आगामी काळात एसआयपीद्वारे मोठीच गुंतवणूक होण्याची शक्यता प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी वर्तवली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत झुनझुनवाला यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक यावर दिलखुलास मते व्यक्त केली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने निर्णायक भरारी घेतली असून शेअर बाजारसुद्धा यासाठी अनुकूलच असणार आहे. आगामी 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्तारत मागील पाच वर्षांपेक्षा जास्त वेगाने विस्तारेल, असे मत राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केले आहे.
गुंतवणूक आणि अर्थव्यवस्था यावर पुढे झुनझुनवाला म्हणतात,
म्युच्युअल फंड क्षेत्रामुळे नवीन गुंतवणूकदार बाजारात येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकसुद्धा वाढते आहे. याचाच अर्थ भांडवली पुरवठा आणखी वाढल्यामुळे शेअरच्या किंमतीसुद्धा वाढतील. निवडणूकीनंतर एनडीएचेच सरकार सत्तेत येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत पुढील चार-पाच वर्षात वेगळे काही घडणार नाही. सध्या अर्थव्यवस्थेचा रोख ज्या दिशेने आहे त्याच दिशेने भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास सुरू राहील.
शेअर बाजारात सध्या तेजी आहे. परंतु त्यामुळे अधिक आक्रमकपणे गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आता इतकी आश्वासक परिस्थिती मला माझ्या आयुष्यात याआधी कधीच दिसली नव्हती.
मध्यम वर्गाने एसआयपीच्या माध्यमातूनच इक्विटी प्रकारात गुंतवणूक करावी. मात्र अती मोहात पडून शेअर बाजारातील चढउतारांचा लाभ घेऊन चटकन संपत्ती निर्माण करण्याच्या फंदात पडू नये. विशेषत: बाजारात पैसे ओतून चटकन फायदा मिळवण्याच्या मानसिकतेपासून दूर राहावे. आपल्या उत्पन्नाच्या योग्य प्रमाणात इक्विटी प्रकारात गुंतवणूक करावी. आपल्या मित्राने किंवा कोणा नातेवाईकाने सांगितेल म्हणून एखाद्या कंपनीत गुंतवणूक करू नये.
काही बॅंकांमुळे बॅंकींग क्षेत्राची थोडी पीछेहाट झाली होती मात्र लवकरच त्या बॅंका सावरतील. उद्योग जगताच्या कामगिरीत सातत्य राहण्याची अपेक्षा आहे. मात्र सरसकटच सर्व क्षेत्र चांगलीच कामगिरी करतील असे सांगता येत नाही. गुंतवणूक करताना प्रत्येक कंपनीकडे स्वतंत्ररित्या पाहणे गरजेचे आहे. पुढच्या एक किंवा दोन महिन्यांसाठी गुंतवणूकीची कोणतीही घाई करण्याची माझी इच्छा नाही. मात्र दिर्घकाळात शेअर बाजार सकारात्मकच राहील. अर्थात माझी सर्वच गुंतवणूक याआधीच करून झाली आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी माझ्याकडे आता पैसेच नाहीच.
पुढील पाच ते सात वर्षांचा अवकाश पाहता गुंतवणूकीला चांगलाच परतावा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता अधिक परिपक्व होते आहे आणि अधिक वेगाने विस्तारते आहे. मला यात भांडवली खर्चात होणारी मोठी वाढसुद्धा दिसते आहे. देशात मोठी गुंतवणूक होते आहे. गुंतवणूकीचे आकडेसुद्धा मोठे होत चालले आहेत. अर्थव्यवस्थेची हि दिशा भविष्यातही अशीच सुरू राहील. ही प्रक्रिया आता उलट फिरू शकत नाही.
परकी गुंतवणूकदार भारतासारख्या वेगाने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेत मोठ्या संधीत पाहत आहेत, ते मोठ्या प्रमाणावर आकर्षित होताना दिसत आहेत. मी आजच जगातील सर्वात मोठ्या जाहिरात कंपनीपैकी एक असलेल्या कंपनीच्या अध्यक्षाशी बोललो आहे. त्यांनी मला सांगितले की त्यांनी भारतातील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
सध्या रिझर्व्ह बॅंकेने घेतलेले धोरणही योग्यच आहे. व्याजदरांमध्ये घट करून अर्थव्यवस्थेला आणखी योग्य स्थितीत आणता येऊ शकेल. रस्ते, पूल यासारख्या पायाभूत सुविधआंवर आणखी खर्च करण्याची आवश्यकता आहे. जे गुंतवणूक करण्यात रस दाखवत आहेत त्यांचा उत्साह आणखी वाढवत त्यांना आणखी पैसा गुंतवण्यास सांगितले पाहिजे.
आयबीसीसारख्या घटकांचा देशातील कर्ज वितरणावर योग्य परिणाम होईल. या क्षेत्रात चांगली शिस्त निर्माण होईल. जीएसटीमुळे होणाऱ्या नकारात्मक परिणांमामधून आपण बाहेर पडलो आहोत. बॅकिंग क्षेत्रात सुधारणा होतानाही आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर भांडवली खर्चात वाढ होताना आणि परकी गुंतवणकीत वाढ होतानाही आपल्याला दिसेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेची घोडदौड अशीच सुरू राहणार आहे. अर्थात मला वाटते सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअरवर विश्वास ठेवतो मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवत नाही.