गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे त्यावर मिळणारे "व्याज'. यावर तुमच्या संपत्तीत होणारी वाढ अवलंबून असते. हे परताव्याचे गणित सर्रास सरळ व्याज पद्धतीने मोजण्याचा सर्वांत सोपा मार्ग अवलंबिला जातो. समजा, वार्षिक 10 टक्के व्याजदराने 100 रुपये ठेव योजनेत गुंतविले, तर सरळ व्याज पद्धतीने लाभाचे सोपे गणित मांडताना एक वर्षानंतर तुमच्या मुद्दलावर परतावा म्हणून 10 रुपये मिळतील. पुढील वर्षीदेखील तुम्हाला 10 रुपये मिळतील. या पद्धतीने तुम्ही जितक्या कालावधीसाठी मुदतठेव केली असेल, तितक्या कालावधीसाठी तुम्हाला हे व्याज मिळेल. मात्र, त्यात वार्षिक 10 रुपयांचीच भर पडेल, म्हणजेच येथे ज्या रकमेवर व्याज मोजले आहे ती रक्कम, अर्थात मुद्दल तिन्ही वर्षांत एकसारखीच धरली आहे.
बहुतांश वित्तीय योजनांमध्ये "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'चे म्हणजेच चक्रवाढ व्याजाचे तत्त्व लागू आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे प्रारंभिक गुंतवणूक मुद्दलावर व्याज मोजले जाण्यासह, त्यापुढे या रकमेत समाविष्ट होणाऱ्या व्याज रकमेचेदेखील व्याज मोजण्याची पद्धत आहे. म्हणजेच व्याजावर व्याज मोजले जाते. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणाला आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊ. पहिल्या वर्षी तुम्हाला 10 रुपये व्याज मिळाल्यानंतर तुमचे भांडवल 110 रुपये होईल आणि त्यामुळे त्यापुढील वर्षी तुम्हाला 110 रुपयांवर 10 टक्के व्याज देण्यात येईल अर्थात ते 11 रुपये असेल, त्यामुळे तुमचे भांडवल 121 रुपये इतके होईल आणि त्यानंतरच्या वर्षी तुम्हाला मिळणारे व्याज 12.1 रुपये असेल. सरळ व्याज पद्धतीने जर तुम्ही 10 वर्षांसाठी मुदतठेवीत पैसे गुंतवले तर तुम्हाला 100 रुपयांच्या भांडवलावर 100 रुपयेच मिळतील. मात्र चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू केल्यास तुम्हाला व्याजापोटी 160 रुपये मिळतील. यालाच म्हणतात "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू
"पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू
प्रत्येक वर्षागणिक मुद्दल रक्कम ही वाढत जाते, कारण त्यात त्या- त्या वर्षी मिळालेल्या व्याजाची रक्कम जमा होऊन त्यावर व्याजाचा लाभ मोजण्यात येतो. यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
1) दीर्घकालीन गुंतवणूक : जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर बचतीला सुरुवात.
2) गुंतवणुकीतील नियमितपणा म्हणजे नियमितपणे बचत.
तरुणवयातच कम्पाउंडिंगची ताकद लक्षात आली, तर लवकर बचत सुरू करून दीर्घकाळात मोठी रक्कम उभी करता येते. म्हणूनच जितक्या लवकर सुरुवात कराल तितक्या लवकर हे सूत्र तुमच्या पैशांसाठी काम करते. सुरुवातीच्या काळात कम्पाउंडिंगची ताकद लक्षात येत नाही. मात्र, कम्पाउंडिंगच्या सूत्राचा वापर करून 15 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते, तेव्हा त्यातून निर्माण होणारी संपत्ती आपल्या दृष्टिपथात येते. गुंतवणुकीत नियमितपणा राखणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. कारण गुंतवणुकीत नियमितपणा ठेवल्यास आपल्या भांडवलाची वृद्धी होत जाते आणि परिणामी त्यावर मिळणाऱ्या परताव्यातदेखील वाढ होते.
करण वयाच्या 40व्या वर्षी दरमहा 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीस सुरुवात करतो. करणला गुंतवणुकीवर 8 टक्के वार्षिक परतावा मिळतो. वयाच्या 65व्या वर्षी करणची एकूण गुंतवणूक 9,57,367 रुपये असेल (यासाठी करणने 25 वर्षांच्या कालावधीत 3 लाख रुपये गुंतवले आहेत.)
रिटा वयाच्या 25व्या वर्षी दरमहा 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीस सुरुवात करते. रिटालाही वार्षिक 8 टक्के परतावा मिळतो. रिटा फक्त 15 वर्षे म्हणजेच वयाच्या 40व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करते. वयाच्या 65 व्या वर्षी रिटाच्या खात्यात 25,57,000 रुपये जमा झालेले असतील (यात रिटाची गुंतवणूक 1,80,000 रुपयांची असेल).
करणने 25 वर्षे गुंतवणूक केली, तर रिटाने फक्त 15 वर्षे गुंतवणूक केली. मात्र, निवृत्तीच्या वेळी रिटाला मिळणारी रक्कम करणच्या रकमेपेक्षा जवळपास तिप्पट असेल, हीच आहे "पॉवर ऑफ कम्पाउंडिंग'ची जादू...
"फायनान्शियल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन' या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या सौजन्याने (शब्दांकन : विजय तावडे)