एकाच वेळी सर्व "ऍसेट क्लास' तेजीत राहात नाहीत, त्यामुळे
गुंतवणुकीचा चांगला पोर्टफोलिओ बनविण्यासाठी इक्विटी, डेट, सोने आणि रिअल इस्टेट या
चारही ऍसेट क्लासचे योग्य प्रमाणात मिश्रण असायला हवे, असे मत एडलवाईज पर्सनल
वेल्थ ऍडव्हायझरीचे प्रमुख राहुल जैन यांनी "सकाळ मनी'शी बोलताना व्यक्त केले.
त्यांच्याशी झालेली बातचित.
प्रश्न ः
वैयक्तिक संपत्ती व्यवस्थापनाचे काम आज व्यावसायिक पद्धतीने हाताळले जात आहे.
त्याचे महत्त्वही वाढताना दिसत आहे. याकडे तुम्ही कसे पाहता?
जैन ः वैयक्तिक
संपत्ती व्यवस्थापन ही आता काळाची गरज झाली असून, प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याकडे
गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. ही फक्त श्रीमंतांनीच करायची बाब नसून, छोट्या
स्वरूपात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच आपल्या गुंतवणुकीचे योग्य व्यवस्थापन करणे
गरजेचे आहे. विम्याबरोबरच गुंतवणुकीच्या विविध प्रकारांचा समावेश करून योग्य
पोर्टफोलिओ तयार करणे, ही महत्त्वाची बाब असते.
प्रश्न ः तुमच्या मते, योग्य
पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे?
जैन ः ही बाब व्यक्तीनुसार बदलती असते. आपले वय,
उत्पन्न, गरजा, उद्दिष्ट आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन तज्ज्ञ
सल्लागाराच्या मदतीने योग्य असा पोर्टफोलिओ बनविता येऊ शकतो. असे केले तरच ते खऱ्या
अर्थाने आर्थिक नियोजन ठरते. आयुर्विमा, आरोग्य विमा आणि अपघात विमा पुरेसा
घेतल्यानंतर गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरते. इक्विटी म्हणजे शेअर्स किंवा
म्युच्युअल फंड, डेट म्हणजे बॅंक एफडी, बॉंड्स, एनसीडी, सोने आणि रिअल इस्टेट अशा
वेगवेगळ्या ऍसेट क्लासच्या मिश्रणातून चांगला पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो.
प्रश्न ः गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ बनविताना सर्वाधिक महत्त्व कशाला द्यायला
हवे?
जैन ः "ऍसेट ऍलोकेशन' ही यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. फक्त एकाच
गुंतवणूक प्रकारावर अवलंबून न राहता, योग्य पद्धतीने वेगवेगळ्या गुंतवणूक
प्रकारांचा वापर करीत चांगला, वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे आवश्यक असते.
एकाच ऍसेट क्लासमध्ये सर्व गुंतवणूक करून कधीही टोक गाठू नये. कारण एकाच वेळी सर्व
"ऍसेट क्लास' चालत नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे आपला पोर्टफोलिओ
"डायव्हर्सिफाईड' राहील, याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे.
प्रश्न ः आगामी
5-7 वर्षांचा काळ डोळ्यांसमोर ठेवला तर कोणता "ऍसेट क्लास' चांगली कामगिरी करेल,
असे आपल्याला वाटते?
जैन ः आमच्या अंदाजानुसार आगामी काही वर्षांत "इक्विटी'
हाच ऍसेट क्लास चांगला परतावा देऊ शकेल, असे वाटते. विशेषतः म्युच्युअल फंडाच्या
माध्यमातून इक्विटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे.
म्युच्युअल फंडात "एसआयपी'च्या माध्यमातून गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरेल.
अस्थिरतेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक "हेज' म्हणून उपयोगी ठरते, त्यामुळे पुढच्या
एक वर्षात सोन्यातील गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकेल, असे मला वाटते. गुंतवणुकीच्या
जोडीने आता "प्रोटेक्शन'लाही महत्त्व येऊ लागले आहे, त्यामुळे विम्याच्या
बाजारपेठेत वाढ होताना दिसेल.
प्रश्न ः अलीकडच्या काही महिन्यांत शेअर बाजारात
मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसत आहे. पुढचे वर्ष या बाजारासाठी कसे असेल, असे
तुम्हाला वाटते?
जैन ः येत्या काही वर्षांत भारतात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात
वाढत जाणार असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा फारसा नकारात्मक परिणाम
यावर होणार नाही. पुढील तीन- सहा महिने बाजारात अशीच अस्थिरता राहील. मात्र,
घसरणीला मर्यादा असेल. त्यामुळे दीर्घकाळाचा विचार करून या बाजारात गुंतवणूक
केल्यास लाभदायक ठरू शकेल.
प्रश्न ः आगामी काळात कोणत्या उद्योगक्षेत्रात चलती
दिसू शकेल, असा तुमचा अंदाज आहे?
जैन ः भारतातील "कन्झम्प्शन स्टोरी' भक्कम
असल्याने कन्झम्प्शन सेक्टरबरोबरच कॅपिटल गुड्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि
प्रायव्हेट बॅंकिंग क्षेत्राला आगामी काळात "अच्छे दिन' दिसू शकतील, असा अंदाज आहे.