प्रश्न: बॅंकेमध्ये अनेकवेळा वेगवेगळ्या फॉर्म्सवर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. काही वेळेस "धीस इज अ पार्ट ऑफ फॉर्म नं.....' म्हणून कोऱ्या स्टॅंम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. यामुळे पुरेशा माहितीअभावी केलेली सही ही अवैध ठरते का?
उत्तर: कर्जदार अथवा जामीनदार कोणत्याही कागदपत्रांवरील मजकूर संपूर्ण न वाचताच अनेक कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या करीत असतो. अशावेळी बॅंकेवर असलेला विश्वास हेच त्यामागील एकमेव कारण असते. आपण नमूद केल्याप्रमाणे अपुऱ्या माहितीअभावी केलेली स्वाक्षरी ही अवैध ठरविणे जरी आवश्यक असले तरी आपण त्या कागदपत्रांवर केलेली सही ही पूर्णतः समजून-उमजून केलेली आहे, असेच कायदा समजतो. त्यामुळे आपण स्वाक्षरी करीत असलेल्या कागदपत्रांवरील सर्व मजकुराचे वाचन करून, त्याचा अर्थ समजावून घेऊनच आपण स्वाक्षरी करणे कायद्यास अपेक्षित आहे. त्यामुळे अज्ञान व्यक्तींच्या अंगठ्याची निशाणी घेताना त्यासोबत सज्ञान व्यक्तीची सही ही दस्तूर म्हणून घेतली जाते. येथे दस्तूर म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या सज्ञान व्यक्तीचे काम साक्षीदारांचे नसून, संबंधित फॉर्मवर लिहिलेला सर्व मजकूर वाचून तो अज्ञान व्यक्तीस समजावून सांगण्याचे असते. येथे सज्ञान व्यक्ती म्हणजे संबंधित फॉर्मवरील भाषा ज्या व्यक्तीस वाचता येते, ती व्यक्ती होय. उदा. जर संबंधित फॉर्म हा इंग्रजी भाषेमध्ये असेल तर केवळ मराठी अर्थ भाषा लिहिता-वाचता येणारी व्यक्ती ही इंग्रजी भाषेसाठी अज्ञान समजली जाईल. कायद्याच्या याच तत्त्वानुसार जसे कायदा माहिती नसणे, ही बाब कायदा न पाळण्याचे कारण होऊ शकत नाही, तसेच न वाचताच केलेली सही ही संबंधित फॉर्मवरील नियमातून सूट मिळविण्यासाठी सबब ठरू शकणार नाही. यामुळे ज्या वेळी तुम्ही एखाद्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी करीत असाल व त्या स्टॅम्पवर, "धीस इज अ पार्ट ऑफ फॉर्म नं.....' असे नमूद केलेले असेल, तेव्हा संबंधित फॉर्म वाचूनच आपण स्वाक्षरी करणे कायद्यास अपेक्षित असून, आपण सही केली म्हणजे आपण पूर्ण समजून-उमजून सही केली, असा अर्थ होतो.
कर्ज वितरित होत असताना आपण स्वाक्षरी केलेल्या प्रत्येक कागदपत्रांची बॅंकेच्या अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली प्रत कर्जदार व जामीनदारांनी मागणी करणे आवश्यक आहे. त्यांचा तो कायदेशीर अधिकारच आहे. याबाबत रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना तसे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. छापील करारनाम्यांवर स्वाक्षरी करताना, त्यामधील रिकाम्या जागा पूर्णपणे भरलेल्या आहेत, याची खात्री करूनच स्वाक्षऱ्या करणे अथवा स्वाक्षऱ्या घेणे, हे कर्जदार, जामीनदार आणि बॅंक या दोहोंच्या हिताचे असते; अन्यथा मोकळ्या जागेत बॅंक आपल्या मनाप्रमाणे मजकूर टाकू शकते. तसेच, मी स्वाक्षरी केल्यानंतर बॅंकेने मोकळ्या जागेतील मजकूर टाकल्याने तो "आफ्टर थॉट' आहे म्हणून तो आम्हांस मान्य नाही, असे कर्जदार किंवा जामीनदार वसुलीच्या दाव्यात म्हणू शकतात. सबब मोकळ्या जागेतील मजकुराच्या बाजूला संबंधितांची स्वाक्षरी आवश्यक ठरते. कार फायनान्सच्या प्रकरणात, करारनाम्याच्या पुस्तकात कर्जदाराच्या अनेक स्वाक्षऱ्या घेतल्या जातात, त्यामध्ये आपली व्यक्तिगत माहिती इतर संस्थांना विकण्यास आपली संमतीदेखील घेतलेली असते. त्यामुळे आपला कर्ज मागणी अर्ज संपूर्ण भरण्यापासून इतर सर्व कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यातील मजकूर समजून घेणे महत्त्वाचे आहे; किंबहुना स्वाक्षरी करण्याचे करारनामे एक दिवस अगोदर बॅंकेकडून मागवून घेणे व त्याचे व्यवस्थित वाचन केल्यानंतरच त्यावर स्वाक्षऱ्या करणे कधीही हितावह ठरते. यामुळे जसे आपल्या जबाबदारीची जाणीव होते, तसेच आपल्या अधिकारांचीही माहिती कर्जदार आणि जामीनदारांना होणे अपेक्षित आहे.