अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंटचा (आरएनएएम) 3.15 टक्के हिस्सा विकून 505 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. रिलायन्स निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंटची मुख्य प्रवर्तक कंपनी रिलायन्स कॅपिटल आहे. शेअर बाजारात निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंटचे 1.93 कोटी शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. जर मागणी अधिक असेल तर रिलायन्स कॅपिटलला आणखी शेअरची विक्री करण्याचाही पर्याय उपलब्ध असेल.
रिलायन्स निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंटमध्ये रिलायन्स कॅपिटल लि.चा 32.12 टक्के मालकी हिस्सा आहे. तर दुसरी महत्त्वाची प्रवतर्क कंपनी असलेल्या निप्पॉन लाईफ इन्श्युरन्स कंपनीचा 42.88 टक्के मालकी हिस्सा आहे. रिलायन्स निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंटच्या ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 262 रुपये प्रति शेअर असणार आहे. सध्या बाजारात असलेल्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीपेक्षा (285.65 रुपये प्रति शेअर) ही किंमत कमी आहे. रिलायन्स निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंटच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर इतके आहे.
जून महिन्यात रिलायन्स कॅपिटलने रिलायन्स निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंटचे 10.75 टक्के हिस्सा 1,450 कोटी रुपयांना विकला होता. अॅसेट मॅनेजमेंट कंपनीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा किमान हिस्सा 25 टक्के इतका असावा या नियमानुसार प्रवर्तक कंपनीचा हिस्सा कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला होता.