'हेल्थ इज वेल्थ' हे खरेच आहे. मात्र 'हेल्थ' बिघडली आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तर मात्र ती बिघडलेली 'हेल्थ' दुरुस्त करताना आपल्या 'वेल्थ'ची दाणादाण उडू शकते हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अचानक उद् भवणारी एखादी शस्त्रक्रिया, आजारपण किंवा अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये होणारे खर्च आज सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील आणि आरोग्यसवेतील प्रगतीमुळे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात क्रांतीच झाली आहे, माणसाच्या सरासरी आयुष्यमानात मोठी वाढ झाली आहे हे खरे आहे, पण या सेवेचे मूल्य गगनाला भिडू लागले आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अशावेळी आपल्याकडे आरोग्य विमा पॉलिसी असेल तर हा हॉस्पिटल खर्च आपल्याला विमा कंपनीकडून परत मिळून आपली 'वेल्थ' सुरक्षित राहू शकते. अन्यथा आकस्मिकपणे उद् भवलेल्या या खर्चामुळे आपले आर्थिक नियोजन कोलमडू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे आरोग्य विमा पॉलिसी असणे आवश्यक आहेच पण ती घेताना त्या पॉलिसीचे फायदे, अटी नीट समजावून घेणेही आवश्यक आहे.
आरोग्य विमा पॉलिसी घेताना...
-आरोग्यविम्याचा फायदा मिळण्यासाठी किमान २४ तास हॉस्पिटलमध्ये दाखल असणे आवश्यक असते. केमोथेरपी, डायलिसिस इत्यादि अपवाद.
-डॉक्टरांची फी, रूम चार्ज, शस्त्रक्रिया, सेवा-शुश्रुषा, औषधे, विविध चाचण्या इत्यादीवर खर्च झालेली सर्व रक्कम (विमा पॉलिसीच्या विमा रकमेच्या मर्यादेत) परत मिळू शकते. रजिस्ट्रेशन फी, प्रशासनिक खर्च असे अवैद्यकीय खर्च मात्र यासाठी पात्र नसतात.
-आरोग्य विम्याच्या दाव्याची तपासणी आणि मंजूरीचे काम 'थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर' (टीपीए) कडे असते. ज्याची माहिती विमा कंपनी आपणाला देत असते. विमेदार हॉस्पिटलमध्ये दाखल होताच या 'टीपीए'कडे सूचना देणे आवश्यक असते.
-ज्या हॉस्पिटलमध्ये 'कॅशलेस' सेवा उपलब्ध असते तेथे आपल्या पॉलिसीची माहिती दिली की खर्चाचे बिल थेट 'टीपीए'कडे पाठविले जाते आणि विमेदाराला आपले पैसे खर्च करावे लागत नाहीत. अन्यथा विमेदाराने झालेल्या खर्चाविषयीचा 'क्लेम' दाखल केल्यानंतर तो खर्च त्याला परत मिळतो.
-'फॅमिली फ्लोटर' या योजनेमध्ये एकाच पॉलिसीत विमाधारकाला तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही विमा संरक्षण मिळते. एकूण विमा रकमेच्या मर्यादेत एक किंवा अनेक सदस्यांना हा लाभ घेता येतो.
-करार एक वर्षाचा असतो. वर्षअखेर नूतनीकरण करणे आवश्यक असते. वर्षभरात 'क्लेम' केला नसेल तर त्याच प्रिमियम मध्ये पाच टक्के वाढीव विमा रकमेचे संरक्षण पुढील वर्षासाठी दिले जाते.
-पॉलिसी साठी प्रस्ताव दाखल करताना आरोग्याविषयी संपूर्ण खरी माहिती देणे अपेक्षित आहे.
-आरोग्यविम्यासाठी भरलेला प्रीमिअम प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० डी नुसार करसवलतीस पात्र असतो.
-सामान्यतः खालील परीस्थितीत क्लेम देय होत नाही.
पॉलिसी घेण्यापूर्वी असलेले आजार, पॉलिसी घेतल्या बरोबर ३० दिवसात उद् भवलेले आजार, दंतचिकित्सा, सौंदर्य उपचार इत्यादि.
शेवटी एक प्रेमाचा सल्ला.
आरोग्य विमा पॉलिसी घेतली तरी आपले आरोग्य सांभाळा. कारण ही पॉलिसी वैद्यकीय खर्च परत देते, आरोग्य नव्हे.