यंत गंभीर
गुंतवणुकीच्या क्षेत्रात "मिस-सेलिंग' हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले.
बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच, असे नाही. म्हणूनच त्यांच्या बाबतीत "मिस-सेलिंग'च्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. हीच बाब लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने याबाबत "सावधानतेची घंटा' वाजविण्याचे ठरविले आहे. आपण ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी "हेल्थ चेक-अप' करतो, त्याच धर्तीवर कधी "वेल्थ चेक-अप' करता येईल का? विचार करून बघा, ही गोष्टही किती महत्त्वाची आहे ती!
कोण करेल मार्गदर्शन?
सामाजिक गरज लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्याचे ठरविले असून, त्याअंतर्गत "सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर' (अर्थात "सीएफपी') असलेली तज्ज्ञ मंडळी (थोडक्यात "वेल्थ डॉक्टर') आपल्याला आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच गुंतवणुकीबाबतच्या शंकांबद्दल मार्गदर्शन करू शकतील. ज्या "सीएफपीं'ना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी 9322663255 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ज्या गुंतवणूकदारांना मार्गदर्शन हवे असेल, त्यांनी 7350873508 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करावी.
"सकाळ मनी'चा हा उपक्रम प्रथम पुण्यात लवकरच घेण्यात येणार असून, त्याची तारीख, वेळ, स्थळ आदी तपशील योग्यवेळी जाहीर केले जातील. तोपर्यंत थोडी प्रतीक्षा करा...