विमा नियामक मंडळ आयआरडीएआयने 'फनी' चक्रीवादळाने पीडित भागातील नागरिकांना मोठाच दिलासा दिला आहे. या भागातील विमाधारकांचे क्लेम वेगाने सेटल करण्यात यावे अशी सूचना आयआरडीएआयने विमा कंपन्यांना दिली आहे. ओडीशा आणि शेजारील राज्यांमधील चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांच्या योग्य प्रकरणांची तत्काळ नोंदणी करत त्यांच्या विमा प्रकरणाची वेगाने तड लावण्याची सूचना इन्श्युरन्स रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) दिल्या आहेत.
फनी चक्रीवादळामुळे ओडीशा आणि शेजारील राज्यात मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानी झाली आहे. सध्या त्या परिसरात यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मृत्यूचा दाखला मिळवताना अडचणी येत आहेत. बऱ्याच ठिकाणी मृतदेहच हाती आलेले नाहीत. त्यामुळे याचा फटका बसलेल्या नागरिकांना मोठ्या आधाराची आवश्यकता आहे.
चेन्नईतील महापूराच्या वेळेससुद्धा याच प्रकारे द्रुतगतीने विमा प्रकरणे हाताळण्यात आली होती. विमा कंपन्यांनी यासंदर्भात विमाधारकांना योग्य ती सुविधा आणि मदत पुरवावी असेही आयआरडीएआयने सांगितले आहे.