केरळस्थित सीएसबी बँक (आधीची कॅथोलिक सीरियन बँक) 22 नोव्हेंबर रोजी आपला आयपीओ बाजारात दाखल करणार आहे. सुमारे 410 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी 193 ते 195 रुपयां दरम्यानचे हे समभाग 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात खुले असतील. गुंतवणूकदारांना कमीत कमी 75 शेअर्स / समभाग किंवा त्याच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे.
या आयपीओच्या माध्यमातून बँक 24 कोटींचे नवीन भांडवल उभारणार आहे. तर बँकेचे सध्याचे भागीदार आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, फेडरल बँक, ब्रिज इंडिया फंड, सॅटेलाईट मल्टीकॉम, वे 2 वेल्थ सिक्युरिटीज आणि एडलविस टोकियो लाइफ इन्शुरन्स आपल्या साधारणतः 2 कोटी शेअर्स विक्रीच्या माध्यमातून 385.71 कोटींची उभारणी होईल.
30 सप्टेंबर रोजी संपलेल्या पहिल्या सहा महिन्यांसाठी बँकेला 817 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वित्तीय वर्ष 20 च्या पहिल्या सहामाहीत बँकेला 44.3 कोटींचा नफा झाला आहे. तर एकूण कर्जवाटपाच्या तुलनेत एनपीए 2.86 टक्के इतका आहे.
सीएसबी बँक केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कार्यरत आहे.