नवी दिल्ली, ता. 19 (पीटीआय) ः "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सरलेल्या आर्थिक वर्षातील करबचतीसाठी वाढविण्यात आलेल्या मुदतीचा नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी प्राप्तिकर विवरणपत्राचे फॉर्म सुधारित स्वरुपात आणण्यात येणार आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ही माहिती एका निवेदनाद्वारे आज जाहीर केली.
आर्थिक वर्ष 2019-20 साठीच्या विवरणपत्राचे नवे फॉर्म महिनाअखेरपर्यंत अधिसूचित केले जातील आणि विवरणपत्र दाखल करण्याची सुविधा 31 मेपर्यंत उपलब्ध करून दिली जाईल, असे "सीबीडीटी'ने म्हटले आहे.
"कोराना'मुळे लॉकडाउन झाल्याने सरकारने मागील आर्थिक वर्षातील करबचतीच्या गुंतवणुकीसाठी नागरिकांना 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचा संपूर्ण लाभ करदात्यांना घेता यावा, यासाठी विवरणपत्राचे सुधारित फॉर्म आणण्याचे "सीबीडीटी'ने ठरविले आहे. त्यानुसार संबंधित फॉर्ममध्ये आवश्यक ते बदल वा दुरुस्त्या केल्या जाणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.