ॠषभ पारख, संस्थापक -मनी प्लांट कन्सल्टंसी
आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांसाठी तुम्ही कोणती एक चांगली गोष्ट करू शकत असाल तर ती म्हणजे चांगली इन्शुरन्स पॉलिसी घेणे. त्यातही तुमच्याकडे टर्म इन्श्युरन्स असेल तर त्यांचे जीवन आणखी सुखकर होऊ शकते.
नावाप्रमाणेच टर्म इन्श्युरन्समध्ये फक्त इन्श्युरन्स / संरक्षण येते. म्हणजेच युलिप किंवा एंडोमेंट प्रमाणे इन्श्युरन्स आणि गुंतवणूक असा प्रकार यात नसतो. त्यामुळे कमीत कमी प्रीमियममध्ये चांगला लाभ / कव्हर मिळणे शक्य होते. असे असले तरी, टर्म इन्श्युरन्स बद्दल अनेक समज -गैरसमज आहेत त्याचबरोबर इन्श्युरन्स घेताना अनेक चुका होतात. त्या टाळण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करूया.
प्रीमियम आणि मृत्यूनंतरचा फायदा
अगोदरच्या तुलनेत आता भारतात टर्म इन्श्युरन्सचे महत्व लक्षात येत आहे. मात्र आजही अनेकजण टर्म इन्श्युरन्सच्या फायद्याविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसते. टर्म प्लॅनमध्ये, पॉलिसी चालू असताना जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना विम्याचे पैसे मिळतात मात्र पॉलिसीची मुदत संपूनही जर विमाधारक जिवंत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे.
असे असले तरी, आयुर्विमा पॉलिसीकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याची आपल्याकडे प्रथा असल्याने मुदत संपल्यानंतर काहीतरी लाभ व्हावा या हेतूने अनेक जण इंश्युरन्स घेत असतात. ही बाब लक्षात घेऊन टर्म इंश्युरन्स मध्ये देखील 'रिटर्न ऑन प्रीमियम' हा पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या नेहमीच्या प्रीमियम पेक्षा अतिरिक्त शुल्क भरून हा लाभ घेता येतो. मात्र, मिळणारा लाभ आणि त्यावेळी असणारे त्या पैशाचे मूल्य लक्षात घेता हा चांगला पर्याय ठरू शकत नाही.
परिणामी, अतिरिक्त पैशांची गुंतवणूक शेअर्स, डिबेंचर्स, मुदत ठेव इ. प्रकारात केल्यास त्याचा चांगला लाभ मिळू शकतो.
विमा घेण्याची योग्य वेळ कोणती आणि विमा किती असावा
आज करे सो अब! या म्हणीप्रमाणे विमा घेण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसून सध्याच्या काळाचा विचार करता तो आजच घेणे शहाणपणाचे ठरू शकते.
सर्वसाधारणपणे जेंव्हा तुमच्या उत्पन्नावर तुमचे आई-वडिल किंवा पत्नी- मुले अवलंबून असतात अशावेळी विमा घेणे अत्यंत आवश्यक असते. तसेच जसजसे तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातील (मुलांचे शिक्षण, इतर खर्च) त्याप्रमाणे विमा संरक्षणाची मर्यादा देखील वाढविली पाहिजे.
विम्याचे संरक्षण/ कव्हर किती असावे याचा सर्वोत्तम फॉर्म्युला म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट. म्हणजे समजा, हरीशचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर हरीशकडे 1 कोटींचा टर्म प्लॅन असला पाहिजे.
एक की अनेक पॉलिसी
अनेकांचा एकाच पॉलिसीवर / कंपनीवर विश्वास नसल्याने ते एकाच प्रकारचा विमा दोन-तीन कंपन्यांकडून काढून घेतात. म्हणजे समजा हरीशला 1 कोटींचा संरक्षण विमा काढायचा असेल तर तो एका कंपनीकडून 50 लाख आणि दुसऱ्या कंपनीकडून 50 लाख किंवा 25-25-50 अशा प्रकारचे कॉम्बिनेशन साधून दोन किंवा तीन कंपन्यांकडून इंश्युरन्स काढला जातो. त्याला कारण म्हणजे एका कंपनीने क्लेम रिजेक्ट केला तर दुसऱ्या कंपनीकडून तो पास होईल.
मात्र, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की विशिष्ट नियमाचा आधार घेऊन एखादी कंपनी क्लेम नाकारत असेल तर दुसरी कंपनी देखील त्याच नियमाचा आधार घेणार आहे. परिणामी आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांना त्याचा त्रासच जास्त होणार आहे.
त्यामुळे, एका कंपनीचा एकच चांगल्या आर्थिक संरक्षणाचा विमा असणे उत्तम. त्यातूनही समाधानरूपी पर्याय म्हणून जास्तीत जास्त दोन योजनांपेक्षा पुढे जाऊ नये.
टर्म प्लॅन सोबत 'रायडर'चे महत्व
चालू योजनेत थोडक्या किमतीत अतिरिक्त फायदे घेण्यासाठी अनेक जण रायडर घेतात. उदा. अपघात किंवा आरोग्य विमा मिळावा यासाठी अतिरिक्त पैसे भरून रायडर घेतला जातो. मात्र टर्म प्लॅन सुटसुटीत असणे केंव्हाही चांगले. रायडर घेण्यापेक्षा त्यासाठी स्वतंत्र पॉलिसी घेतलेली उत्तम. जेणेकरून चांगला लाभ मिळू शकेल.
पॉलिसीची टर्म/ मर्यादा किती असावी
अनेक जण भावनेच्या आहारी जाऊन जास्तीत जास्त कालावधीसाठीचा टर्म इंश्युरन्स घेण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून, जास्त कालावधीचे आयुष्य संरक्षित होऊन त्याचा लाभ मिळावा. मात्र संरक्षित रकमेचा आधार नक्की कधी आवश्यक असतो हा 'प्रॅक्टिकल अप्रोच' विचारात घेतला जात नाही.
तुमच्या गैरहजेरीत तुमच्यावर अवलंबून असलेल्या प्रियजनांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त आर्थिक संरक्षण घेणे हा टर्म प्लॅनचा मूळ हेतू आहे. त्यामुळे तुमच्या उमेदीच्या काळात किंवा ज्यावेळी तुमचे परिजन तुमच्यावर जास्त अवलंबून असतील म्हणजेच वय वर्ष ५० किंवा ६० पर्यंत जास्तीत जास्त संरक्षण घेणे फायद्याचे ठरते.
अनेकजण जास्त कालावधी निवडून कमी रक्कम संरक्षित करतात. मात्र आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, तुमचे जसे वय वाढ जाईल तसे तुमच्यावरचे अवलंबित्व कमी होईल. तसेच दरम्यानच्या काळात तुम्ही किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांनी इतरही संपत्ती निर्माण केली असेल त्यामुळे तुमच्या संरक्षित रकमेचा जास्त फायदा होणार नाही.
नॉमिनीची निवड
नॉमिनी आणि वारसदार यात खूप मोठा फरक आहे. जो नॉमिनी असतो त्यालाच पैसे मिळतात हा एक मोठा गैरसमज आपल्याकडे आहे. वास्तविक कायद्यानुसार नामनिर्देशित केलेली व्यक्ती ही त्या संपत्तीची ट्रस्टी असते, मालक नाही. म्हणजेच अशी व्यक्ती फक्त तुमच्या संपत्तीची काळजी घेऊ शकते. आणि तुमच्या कायदेशीर वारसदारांना ही संपत्ती देण्यास वचनबद्ध असेल. मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस हाच त्याच्या संपत्तीचा मालक असतो.
तुमच्या अचानक जाण्याने तुमच्यावर अवलंबून असलेले सदस्य या प्रक्रियेत पडण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसतात. त्यामुळे शक्यतो भाऊ, जवळचा मित्र किंवा जबाबदार आणि विश्वासू नातेवाईकाची नॉमिनी म्हणून निवड केली पाहिजे.
पॉलीसी घेताना कंपनीची निवड
पॉलिसी निवडताना स्टॅंडर्ड आधार किंवा प्रॅक्टिस म्हणून 'क्लेम सेटलमेंट रेशो'ला प्राधान्य दिले जाते. मात्र, यामध्ये आणखीही काही बाबींचा विचार केला पाहिजे. कारण 'क्लेम सेटलमेंट रेशो' हा प्रत्येक वर्षी बदलत असतो. दुसरे म्हणजे, भारतातील सर्वच विमा कंपन्यांचे आयआरडीए मार्फत नियमन केले जाते. त्यामुळे आयआरडीए क्लेम सेटलमेंट प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शी असण्यासाठी लक्ष ठेवून असते.
अर्थातच, अनेकांच्या विश्वासार्हतेला उतरलेला ब्रँड/ कंपनी निवडणे चांगले.
योग्य माहिती द्या !
'लास्ट बट नॉट द लीस्ट' प्रमाणे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रपोजल फॉर्म भरतेवेळी खरी आणि योग्य माहिती द्यावी. जसे की, आरोग्यविषयक माहिती देताना मेडिकल स्थिती, धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय. कारण विमा क्लेम करताना तपासणी वेळी परस्परविरोधी बाबी आढळून आल्यास विम्याचा क्लेम करताना अडचण येऊ शकते.
(अनुवाद - प्रवीण कुलकर्णी)