रश्मी भामरे या 'इन्व्हेस्टेड ऑर रॅट रेस ट्रॅपड' या अॅमेझॉन वरील बेस्ट सेलर बुकच्या लेखिका आहेत.
मला खाञी आहे की आपल्यापेकी कोणीच अशी परिस्थिती अनूभवलेली नाही. नुसते आपले शहर, राज्य किंवा देशच नाहीतर संपूर्ण जगच शब्दश: ठप्प झाले आहे. नेहमी गर्दीने गजबजलेले रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. सर्वानी स्वत:लाच चार भिंतीच्या आत कोंडून घेतले आहे. प्रत्येकाच्याच मनात भीती आणि नेहमीचे आयुष्य केंव्हा पूर्वपदावर येईल याबद्दल साशंकता आहे.
संपूर्ण जनजीवन ठप्प झाल्याने नोकऱ्या, व्यवसाय, कारखाने आणि पर्यायाने संपूर्ण आर्थिक घडामोडींवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. वैयक्तिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक पातळीवर पैशाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. परिणामी या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दैनंदिन आर्थिक पातळीवर आणि एकंदरीतच आर्थिक नियोजनावर काय परिणाम होईल या काळजीत सर्वजण आहेत.
दुसरीकडे शेअर बाजारात देखील मोठी पडझड झाली आहे. ज्यांनी मागील ४ -५ वर्षात शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे त्यांच्या गुंतवणूक मूल्यात कमीत कमी २० ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक घट आली आहे. मात्र ही घट वास्तविक / रोखीच्या स्वरूपातील नसून आभासी किंवा काल्पनिक अशा स्वरूपातील आहे. मात्र जर घाबरून जाऊन तुम्ही / गुंतवणूकदारांनी खरोखर शेअर विक्री केली तर मात्र त्याचा रोखीच्या स्वरूपात किंवा वास्तविक स्वरूपात फटका बसू शकतो. दुसरीकडे आहे त्या परिस्थितीत शेअर विक्री करून भांडवल वसूल करण्यावर आणि शेअर बाजार आणखी खाली आल्यावर गुंतवणूक करण्याचे सल्ले देणारे तुम्हाला अनेकजण भेटतील. मात्र आपण सर्वानी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, कोणीही शेअर बाजाराची खालची पातळी किंवा वरची पातळी सांगू शकत नाही. त्यामुळे या स्थितीत गुंतवणूक काढून न घेता ती कायम ठेवणे अधिक गरजेचे आहे.
कोरोना, आपत्ती की इष्टापत्ती ?
कोरोनामुळे उद्भभवलेली परिस्थिती ही संधी की संकट हे सर्वांसाठी सारखेच न ठरता नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक किंवा प्रत्येक व्यक्तिगणिक ते वेगळे असणार आहे. व्यावसायिकाकडे येणारा पैशाचा स्रोतच खंडित झाला असेल तर त्याला नवीन गुंतवणूक थांबवावी लागणार आहे. व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पॆशांची रोखता कायम राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उद्योजकापुढे वेगळी आव्हाने असतील. कारखान्यात कुठलेही उत्पादन होत नसताना कामगारांच्या पगारी आणि उत्पादनासाठी भांडवल असे दुहेरी आव्हान त्याच्यापुढे असणार आहे. नोकरदारांसमोर तर आणखी वेगळीच आव्हाने असतील. नोकरीची सुरक्षितता किंवा वेतन कपातीसारख्या समस्या उदभवू नये याची काळजी घेत असतानाच आहे त्या उत्पन्न अतिशय काटेकोरपणे वापरणे आणि त्यानुसार पुढचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टी त्याला कराव्या लागतील.
त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती आपत्ती न ठरता तिचे इष्टापत्तीत रूपांतर व्हावे यासाठी पुढील काही गोष्टींची पूर्तता केली पाहिजे जेणेकरून कठीण परिस्थितीत या गोष्टी तुमच्यासमोर देवदूताप्रमाणे धावून येतील.
१) इमर्जन्सी फंड / आपत्कालीन निधी :
इमर्जन्सी फंड ही एक अतिशय मूलभूत अशी गोष्ट आहे. आयुष्य हे अनेक अनपेक्षित घटनांनी भरलेले असते. विशेषतः आर्थिक पातळीवर ते खूपच अनिश्चित स्वरूपाचे असे असते. कारण नोकरी गमावण्याची वेळ, एखादी आरोग्यविषयक समस्या / दवाखाण्याचा खर्च किंवा इतर अचानक उद्भवणाऱ्या समस्येमुळे आर्थिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात. मात्र अशा परिस्थितीत देखील किराणा भाडे, युटिलिटी बिल्स, ईएमआय, मुलांच्या शाळेची फी, इन्श्युरन्स प्रीमियम यांसारख्या गोष्टी टाळता न येण्यासारख्या असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आर्थिक पातळीवर सामना करण्यासाठीचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे इमर्जन्सी फंड.
इमर्जन्सी फंड नेमका किती असावा याबद्दल तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असतील. साधारणतः कोणत्याही आर्थिक उत्पन्नाविना पुढील ६ ते १२ महिन्यांच्या खर्चाची तजवीज होईल इतका तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा फंड केंव्हाही वापरता यायला पाहिजे. त्यामुळे साधारणतः २५ टक्के फंड बँकेच्या बचत खात्यात ठेवला पाहिजे. तर ७५ टक्के रक्कम बँकेतील मुदत ठेवी किंवा म्युच्युअल फंडातील लिक्विड किंवा ओव्हरनाईट फंडात गुंतविणे चांगले.
२) पुरेसे संरक्षण
तुम्ही आयुर्विमा किंवा आरोग्य विमा घेतला नसेल तर तो लगेच घेणे अत्यंत आवश्यक आहे.
A) टर्म इन्श्युरन्स :
आपल्यापैकी अनेकांना टर्म इन्श्युरन्स म्हणजे नक्की काय याची माहिती नसते. म्हणजे कर बचत व्हावी म्हणून ३१ मार्चपूर्वी घेतलेला, 'मनी बॅक' किंवा तत्सम गुंतवणूक योजनेत ठराविक कालावधीनंतर तुम्हाला काही रक्कम माघारी मिळेल असा विमा म्हणजे टर्म विमा नव्हे हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. मुळात विमा का घेतला पाहिजे ते आपण पाहूया:
कुटुंबातील कमावत्या सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या इतर सदस्यांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक त्रासाचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा मार्ग म्हणजे टर्म/ लाईफ विमा. आपल्या प्रियजनांना आपल्या [पश्चात आर्थिक पातळीवर झगडू लागू नये म्हणून प्रत्येकाने टर्म विमा घेणे अत्यावश्यक आहे.
B) आरोग्य विमा
तुम्ही नोकरदार आहात की व्यावसायिक किंवा तुम्हाला कंपनीने मेडिकल दिला आहे किंवा नाही याने काहीच फरक पडत नाही. कारण कंपनीची नोकरीच सुरक्षित नसेल तर कंपनीने दिलेला मेडिक्लेम देखील नोकरी गेल्यानंतर कामी येत नाही. त्यामुळे अतिशय धकाधकीच्या आणि अनिश्चित जीवनात संपूर्ण कुटुंबाचे सरंक्षण करण्यासाठी तुमच्याकडे आरोग्यविमा असणे ही काळाची गरज आहे.
उपचारांदरम्यान येणाऱ्या वाढत्या खर्चाचा विचार करता तुमच्या कुटुंबासाठी कमीतकमी ५ लाख रुपयांचा विमा असणे ही काळाची गरज आहे. अर्थातच व्यक्तिपरत्वे ही गरज वेगळी असू शकते.
३) अल्पकालीन गुंतवणुकीचे ध्येय
प्रत्येक कुटुंबाची अल्पकालीन प्रकारातील अशी काही गुंतवणुकीची ध्येये असतात. जसे की, परदेशी प्रवास , ड्रीम कार / पहिली कार विकत घेणे इ. . साधारणतः या ध्येयांची आर्थिक आपातळीवर पूर्तता करण्यासाठी ३ वर्षांची गुंतवणूक करण्यात येते. म्हणूनच या गुंतवणुकीला अल्पकालीन गुंतवणूक असे म्हणतात. या प्रकारात केली जाणारी गुंतवणूक जोखीम विरहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल याचा विचार न करता गुंतवणुकीची सुरक्षितता महत्वाची आहे. ओव्हरनाईट फंड, राष्ट्रीयीकृत बँकेतील मुदत ठेव हे गुंतवणुकीचे चांगले पर्याय ठरू शकतात.
वरील तिन्ही अटी पूर्ण झाल्या असतील आणि तुमच्याकडे अद्याप बचत खाते किंवा एफडीमध्ये किंवा इतर कोणत्याही डेट / हायब्रीड फंडांमध्ये रक्कम शिल्लक राहिली असेल तरच ती रक्कम इक्विटीमध्ये गुंतवा आणि पुढच्या टप्प्यावर जा.
सर्वात महत्वाचे म्हणजे, “जर तुम्ही अधिकची रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवत नसाल तर हा गुन्हा ठरेल.”
संधी सोडू नका
अगोदर नमूद केल्याप्रमाणे अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे मूलभूत गोष्टींसाठी गुंतवणूक करून झाली असेल आणि तुमच्याकडे काही रक्कम शिल्लक असेल तर इक्विटीमध्ये आणखी ६ महिने ते 1 वर्षासाठी गुंतवणूक करायलाच हवी. कदाचित यावर्षी परदेशात फिरायला जाण्यासाठी म्हणून तुम्ही काही रक्कम बाजूला काढून ठेवली असेल मात्र आता ही योजना बाळगली आहे. त्यामुळे ही रक्कम नक्कीच इक्विटीमध्ये गुंतविली जाऊ शकते. डायरेक्ट इक्विटी किंवा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून ही गुंतवणूक करू शकता.
महत्वाची खबरदारी : ज्या गुंतवणूकदारांना डायरेक्ट इक्विटी विषयी माहिती आहे . ज्यांच्याकडे मूलभूत माहितीच्या आधारे विशिष्ट शेअरमध्ये गुंतवणूक करणे शक्य आहे आणि त्यासाठी वेळ देणे जमणार आहे त्यांनीच डायरेक्ट इक्विटीचा मार्ग निवडला पाहिजे. महत्वाचे म्हणजे भांडवलाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले गेले पाहिजे. मात्र इक्विटी प्रकारात गुंतवणूक करणारे अनेक जण हे फ्री टिप्स किंवा इतर तत्सम माहितीच्या आधारे गुंतवणूक करतात आणि कष्टाने कमावलेला पैसा गमावून बसतात. त्यामुळे डायरेक्ट इक्विटीत गुंतवणूक करताना स्वतः अभ्यास करा. टिप्स किंवा कोणाच्या शिफारशींवर अवलंबून राहू नका.
आपल्या मुख्य आर्थिक उद्दिष्टांसाठी नेहमीच म्युच्युअल फंड मार्गातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करने उत्तम. म्युच्यूअल फंडात गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी फंड मॅनेजर असतात. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर भावनिक होऊन आपल्या जवळच्या प्रिय कुटुंबातील सदस्यावर उपचार करू शकत नाही, त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीला योग्य न्याय देऊ शकत नाही. फंड मॅनेजर्स आपल्या डॉक्टर प्रमाणे काम करतात. महत्वाचे म्हणजे आज घसरलेले शेअर बाजार हे कोरोनाच्या चिंतेने झाली आहे. नजीकच्या काळात यात नक्कीच सुधार होईल त्यामुळे शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडाच्या मार्गांद्वारे गुंतवणूक करण्यासाठी ही निश्चितच चांगली वेळ आहे.
४) दीर्घकालीन गुंतवणूक
जी गुंतवणूक ५-७-१०-१५ वर्षांसाठी केली जाते त्यांना दीर्घकालीन गुंतवणूक असे म्हणतात. रिटायरमेंट फंड, मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने यांसारख्या गोष्टींसाठी केलेली गुंतवणूक यात मोडते. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या प्रकारातील गुंतवणुकीचे उद्दिष्टे साधण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडणेच योग्य. वर नमूद केल्याप्रमाणे म्युच्युअल फंडात एक अभ्यासू रिसर्च टीम तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असल्याने ही गुंतवणूक तुलनेने सुरळखीत आणि चांगला परतावा देणारी ठरते.
गुंतवणूक करताना खाली नमूद केलेल्या बाबींची काळजी घेतल्यास गुंतवणूक फायदेशीर तर ठरेलच पण नुकसानीची शक्यता नाहीच्या बरोबर असेल.
म्युच्युअल फंड एसआयपी सुरु ठेवा. सध्याच्या परिस्थितीतून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूक करत राहण्याची हीच योग्य वेळ आहे.
आपत्कालीन निधीची तरतूद करुन तुमच्याकडे अतिरिक्त निधी असेल तर एसआयपीची रक्कम वाढवा.
सद्यस्थितीत एसआयपी किंवा शेअर्समधील गुंतवणूक काढू नका. या जाळ्यात अडकलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फटका बसून तुमची गुंतवणूक कमी होईल.
अतिआत्मविश्वास बाळगू नका. एकरकमी पैसे गुंतवू नका. ही परिस्थिती केंव्हा आटोक्यात येईल याची कोणालाच खात्री नाही. त्यामुळे छोटी छोटी गुंतवणूक करत रहा. संयम ठेवा.
शेअर बाजारातील गुंतवणूक एका वर्षात नक्कीच चांगली वाढेल आणि तुमच्यावर आपत्कालीन परिस्थिती ओढवणार नाही असा समज करून आपत्कालीन निधीतील रक्कम काढून ते शेअर बाजरात गुंतवण्याचे धारिष्ट्य करू नका.
मोठी खरेदी टाळा. रोख पैसे स्वत:कडे राखून ठेवा. उसने किंवा नवीन कर्ज घेऊ नका.
शक्य असेल तर ईएमआय भरत रहा. जेणेकरून एकदम ईएमआय भरण्याची आणि थकवलेल्या ईएमआयवर अतिरिक्त व्याज भरण्याची वेळ येणार नाही.
तुलनेने कमी व्याजदर असलेले गृहकर्जासारखी कर्जे एकदम बंद करू नका.
क्रेडिट कार्डावर कर्जे काढू नका. कारण त्यात डिफॉल्ट झाल्यास या कंपन्या इतर शुल्कासहित तब्बल 30 ते 40 टक्क्यांपर्यंत दंड आकारू शकतात.
शेवटचे परंतु सर्वात महत्वाचेः स्वतःमध्ये गुंतवणूक करा. शारीरिक, मानसिकदृष्ट्या सदृढ राहण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. नोकरी, व्यवसायात टिकून राहण्यासाठी नवीन कौशल्ये आत्मसात करा.