आकाशात कावळ्यांचे थवे उडताना दिसतात. संध्याकाळ झाली, की वटवाघुळे झुंडीने बाहेर पडतात, बगळ्यांच्या रांगा उडताना दिसतात... मात्र, गरूड पक्षी क्वचितच दिसतो. दिसलाच तर कोणत्या तरी उंच वृक्षावर किंवा डोंगरावर ही स्वारी स्वतःत मश्गुल होऊन आपली टोकदार चोच घासत बसलेली दिसते. जगाची त्याला तमा नसते. स्वतःची जागा तो स्वतः तयार करतो.... म्युच्युअल फंड योजनांचे किंवा शेअर बाजारामध्येदेखील तसेच आहे. हजारो लहान-मोठ्या म्युच्युअल फंड योजनांमधून किंवा कंपन्यांच्या शेअरमधून महत्त्वाचा, चांगला शेअर निवडून काढावा लागतो.
कधीकधी नावाजलेल्या, लोकप्रिय शेअरचे भाव चढे असतात, त्यांच्यातील वाढ खुंटलेली असते, हालचाल मंदावलेली असते. काही महत्त्वाच्या घटना घडल्याशिवाय अशा शेअरमध्ये मोठा चढ-उतार दिसत नाही. गुंतवणूकदारांचे पैसे अशा शेअरमध्ये सुरक्षित असतात; मात्र त्यात फार मोठी वाढ होत नसते. कालांतराने लाभांशाचा परतावा कमी व्हायला लागतो. बोनससुद्धा कधीतरी तीन-चार वर्षांनी दिला जातो. त्यावेळी हा शेअर गडबडून जागा होतो. त्यात वाढीची लक्षणे दिसू लागतात. बोनस देऊन झाला, की परत स्थिरस्थावर होतो. राईट इश्यू, स्प्लिट, बायबॅक यांसारख्या क्लृप्त्या अधूनमधून जाहीर करून असे शेअर आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करीत असतात; पण सुज्ञ गुंतवणूकदार अशा कंपन्यांच्या शेअरमधून फायदा करून बाहेर पडलेला असतो... परंतु दुसरीकडे काही छोटे 'हायटेक' शेअर आपल्या स्पर्धात्मक गुणवत्तेमुळे चमकत असतात. आपली हायटेक उत्पादने, उत्साही तरुण व्यवस्थापन, हमखास मागणी, निर्यात बाजारपेठ, कमी कामगार, कमी पसारा, यांत्रिक उत्पादनावर भर, महत्त्वाची सेवा, एकापेक्षा जास्त उत्पादने आणि एकापेक्षा जास्त ग्राहक अशा विशेष गुणांनी या कंपन्या यशस्वी होत असताना दिसतात. ग्राहकांमध्ये आपल्या मालाची मागणी निर्माण करण्याचे मोठे काम ते करीत असतात. ग्राहकही खूष असतो. खिसा रिकामा करीत असतो, बचतीपेक्षा खर्चाकडे ग्राहकाची प्रवृत्ती वाढत असते. उत्पादन, विक्री, फायद्यात मोठी वृद्धी दिसू लागते, शेअरचे भाव वाढू लागतात. मग गुंतवणूकदारांचेही लक्ष जाते, पतमापन संस्था जाग्या होतात. गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो आणि अशा कंपन्या वरच्या थरात प्रवेश करून मार्ग आक्रमू लागतात.
हे सर्व वाचल्यावर अशा कोणत्या कंपन्या आहेत, असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो... इंटेल, सिस्को, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट आणि आपल्याकडे इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, माइंटट्री, पर्सिस्टंट यांसारख्या 'आयटी'मधील कंपन्या किंवा यांसारख्या कंपन्यात गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड योजना या सदरात येतात. फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी हे एक उगवते क्षेत्र आहे. त्यातील पिरामल, सन फार्मा, डॉ. रेड्डीज, बायोटेक, नॅटको यांसारख्या कंपन्या पुढे येत आहेत. या अशा काही क्षेत्रांत 'गरूड पक्षी' दिसायला लागतात. त्यामुळे अशी देखणी आणि रुबाबदार सावजे हेरण्यासाठी पुढील गोष्टींचा अभ्यास करायला हवा :
1) करपश्चात नफा: भांडवलाच्या किती पट? जेवढा जास्त तेवढे चांगले,
2) भागभांडवल: जेवढे कमी तेवढे चांगले,
3) मुक्त गंगाजळी आणि प्रिमियम रिझर्व्ह: वसूल भागभांडवलाच्या जेवढे पट जास्त तेवढे चांगले,
4) व्यवस्थापनाचा भागभांडवलातील हिस्सा: जेवढा जास्त तेवढे चांगले,
5) कॅशरीच कंपन्या: नफ्याचे आणि वसुलीचे प्रमाण अधिक असल्यामुळे व्याजाचा खर्च नगण्य. उलट व्याजाचे उत्पन्न दाखविणाऱ्या कंपन्या,
6) नफा मिळविण्याची क्षमता: भविष्यात नफा मिळविण्याची कितपत क्षमता आहे, हेही पाहावे लागेल. कोणत्याही शेअरची आजची किंमत ही भविष्यात मिळणाऱ्या नफ्याच्या शक्यतेने 'डिस्काउंटेड कॅश फ्लो' पद्धतीने काढलेली असते,
7) कॉन्ट्रिब्युशन रेशो: एकूण मालाच्या विक्रीतून मुख्य खर्च (उदा. कच्चा माल किंवा नोकरदारांचा पगार आदी) वजा जाता येणाऱ्या 'कॉन्ट्रिब्युशन'ची विक्रीशी टक्केवारी. जेवढी कॉन्ट्रिब्युशन टक्केवारी जास्त तेवढे चांगले.
अशा रीतीने शेअर्सच्या जंगलातून 'गरूड'रूपी शेअर निवडण्याचा अभ्यास करण्याची गरज आहे.