प्रत्येकजण आपल्या हयातीत किंवा आपल्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना किंवा प्रियजनांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी जीवन विमा, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत असतो. परंतु आपल्या पैकी खूप कमी जण गुंतवणूक करताना कायदेशीर बाबींबद्दल सतर्क असतात. जसे की, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे पैसे कोणाला मिळतील. खूप लोकांचा असा समज असतो कि तुमचा विमा (लाईफ इन्शुरन्स पोलिसी) उतरवत असताना तुम्ही नामनिर्देशित (नॉमिनी) केलेल्या व्यक्तीला तुमच्या पश्चात पैसे मिळतात. परंतु हे खरं नाही. कायदेशीर बाबींची चिकित्सा न केल्याने तुम्हाला असं वाटू शकतं. आपण खूप गोष्टींचा स्वतःच्या अंदाजानुसार अर्थ लावत असतो पण कायदेशीर बाबींमध्ये या अंदाजांना काही अर्थ नसतो. म्हणूनच, आज आपण आर्थिक बाबींमध्ये नामनिर्देशित व्यक्तीचा काय संबंध असतो किंवा नामनिर्देशन करणं किती महत्वाचं आहे ते पाहूया.
'नॉमिनी' (नामनिर्देशित) प्रक्रिया काय असते?
कायद्यानुसार नामनिर्देशित केलेली व्यक्ती ही त्या संपत्तीची ट्रस्टी असते, मालक नाही. म्हणजेच अशी व्यक्ती फक्त तुमच्या संपत्तीची काळजी घेऊ शकते. आणि तुमच्या कायदेशीर वारसदारांना ही संपत्ती देण्यास वचनबद्ध असेल. मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस हाच त्याच्या संपत्तीचा मालक असतो. उदा. विमा कायद्याच्या सेक्शन ३९ नुसार मृत व्यक्तीला संरक्षित केलेली रक्कम ही नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाईल. मात्र ती रक्कम मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसदारांना देणं हे नामनिर्देशित व्यक्तीवर बंधनकारक असेल.
अशावेळी, कायदेशीर वारस म्हणजे कोण हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहणं साहजिकच आहे. कायदेशीर वारस म्हणजे ज्या नावाचा तुम्ही तुमच्या इच्छापत्रात (मृत्युपत्रात) समावेश केला आहे अशी व्यक्ती. जर तुम्ही तुमचे मृत्युपत्र बनवले नसेल तर मात्र 'हिंदू सक्सेशन कायद्या'नुसार वारसाची निवड केली जाते. उदा. जर एखाद्या कर्त्या पुरुषाने त्याच्या इच्छापत्रात पत्नी व मुलांचा कायदेशीर वारस म्हणून नोंद केली असेल तर त्याच्या संपत्तीची वाटणी करताना ती पत्नी व मुलांमध्ये केली जाते. म्हणूनच मृत्युपत्र बनवणं किती महत्वाचं आहे हे समजत. मृत्युपत्र हे शेवटचं सत्य मानलं जातं, जेणेकरून 'हिंदू सक्सेशन कायद्या'ची मदत घेण्याची गरज उद्भवत नाही.
नामनिर्देशित व्यक्ती हा कायदेशीर वारस देखील असू शकतो.
नामनिर्देशित व्यक्ती हा कायदेशीर वारस देखील असू शकतो म्हणून अशा व्यक्तीचा उल्लेख करताना फक्त पत्नी किंवा मुले असं ढोबळमानाने न लिहिता त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव, वय, पत्ता, नातेसंबंध अशा सगळ्या गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. जर नामनिर्देशित व्यक्ती वयाने लहान असेल तर एखाद्या प्रौढ व्यक्तीला तो अधिकार देऊन त्या व्यक्तीचे सुद्धा संपूर्ण नाव, पत्ता, वय, नातेसंबंध या बाबी तपशिलात द्या.
नामनिर्देशित व्यक्तीची संकल्पना का?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर नामनिर्देशित व्यक्ती संपत्तीचा मालक होऊ शकत नसेल तर मग कायद्यात या बाबीचा समावेश का करण्यात आला. याच कारण अगदी सोपं आहे. तुम्ही तुमच्या हयातीत विविध ठिकाणी गुंतवणूक करत असता. जसे की, विमा कंपनी, म्युच्युअल फंड किंवा शेअर्स. तुमच्या जाण्यानं प्रियजनांची मोठी हानी झाली असताना तुमच्या पश्चात ही गुंतवणूक तुमच्या वारसांना विनासायास मिळावी अशी तुमची इच्छा असते. अशावेळी नामनिर्देशित व्यक्तीला हा अधिकार मिळतो. त्या व्यक्तीला सहजतेने संपत्तीचा हक्क प्राप्त होऊन कायदेशीर वारसांना ती बहाल करता येते. परंतु, जर तुम्ही कोणाला नामनिर्देशित केलं नसेल तर मात्र तुमच्या वारसांना ही संपत्ती मिळवताना विविध कागदपत्रे संबंधित गुंतवणूक कंपनीला प्रत्येकवेळी नव्यानं म्हणजेच, (विमा कंपनी, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट) सादर करावी लागतात. त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय किचकट बनून दमछाक करणारी ठरते. म्हणून नामनिर्देशित व्यक्ती असल्यास हा त्रास टाळणं शक्य होत.
उदा.
५८ वर्षीय अजय यांचा नुकत्याच एका अपघातात मृत्यू झाला. त्यांची मुले आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित स्थिरस्थावर झाल्याने त्यांची सगळी संपत्ती ही आपल्या पत्नीला मिळावी अशी त्यांची ईच्छा होती. त्यानुसार त्यांनी विमापत्रात, म्युच्युअल फंड गुंतवणुकीत त्यांच्या पत्नीचा नामनिर्देशित व्यक्ती म्हणून उल्लेख देखील केला. परंतु, त्यांनी मृत्युपत्र बनवलं नाही. शेवटी परिणाम व्हायचा तोच झाला. कायद्यानुसार त्यांच्या संपत्तीवर मुलांचा देखील वाटा होता. जर त्यांनी त्यांचं ईच्छापत्रं बनवलं असतं तर त्यांच्या मनाप्रमाणे सगळी संपत्ती पत्नीला मिळाली असती.
म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन प्रक्रिया
म्युच्युअल फंडामध्ये युनिट्स खरेदी फॉर्म भरताना तुम्ही तीनपर्यंत व्यक्तींना नामनिर्देशित करू शकता. अल्पवयीन व्यक्तीसुद्धा पालकत्वासहीत नामनिर्देशित केली जाऊ शकते. नामनिर्देशित व्यक्ती बदलण्याची सुविधा संबंधित म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जो व्यक्ती नामनिर्देशित केला असेल त्या व्यक्तीच्या नावावर युनिट्स जमा होतील. नियामक संस्थेच्या परवानगीने एनआरआय म्हणजेच भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीलासुद्धा नामनिर्देशित करण्याची सुविधा म्युच्युअल फंड कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
विमा पत्रातील नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया
विमाधारक हा एक किंवा एकपेक्षा जास्त व्यक्तींना नामनिर्देशित करू शकतो. तसेच नामनिर्देशित व्यक्तीचा वाटाही ठरवू शकतो. असं असलं तरी यामध्ये एक प्रमुख अट आहे, ती म्हणजे पहिल्या पसंतीचा नामनिर्देशित व्यक्ती हा तुमच्या कुटुंबातील सदस्य असला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या कुटुंब सदस्यांव्यतिरिक्त कोणाचा नामनिर्देशित व्यक्ती म्हणून उल्लेख करणार असताल तर सेक्शन ३९ अनुसार तुम्हाला काही विशिष्ट्य अशा कागदपत्रांची पूर्तता करून त्या व्यक्तीच्या संबंधाचा तपशील द्यावा लागतो.
एलआयसीच्या वेबसाईट नुसार, नामनिर्देशन हा विमाधारकाला त्याच्या मृत्यूपश्चात कोणत्या व्यक्तीला पैसे देण्यात यावे हा सांगण्याचा अधिकार आहे. नामनिर्देशित व्यक्तीला याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही फायदे देण्यात येत नाहीत. विमाधारकाला त्याच्या हयातीत नामनिर्देशित व्यक्तीचे नाव बदलण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्याला अगोदर उल्लेख केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीची परवानगी घेण्याची गरज नाही. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना होणार त्रास टाळण्यासाठी तुमच्या विमापत्रात नामनिर्देशन करणं आवश्यक आहे.
शेअर्स खरेदी करताना नामनिर्देशन प्रक्रिया
तुमच्यासाठी एक साधी प्रश्नमंजुषा, जर एखाद्या पतीने आपल्या पत्नीला नामनिर्देशित न करता त्याच्या पुतण्याला शेअर्स खरेदी करताना नामनिर्देशित केले तर पतीच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस कोण? वरील उदाहरणांनुसार जर तुमचे उत्तर पत्नी हे असेल तर ते चुकीचे आहे. कारणं पतीने मृत्युपत्र तयार केले नसल्यास शेअर्स खरेदी करताना वेगळा नियम लागू होतो.
शेअर्स खरेदी नामनिर्देशन प्रक्रियेतला एक महत्वपूर्ण खटला न्यायाधीश रोशन दळवींपुढे आला असता त्यांनी याप्रकारचा महत्वपूर्ण निकाल दिला होता. फिर्यादी मिसेस हर्षा नितीन कोकाटे यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार त्याच्या पतीच्या मृत्यूपश्चात त्यांच्या शेअर्सची मालकी पत्नीला मिळावी असा मिसेस हर्षा यांचा दावा होता. परंतु नामनिर्देशन करताना त्यांचे पती कोकाटे यांनी आपल्या पुतण्याला नामनिर्देशित केले असल्याने 'कंपनी कायदयातील सेक्शन १०९ (अ) व ठेवीदारांचा कायदा ९.११' नुसार ज्या व्यक्तीचा उल्लेख नामनिर्देशित व्यक्ती म्हणून केला असेल त्याच्याच नावावर शेअर्स जमा केले जातील या तरतुदीनुसार त्या शेअर्सची मालकी त्याच्या पुतण्याला देण्यात आली. म्हणजेच इथे मृत्युपत्र तयार नसल्यास हिंदू सक्सेशन कायदा लागू होत नाही.
थोडक्यात महत्वाचे:
* खाजगी गुंतवणुकीला गृहीत धरणे धोकादायक ठरू शकते.
* चांगल्या आर्थिक भविष्यासाठी गुंतवणुकीबरोबरच त्यातले बारकावे समजून घेणं महत्वाचे आहे.
* आपल्या प्रियजनांना आपल्या पश्चात होणार त्रास टाळण्यासाठी गुंतवणुकीचा प्रारंभ करताना नामनिर्देशन प्रक्रियेला विशेष महत्व आहे. त्याचा व्यवस्थित विचार केला गेला पाहिजे.