शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषतः एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट क्लासमधल्या गुंतवणुकी तुम्हाला तारू शकतात. सध्याच्या अस्थिर बाजारातील अशा घटनांमधून कोणता धडा घ्यायला हवा, याविषयी कानमंत्र.
उच्च शिक्षण घेऊन समीर एका खासगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला लागला होता. नोकरी लागून तीन-चार वर्षं झाली होती. ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांच्या चर्चेतून अन् विविध माध्यमांत छापून येणाऱ्या बातम्या-लेखांमधून शेअर्स घेणं खूप चांगलं असतं, असं त्यानं ऐकलं-वाचलं होतं. त्या आधारावरच तो शेअर्स घेऊ लागला होता. गेल्या तीन-चार वर्षांत शेअर बाजाराला "अच्छे दिन' असल्यानं सारं काही आलबेल होतं. त्याकडं पाहून समीर मनोमन खूष होता; पण अलीकडच्या काही दिवसांत-महिन्यांत या बाजारानं जोरदार गटांगळ्या खायला सुरवात केल्यानं समीरकडचा शेअर्सचा पोर्टफोलिओ बरेच हलकावे खात गडबडू लागला. घबराटीनं समीरचा चेहराही चिंताग्रस्त होताना दिसू लागला. खरेदीभावापेक्षा कमी भावावर शेअर्स विकायला मन धजावतही नव्हतं. काय करावं, त्याला काहीच सुचत नव्हतं. कारण शेअर्सशिवाय त्यानं दुसरी कसलीच गुंतवणूक केली नव्हती...
समीरसारखी अवस्था आपल्यापैकी काही जणांची नक्कीच झाली असणार किंवा "असे काही समीर' आपल्या पाहण्यात येऊ लागले असतीलही!.. पण मग समीरचं नक्की कुठं चुकलं? दीर्घकाळात सर्वाधिक "रिटर्न्स' देण्याची क्षमता असणारा "इक्विटी'सारखा ऍसेट क्लास तर त्यानं बरोबर निवडला होता. मग तरीही घबराट "मनी' का होते? या प्रश्नांचं उत्तर शोधणं गरजेचं होतं...
समस्येवर उपाय काय?
समीरसमोरच्या समस्येला दोन पद्धतीनं उत्तर देता येऊ शकतं. पहिलं अगदीच साधं-सोपं आहे आणि ते म्हणजे इक्विटी किंवा शेअर्ससारखा गुंतवणूक पर्याय निवडताना "रिस्क फॅक्टर' गृहीत धरावा लागतो. जशी एखादी गोष्ट वर जाते, तशीच ती खालीही येऊ शकते आणि शेअर बाजारही त्याला अपवाद नाही. चढ-उतार हा तर या बाजाराचा स्थायीभाव आहे. शिवाय या ऍसेट क्लासमधून चांगल्या रिटर्न्सची अपेक्षा ठेवायची असेल, तर दीर्घकाळ गुंतवणुकीची तयारी आणि संयम ठेवावाच लागतो. तशी मानसिक तयारी नसेल तर घबराट "मनी' होणार! महत्त्वाचं म्हणजे अशी गुंतवणूक करताना अनुभवी तज्ज्ञाची मदत घेणं ही अपरिहार्य गोष्ट आहे, हेही समीर विसरला होता.
या पहिल्या उत्तरापेक्षा दुसरं उत्तर काहीसं व्यापक; पण दीर्घकाळात समीरसारख्या तिशीतल्या तरुणांना निश्चितच तारणारं आणि गुंतवणुकीच्या विश्वात ठामपणे पाय रोवून उभं राहायला शिकवणारं आहे. या उत्तराचं खूप कमी शब्दांत वर्णन करायचं झालं, तर तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असलं पाहिजे. समीरच्या बाबतीत ते अजिबात नव्हतं. ते असतं, तर त्याला इतर ऍसेट क्लासमधल्या गुंतवणुकीनं तारलं असतं. असो. सद्यःस्थितीत शेअर्समधील गुंतवणुकीनं काहीशा पोळलेल्या समीरला यानिमित्तानं जाग आली, हेही नसे थोडके! कारण या निमित्तानं सुधारण्याची, सावरण्याची संधी त्याला (वय कमी असल्यानं) मिळणार आहे. आपल्यापैकी कोणाच्या बाबतीत असंच काहीसं घडलं असेल, तर "हीच वेळ आहे सावरण्याची' असं समजायला हरकत नाही.
"परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन'
"परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' म्हणजे काय, हा प्रश्न आता नक्कीच मनात आला असणार. "डू नॉट पुट ऑल एग्ज इन वन बास्केट,' या उक्तीचा प्रत्यय "ठेच लागल्यावर' अनेकांना येतो; पण तीच जाण, समज ठेच लागायच्या आधी आली, तर गुंतवणुकीची नौका आताच्या परिस्थितीसारखी डगमगणार नाही. हे समजून घेण्यासाठी सोपं उदाहरण घेऊया. आपल्याला जेवणात रोज एक-दोन पदार्थच खायला दिले, तर ते आपल्याला आवडणार नाही आणि आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा ते पोषक नसेल. जसं आरोग्य चांगलं राहण्यासाठी संतुलित आहाराची गरज असते, तद्वतच आपली गुंतवणुकीची थाळीही परिपूर्ण असायला हवी.
ऍसेट क्लासची "सायकल'
ऍसेट क्लासच्या अंगानं विचार केला, तर निश्चित उत्पन्न देणारा पर्याय (एफडी, एनएससी, पीपीएफ, डिबेंचर आदी), सोनं-चांदी, रिअल इस्टेट आणि इक्विटी (थेट शेअर्स किंवा म्युच्युअल फंड) असे प्रामुख्यानं चार गुंतवणूक पर्याय समोर येतात. हे सर्व करण्याआधी आयुर्विमा आणि आरोग्यविमा महत्त्वाचा ठरतो. कारण त्याच्याच पायावर पुढं गुंतवणुकीची इमारत उभी करणं सोपं जातं.
प्रत्येक ऍसेट क्लासची काही वर्षांची एक "सायकल' (चक्र) असते. त्यामुळं आज तेजीत असलेला एखादा ऍसेट क्लास दोन-तीन वर्षांनी तशीच पुढं प्रगती करेल, असं छातीठोकपणे सांगता येत नाही. त्याउलटही असतंच. आज मागे पडलेला एखादा ऍसेट क्लास तीन-चार वर्षांनी मुसंडी मारत पुढंही येऊ शकतो. असं असेल तर मग नक्की गुंतवणूक कुठं करावी, असा प्रश्न पडणार.
टीव्ही चॅनेल किंवा कोणाच्या तरी "टिप्स'च्या आधारे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड घेणं असो किंवा पूर्वीच्या "रिटर्न्स'कडं पाहून सारा पैसा रिअल इस्टेटमध्ये किंवा सोन्यात लावणं असो किंवा "एफडी'चे व्याजदर आता वाढू लागल्यानं फक्त "एफडी'च्याच मागं लागणं चुकीचं आहे. हे सर्व करताना आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टपोलिओचं "बॅलन्सिंग' होतंय की नाही, याकडं लक्ष देण्याची गरज अधिक आहे. आपलं वय, उत्पन्न, गरज, आर्थिक उद्दिष्टं, जोखीम घेण्याची क्षमता आदी महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेऊन गुंतवणूक केल्यास नौका डगमगण्याचा धोका कमी होऊ शकतो. थोडक्यात, एकाच ऍसेट क्लासच्या अतिप्रेमात पडणं धोक्याचं ठरू शकतं. (नेमकं तेच समीरच्या बाबतीत घडलं होतं.) याचा अर्थ अमुक एक ऍसेट क्लासच उत्तम आणि अमुक एक वाईट, असं मानण्याचं कारण नाही. जेवणाची लज्जत वाढायला जसं पापड-लोणचं आवश्यक असतं, तसंच चलनवाढीपेक्षा जास्त "रिटर्न्स'साठी "इक्विटी'सारखा ऍसेट क्लासही श्रीखंडासारखा आपल्या ताटात असावा लागतो. फक्त त्याचं योग्य प्रमाण हे आपल्या वयानुसार, उत्पन्नानुसार, गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार असायला हवं आणि ते तसं राहतंय ना, हे पाहणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं हे आपल्याच हाती आहे. ज्याला हे जमेल, तो तृप्तीची ढेकर देईल अन् ज्याला जमणार नाही, त्याला अपचनानं अजीर्ण होईल. बघा पटतंय का?
परिपूर्ण पोर्टपोलिओत काय हवं?
- सर्वप्रथम पुरेसा आयुर्विमा आणि आरोग्यविम्याची कवचकुंडलं
- अनपेक्षित खर्चाची तरतूद म्हणून सुरक्षित बॅंकेत पुरेशी "एफडी'
- भविष्यकाळाची तरतूद म्हणून "पीपीएफ', "एनपीएस'सारखं खातं
- शक्यतो दागिन्यांच्या रूपातच सोन्या-चांदीची खरेदी (किंवा गोल्ड ईटीएफचा पर्याय)
- स्वतःला अभ्यास करणं शक्य असल्यास थेट शेअर्स
- स्वतःला अभ्यास करणं शक्य नसल्यास म्युच्यअल फंड
- स्वतःच्या कुटुंबाला राहण्यासाठी पुरेसं मोठं घर घेऊन अतिरिक्त पैसा असल्यास प्लॉट, फ्लॅट
परतावा कशा प्रकारचा?
चलनवाढीच्या दराच्या तुलनेत अधिक "रिटर्न्स' मिळत असतील, तर ते "रिअल रिटर्न्स' ठरतात. या पार्श्वभूमीवर चलनवाढीचा सरकारी दर 6 टक्के (प्रत्यक्षातला 11-12 टक्के) गृहीत धरला, तर कोणता ऍसेट क्लास दीर्घकाळात किती "रिटर्न्स' देऊ शकतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. गेल्या साधारण 30 वर्षांचा विचार केला तर विविध ऍसेट क्लासचे सरासरी वार्षिक "रिटर्न्स' पुढीलप्रमाणे ः
1) एफडी ः अंदाजे 8.5 टक्के
2) सोनं ः अंदाजे 10.5 टक्के
3) रिअल इस्टेट ः अंदाजे 14.5 टक्के
4) इक्विटी ः अंदाजे 16 टक्के