सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व वातावरणाचा परिणाम गुंतवणूकदारांवरही होताना दिसत आहे. या निवडणुकीच्या परिणामांविषयी तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. शेअर बाजारातील अल्पकालीन गुंतवणूकदार किंवा "ट्रेडर'ना सध्याच्या अस्थिर वातावरणाची भीती वाटणे स्वाभाविक आहे. पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी सध्याच्या निवडणुकीसारख्या अल्पकालीन घटनांबरोबर वाहावत जाण्याची गरज नाही, कारण अशा घटनांचा फार मोठा परिणाम दीर्घकाळात होत नसतो.
सध्याची लोकसभा निवडणूक ही एक सर्वसाधारण घटना आहे आणि त्याचा परिणाम बाजारावर अल्पकाळ टिकणारा असतो. निवडणुकीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण होत असते, यात शंका नाही. पण अशीच अस्थिरता रुपयाचे अवमूल्यन, कच्च्या तेलाचे वाढते भाव, व्यापारयुद्धाचे सावट, चलनवाढ यासारख्या आर्थिक घटना-घडामोडींमुळेसुद्धा दिसून येत असतेच.
परंतु, हे सर्व अल्पकाळ टिकणारे असते, हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही जर दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करणारे असाल, तर अशा घटनांकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही किंवा त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्याउलट, गुंतवणूकदारांनी अशा घटनांचा उपयोग आणखी गुंतवणूक वाढविण्यासाठी करायला हवा.
आपला दृष्टिकोन कसा हवा?
निवडणुकीच्या काळात आपला दृष्टिकोन कसा असायला हवा, या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी गुंतवणूकदार हे दोन प्रकारचे असतात, हे लक्षात घ्यायला हवे. एक म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूकदार आणि दुसरे अल्पकालीन गुंतवणूकदार.
दीर्घकाळात आपण पाहिले असेलच, की घसरण झाल्यानंतर (करेक्शन) बाजाराने मोठ्या प्रमाणात उसळी मारून पुन्हा नवी उच्चांकी पातळी गाठलेली आहे. एका दशकापूर्वी "सेन्सेक्स' 10 हजार अंशांवर पोचल्यानंतर गुंतवणूकदार त्याकडे संशयी नजरेने बघत होते. "सेन्सेक्स' हा आता "ओव्हर व्हॅल्युड' असून, त्यात मोठी घसरण होईल, असेदेखील त्या वेळी बोलले जात होते.
मात्र, त्यानंतर एका दशकातच "सेन्सेक्स' चौपटीने वाढला. "सेन्सेक्स'ची ही वाढ सरळ रेषेत झालेली नाही. नोटाबंदीसारख्या घटनांमुळे अल्पावधीत त्यातदेखील चढ-उतार झाले होते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी निवडणुकीसारख्या घटनांमुळे बाजारात काही काळ येणाऱ्या अस्थिरतेचा फायदा उठविला पाहिजे. या कालावधीत बाजारात होणाऱ्या प्रत्येक मोठ्या घसरणीकडे "गुंतवणुकीची एक संधी' म्हणून पाहिले पाहिजे आणि प्रत्येक घसरणीच्या वेळी गुंतवणूक वाढवत नेली पाहिजे.
"इक्विटी' हा अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी पर्याय असू शकत नाही आणि त्यामुळेच अल्पकालीन गुंतवणूकदारांनी "इक्विटी' आणि "इक्विटी'शी संबंधित योजनांपासून दूर राहिले पाहिजे. कारण अशा "इक्विटी' योजनांमध्ये निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता येते. अशा वेळी गुंतवणूकदारांनी आपल्या भांडवलाचे रक्षण केले पाहिजे आणि मनी मार्केट फंड किंवा शॉर्ट-टर्म डेट फंडांची निवड करायला हवी.
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोनच ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दलची काळजी करत बसणे गैरलागू ठरते. शिवाय जे गुंतवणूकदार एक दशकाहून अधिक काळ गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी तात्पुरत्या चढ-उतारांमुळे घाबरून जाऊन आपली गुंतवणूक सोने किंवा रिअल इस्टेटसारख्या इतर मालमत्ता वर्गांमध्ये स्थानांतरित करण्याचीही गरज नाही.
लोकसभेच्या गेल्या पाच निवडणुकांपैकी तीन निवडणुकांनंतर शेअर बाजार वधारला होता. 1998, 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शेअर बाजार वधारला, तर 1999 आणि 2004 मध्ये मात्र निवडणुकीनंतर घसरण झाली होती. या पार्श्वभूमीवर, बाजारात अस्थिरता असेल किंवा बाजार "करेक्शन'च्या मूडमध्ये असेल तर या बाजारात प्रवेश करण्याची ही सुवर्णसंधी आहे. जो गुंतवणूकदार अशा बाजारात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून व्यवस्थित गुंतवणूक करेल, तोच भविष्यात यशस्वी होणार, हे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.
भारताचा भविष्यकाळ कसा असेल?
व्यापक विविधता आणि "डेमोग्राफिक डिव्हिडंड'सारख्या गोष्टींची किनार लाभलेल्या भारतासारख्या उगवत्या बाजारपेठेत यशस्वी व्हायचे असेल तर शिस्तबद्ध पद्धतीने "व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग' हाच मार्ग असेल. निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्या सरकारने "इझ ऑफ डुईंग बिझनेस'मध्ये सुधारणा, उत्पादनक्षमतेचा विस्तार, पायाभूत सुविधांची उभारणी आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासारख्या गोष्टींची अंमलबजावणी केल्यास भारत हा देश गुंतवणूक करण्यासाठीचे सर्वांत अनुकूल ठिकाण ठरू शकेल.
आगामी दशकभरात सुमारे 20 कोटी भारतीय नागरिक हे मध्यमवर्गात समाविष्ट होणार आहेत. हा नवमध्यमवर्ग विविध गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत राहील, ज्यायोगे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात प्रचंड संधी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे भविष्यात भारत हा देश अनेक कारणांमुळे गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राहणार, हे नक्की!