कोण ठरला "हीरो'?
सरत्या वर्षात परताव्याच्या "बॉक्स ऑफिस'वर "पीपीएफ' हा "हीरो' ठरला. सोने आणि शेअर्सचा नंबर नंतर लागला. सरासरी महागाई (4.74 टक्के) विचारात घेता, पीपीएफ व सोन्याने महागाईपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला. परंतु केवळ एका वर्षाच्या परताव्यावरून आपल्या गुंतवणुकीची विभागणी बदलत राहणे हे सर्वस्वी चुकीचे व घातक ठरू शकते. अल्पकालीन यशावर विसंबून त्याचे अनुकरण करण्यापेक्षा "लंबी रेस का घोडा' शोधला पाहिजे.
जुने वर्ष सरले आणि नवे वर्ष सुरू झाले, की विश्लेषक आणि गुंतवणूकदार मंडळी वेगवेगळ्या गुंतवणुकींवर गेल्या वर्षात किती परतावा (रिटर्न्स) मिळाला, याचा शोध सुरू करतात. गेल्या वर्षी ज्या गुंतवणूक प्रकाराने सर्वाधिक परतावा दिला, त्या प्रकारात नव्याने गुंतवणूक करण्याचा किंवा असलेली गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न सर्वसामान्य गुंतवणूकदार करीत असतो. अधिकाधिक परतावा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे नाही, परंतु केवळ एका वर्षाच्या परताव्यावरून आपल्या गुंतवणुकीची विभागणी बदलत राहणे हे सर्वस्वी चुकीचे व घातक ठरू शकते.
खालील उदाहरणांवरून ही गोष्ट समजून घेऊया.
पब्लिक प्रॉव्हिडंड फंड (पीपीएफ) ही सर्वसामान्यांची अतिशय आवडती गुंतवणूक. 15 वर्षे मुदतीच्या या योजनेत रु. 1.50 लाखाच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळते, त्यावर मिळणारे व्याज (सध्या 8 टक्के) करमुक्त असते आणि मुदतपूर्तीच्या वेळी मिळणारी रक्कमही करमुक्त असते. मुद्दल सुरक्षित ठेवून, खात्रीशीर परतावा आणि करबचत करणारी ही योजना खूपच लोकप्रिय आहे. या खात्याची मुदत 5-5 वर्षांनी वाढविताही येते. 2017 मध्ये या योजनेने सरासरी 7.875 टक्के परतावा दिला होता; जो सोने आणि शेअर्सच्या तुलनेत सर्वांत कमी होता. परंतु 2018 मध्ये "पीपीएफ'वर गुंतवणूकदारांना सरासरी 7.7 टक्के परतावा मिळाला; जो सोने आणि शेअर्सच्या तुलनेत सर्वाधिक होता! थोडक्यात, सरत्या वर्षात परताव्याच्या "बॉक्स ऑफिस'वर "पीपीएफ' हा "हीरो' ठरला. सर्वसामान्यांचा, विशेषतः महिलांचा आवडता गुंतवणूक प्रकार म्हणजे सोने! 2017 मध्ये सोन्याने सुमारे 12.5 टक्के परतावा दिला, जो 2018 मध्ये 6.93 टक्क्यांवर घसरला. 2018 मधील सरासरी महागाई (4.74 टक्के) विचारात घेता, पीपीएफ व सोन्याने महागाईपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला. आता आपण शेअर बाजाराच्या परताव्याचा विचार करूया. 2017 हे वर्ष शेअर बाजारासाठी खूपच चांगले वर्ष होते. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या "निफ्टी' या निर्देशांकात देशातील 50 प्रमुख कंपन्यांचा समावेश करण्यात येतो. या निर्देशांकाने 2017 मध्ये सुमारे 29 टक्के परतावा दिला, जो 2018 मध्ये 4.08 टक्क्यांपर्यंत घसरला. हा परतावा महागाईच्या दरापेक्षासुद्धा कमी होता!
शेअर बाजारात मध्यम आकाराच्या कंपन्यांना "मिड कॅप असे म्हणतात. राष्ट्रीय शेअर बाजाराचा "मिड कॅप 100' हा निर्देशांक अशा कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. 2017 मध्ये या निर्देशांकाने 49 टक्के परतावा दिला होता, जो 2018 मध्ये घसरून (-) 16 टक्के इतका झाला! तीच परिस्थिती छोट्या आकाराच्या कंपन्यांची झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या "स्मॉलकॅप 100' या निर्देशांकाने 2017 मध्ये सर्वाधिक म्हणजे 56 टक्के परतावा दिला होता, जो 2018 मध्ये (-) 30 टक्क्यांपर्यंत कोसळला.
वरील ठळक उदाहरणांवरून हे लक्षात येईल, की वार्षिक सर्वाधिक परताव्याचा पाठलाग करीत, आपल्या गुंतवणुकीची विभागणी (ऍसेट ऍलोकेशन) सतत बदलत राहणे, हे मृगजळाचा पाठलाग करण्यासारखे आहे. थोडक्यात, जो सध्या लोकप्रिय "हीरो' असतो, त्याचेच अनुकरण लोक करताना दिसतात; पण अल्पकालीन यशावर विसंबून त्याचे अनुकरण करण्यापेक्षा "लंबी रेस का घोडा' शोधला पाहिजे. सुज्ञ गुंतवणूकदारांनी आर्थिक सल्लागाराच्या मदतीने, सुरक्षितता, तरलता आणि करपश्चात परतावा हे तीन निकष लावून, आपली गुंतवणूक विविध प्रकारांत विभागून ठेवावी व त्यात वारंवार बदल करू नयेत, असे सुचवावेसे वाटते.
2018 मधील आकडेवारी पीपीएफ ः 7.7 टक्के सोने ः 6.93 टक्के शेअर्स ः 2.69 टक्के (महागाई दर ः 4.74 टक्के)