वर्ष 2017 च्या तुलनेत 2018 हे वर्ष शेअर बाजारासाठी खराब गेले. "बीएसई सेन्सेक्स'ने 2017 च्या तुलनेत (28 टक्के) सरत्या वर्षात जेमतेम 6 टक्के परतावा दिला. परंतु, "बीएसई सेन्सेक्स' (फक्त 30 शेअर) म्हणजे तुमचा "पोर्टफोलिओ' नसतो. बहुतेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरसुद्धा असतात. या दोघांनी तर मोठ्या प्रमाणात उणे परतावा दिला. "आयटी' आणि "एफएमसीजी' विभाग सोडला तर इतर सर्व सेक्टर्सनी नकारात्मक परतावा दिला असल्याने बहुतेक गुंतवणूकदारांचा शेअर पोर्टफोलिओ तोट्यामध्ये दिसला तर आश्चर्य नाही. एक वर्षाचा परतावा नकारात्मक असला तरीही 3, 5 आणि 10 वर्षांसाठी शेअर बाजाराने (निफ्टी, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मिळून) साधारपणपणे 15 टक्के परतावा दिला आहे; जो इतर सर्व मालमत्तांच्या तुलनेत (बॅंक एफडी, सोने, रिअल इस्टेट आदी) अधिक आहे. शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा, असे तज्ज्ञमंडळी सांगतात ते यासाठीच!
आज भारतातील 130 कोटी लोकसंख्येपैकी जेमतेम 3.5 कोटीच लोक शेअर बाजारामध्ये सक्रिय आहेत; ज्यांची ट्रेडिंग कम डीमॅट खाती आहेत. एक जानेवारी किंवा एक एप्रिल रोजी नव्या वर्षाचे संकल्प करताना एक तरी "ट्रेडिंग कम डीमॅट' खाते उघडा, असे आवाहन मी सातत्याने करीत आलो आहे. याद्वारे तुम्हाला चांगल्या कंपन्यांच्या "आयपीओ'मध्ये किंवा बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. म्युच्युअल फंड योजनेसाठीही डीमॅट खात्याचा उपयोग होऊ शकतो.
सरत्या वर्षात कोण "हिरो' ठरला, ते आपण पाहिले. आता 2019 या नव्या वर्षात कोणते सेक्टर आकर्षक ठरतील, त्यावर एक नजर टाकूया.
बॅंका आणि त्यातही खासगी बॅंका (उदा. ऍक्सिस बॅंक), पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) क्षेत्रामधील शेअर (उदा. एल अँड टी), रस्ते आणि रेल्वे वाहतूक (उदा. टीटाघर वॅगन), अर्बन कंन्झम्शन (उदा. बाटा इंडिया) असे सेक्टर आकर्षक ठरू शकतात. याशिवाय, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने, जे शेअर वरील सेक्टरमध्ये आहेत, त्यातील बहुतांश शेअर सध्याच्या पातळीवरून वर जातील, असे वाटते.
आकर्षक सेक्टर
बॅंकिंग
इन्फ्रास्ट्रक्चर
रस्ते आणि रेल्वे वाहतूक
अर्बन कन्झम्शन