आपला शेअर बाजार सध्या बराच तेजीत असून, निर्देशांकांनी नवे उच्चांकी विक्रम प्रस्थापित केले आहेत. अशावेळी ही तेजी कुठवर टिकणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या "निफ्टी' या निर्देशांकात 10,600 अंशांपासून सुरू झालेली वाढ अजून 11,500 अंशांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात अमेरिका, जपान व भारत या देशातील केंद्रीय बॅंकांची पतधोरण आढावा बैठक होत असून, या बैठकीतून पुन्हा व्याजदरवाढ होईल का, याबाबत शंका राहील. सध्या किरकोळ महागाई दर 4.87 असून, तो अनुमानित सुसह्य पातळीच्या थोडा वर आहे. घाऊक महागाई दर तुलनेने अधिक असला तरी मार्च 2017 च्या 5.99 दराच्या खाली आहे. पावसाचे प्रमाण ठीक असल्याने व कच्या तेलाचे भाव पुन्हा खाली येत असल्याने रिझर्व्ह बॅंक येत्या बैठकीत दरवाढ सुचविण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेत दरवाढ झाली तरी आपल्या बाजाराने या बाबीला अगोदरच गृहीत धरले असल्याने त्याचा आज फार वाईट परिणाम बाजारावर होताना दिसणार नाही.
जून तिमाहीचे निकाल अपेक्षित येत असून, रिलायन्स कंपनीचा निकालही उत्तम आला आहे. निव्वळ नफा 9459 कोटी रुपये असून, विक्री 1,41,699 कोटी आहे. वार्षिक अंतराने यात अनुक्रमे 18 व 56 टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीचे उत्तम निकाल, कच्च्या तेलाच्या भावात घसरण आणि पाऊस ठीकठाक होत असल्याने आपला शेअर बाजार अजून वाढीत राहण्याची शक्यता आहे. जागतिक शेअर बाजारही वाढीत दिसत असून, देशांतर्गत व परकी गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याने 11,500 अंशांजवळ पोचल्यावर "निफ्टी' थांबण्याची शक्यता आहे.
तांत्रिक कल कसा राहील?
मागील शुक्रवारी "निफ्टी' 11,308 अंशांवर बंद झाला असून, या आठवड्यासाठी 11,150 व 11,500 अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. 10,600 अंशांवरून सुरू झालेली सलग वाढ ही जर निफ्टी 11,300 अंशांवर अर्धा दिवस टिकला तर पुढेही 11,500 अंशांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात "निफ्टी'त चढ-उतार राहण्याची शक्यता आहे; जर "निफ्टी' 11,150 अंशांखाली घसरला, तर पुढे 11,000 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता राहील. "बॅंक निफ्टी' 27,500 अंशांच्या वर टिकला तर पुढे 28,000 अंश ही वरची जवळची पातळी असेल.
(डिस्क्लेमर ः लेखकाने स्वतःच्या अभ्यासानुसार वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी "सकाळ' सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर आणि तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)
11,150 व 11,500 अंश या पातळ्या महत्त्वाच्या