राणा कपूर आणि त्यांची प्रमोटर कंपनी येस कॅपिटल आणि मॉर्गन क्रेडिट्सने येस बॅंकेतील उर्वरित 0.8 टक्के हिस्सा विकला आहे. त्यामुळे येस बॅंकेवरील राणा कपूर यांचे नियंत्रण संपुष्टात आले आहे. राणा कपूर यांची आता येस बॅंकेवर मालकी राहिलेली नाही. येस बॅंकेच्या प्रवर्तकांनी 13-14 नोव्हेंबर दरम्यान त्यांच्याकडे असलेला येस बॅंकेचा हिस्सा म्हणजेच 2.04 कोटी शेअर खुल्या बाजारात विकले आहेत. त्यामुळे राणा कपूर यांच्याकडे येस बॅंकेचे फक्त 900 शेअर राहिले आहेत.
राणा कपूर यांनी येस बॅंकेतील आपला पूर्ण हिस्सा विकल्यानंतर येस बॅंकेच्या शेअरच्या किंमतीत 2.51 टक्क्यांची घसरण होऊन दिवसअखेर बॅंकेचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात 64.20 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. याआधी 26-27 सप्टेंबर दरम्यान येस कॅपिटल, मॉर्गन क्रेडिट्स आणि राणा कपूर यांनी एकत्रितरित्या येस बॅंकेचे 5.52 कोटी शेअर म्हणजेच बॅंकेतील 2.16 टक्के हिश्याची खुल्या बाजारात विक्री केली होती.
सप्टेंबर महिन्यात राणा कपूर यांच्याकडे येस बॅंकेचा 3.92 टक्के तर येस कॅपिटलकडे येस बॅंकेचा 0.8 टक्के हिस्सा होता. प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी 4 नोव्हेंबरला येस बॅंकेचे 1.30 कोटी शेअर म्हणजेच 0.51 टक्के हिस्सा 86.89 कोटी रुपयांना विकत घेतला होता. सप्टेंबर 2018 मध्ये राणा कपूर यांनी त्यांच्याकडे असलेले येस बॅंकेच्या शेअरची तुलना हिऱ्यांशी केली होती.
येस बॅंकेचे शेअर माझ्यासाठी अमूल्य आहेत असे मत राणा कपूर यांनी ट्विटरवरून 28 सप्टेंबर 2018ला व्यक्त केले होते. मी माझ्या वाट्याच्या येस बॅंकेचे शेअर माझ्या तीन मुलींना आणि पुढे त्यांच्या मुलांकडे हस्तांतरित करणार असून आणि त्यांनी त्यातील एकही शेअर कधीही विकू नये अशीच विनंती त्यांना करणार आहे. कारण हिरे हे कायमचेच असतात, असे वक्तव्य राणा कपूर यांनी केले होते. त्यावेळेस राणा कपूर यांच्याकडे येस बॅंकेचे 10.66 टक्के हिस्सा होता आणि येस बॅंकेतील ते सर्वात मोठे समभागधारक होते.