सध्या गुंतवणूक करण्याचा व कर्ज घेण्याचा नवीन प्रकार चर्चेत आहे. तो म्हणजे "पीअर टू पीअर लेंडिंग'चा (पीटूपी). "पीटूपी लेंडिंग' बाबत चर्चा होताना दिसते मात्र हा नेमका काय प्रकार आहे याची कल्पना बहुतेकांना नसल्याचे दिसून येते आणि म्हणून "पीटूपी लेंडिंग' नेमकी काय संकल्पना आहे ते समजून घेऊ.
पीटूपी लेंडिंग हा "क्लाउड फंडिंग'चा प्रकार आहे. ज्या गुंतवणूकदाराकडे गुंतवणूक करण्यासाठी "सरप्लस' रक्कम आहे व जास्त "रिटर्न' मिळविण्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे असा गुंतवणूकदार आपली रक्कम "पीटूपी लेंडिंग' सुविधा देऊ करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या "एस्क्रो अकाउंट'वर जमा करतो व ज्याला त्वरित व विनासायास कर्ज हवे असते अशी व्यक्ती आपली कर्ज मागणी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन पद्धतीने करीत असते.
कर्ज मागणी करणाऱ्या व्यक्तीची माहिती व क्रेडिट स्कोअर यांसारखी आवश्यक ती माहिती प्लॅटफॉर्ममार्फत मिळविली जाते व ज्या व्यक्तीने "एस्क्रो अकाउंट'वर रक्कम जमा केली आहे अशा व्यक्तीस "ई-मेल', "एसएमएस'मार्फत दिली जाते व सोबतच मिळू शकणारे व्याज व जोखीम याबाबत माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे कर्जदाराला कर्ज द्यायचे अथवा नाही याबाबत गुंतवणूकदाराने निर्णय पीटूपी प्लॅटफॉर्मवर कळवायचा असतो. गुंतवणूकदार करीत असलेल्या व्यवहाराची संपूर्ण खरी माहिती दिली जाते. कोणाकोणाला तुमची रक्कम कर्जाऊ दिलेली आहे, ती व्यक्ती कोण आहे व कशासाठी कर्ज घेतले आहे, कर्जाऊ दिलेल्या रकमेवर किती दराने व्याज मिळणार आहे, किती रक्कम परत आली, किती व्याज मिळाले, किती रक्कम येणे बाकी आहे, हा सर्व माहिती उपलब्ध दिली जाते. अशा रीतीने ज्याच्याकडे "सरप्लस' रक्कम आहे असा गुंतवणूकदार थेट कर्जदारास कर्ज देतो व या दोघांना जोडण्याचे काम "पीटूपी लेंडिंग' प्लॅटफॉर्ममार्फत होते. या मोबदल्यात काही शुल्क दोघांकडून आकारले जाते.
"पीटूपी लेंडिंग' ही तसी नवीन संकल्पना आहे असे असले तरी अल्पावधीत या प्रकारच्या पर्यायाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
"पीटूपी' प्रणालीची वैशिष्ट्ये ः
- किमान गुंतवणूक रु. 5000, तर कमाल गुंतवणूक रु. 50 लाख
- कर्जाची मुदत किमान 6 महिने व कमाल 36 महिने इतकी असते.
कर्जदाराला मिळणारे कर्ज अनेक गुंतवणूकदारांकडून दिले जाते. कारण एक गुंतवणूकदार कर्ज रकमेच्या 20 टक्क्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 50 हजार इतकीच रक्कम कर्ज म्हणून देऊ शकतो. तसेच 20 टक्के दिलेच पाहिजे असे नाही अगदी पाचशे रुपयांचे कर्जदेखील देऊ शकतो यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम खूप कमी होते. शिवाय गुंतवणूकदार ठराविक सिबिलस्कोअरच्या खाली कर्ज न देण्याचा पर्याय निवडू शकतो. रिझर्व्ह बॅंकेने 11 कंपन्याना "पीटूपी' व्यवसाय सुरू करण्यास मान्यता दिली आहे.