प्रश्न विचारा
बाजारातील परिस्थिती पाहून "पॅनिक' होण्यापेक्षा शांत राहा आणि स्वतःला पुढील प्रश्न विचारा.
1) आर्थिक उद्दिष्टे बदलली आहेत का?
2) अल्पकाळात नफा मिळावा यासाठी कोणती गुंतवणूक केली आहे का?
3) कोणतीही "फायनान्शिअल इमर्जन्सी' नाही ना?
4) एकूण गुंतवणुकीतील किती टक्के गुंतवणूक "इक्विटी'मध्ये केली आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे "नाही' असतील तर, मग त्यापुढे शेअर बाजारातील गुंतवणुकीत किंवा म्युच्युअल फंडाच्या योजनांवरील परतावा कमी किंवा नकारात्मक झाला आहे का, याबाबत विचार करू शकता. जर तसे नसेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, की बाजारात अशाप्रकारची पडझड आधीही झाली आहे. मात्र पडझडीतून बाजार सावरतो तेव्हा गुंतवणूकदारांसाठी "अच्छे दिन' घेऊन येतो.
सध्याच्या परिस्थितीत "हे' करा :
1) तुमच्याकडे अतिरिक्त निधी उपलब्ध असेल तर टप्प्याटप्प्याने बाजारात गुंतवणूक करण्याचा नक्कीच विचार करू शकता. बाजारातील प्रत्येक पडझडीत खरेदी करा. मात्र मालमत्ता विभाजन (ऍसेट ऍलोकेशन) करायला विसरू नका.
2) "लिक्विड' फंडाकडून काही पैसे "इक्विटी' फंडामध्ये वळवा.
3) तुमच्याकडे अतिरिक्त निधी उपलब्ध नसेल मात्र, मार्केटमधील संधीचा फायदा घ्यायचा असेल तर "एफडी'तील काही रक्कम "इक्विटी'कडे वळवू शकता. मात्र निश्चित उत्पन्न देणाऱ्या "एफडी', "पीएफ', "पीपीएफ' किंवा "एनएससी'सारख्या योजनांमध्ये मोठा हिस्सा गुंतवला असेल तर आणि तरच सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी "इक्विटी'कडे वळा.
4) ऍसेट ऍलोकेशन योग्यप्रकारे केले असेल आणि गेल्या तीन ते चार वर्षांत बाजारात मोठी गुंतवणूक केली असेल. शिवाय आणखी गुंतवणूक वाढवायची इच्छा नसेल तर शांत राहा. बाजारात घडामोडी घडल्या म्हणून आपण देखील काहीतरी केले पाहिजेच असे नाही. बाजारातील परिस्थिती काही महिन्यात निवळेल तसा बाजार पुन्हा तेजीची वाट धरेल.
5) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थांबवू नका. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) सुरू असलेली गुंतवणूक सुरूच ठेवा किंवा "एनएव्ही' कमी झाल्याने त्यातील गुंतवणूक आणखी वाढवा.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भूतकाळात देखील बाजारात पडझड झाली आहे, सध्याही घडत आहे आणि भविष्यातही घडेल. बाजाराचा तो स्वभाव आहे. यामुळे अशा परिस्थितीत ऍसेट ऍलोकेशन आणि जोखीम घेण्याची क्षमता बघूनचा म्हणा "करो' ना इन्व्हेस्टमेंट.