भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) गुंतवणूक पोर्टफोलिओ 2018-19 या आर्थिक वर्षाअखेर 29.3 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा पोर्टफोलिओ 16 लाख कोटी रुपये इतका होता. या पोर्टफोलिओमध्ये वार्षिक चक्रवाढ 12.8 टक्के वाढ झाली आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती आली आहे.
मात्र भारतीय आयुर्विमा महामंडळाला 2018-19 या आर्थिक वर्षात गुंतवणुकीतून 7.59 टक्के इतकाच परतावा मिळाला आहे. मागील आठ वर्षांतील हा सर्वात निचांकी परतावा आहे. वार्षिक पातळीवर हा परताव्याचे प्रमाण 12 बेसिस पॉईंटने घसरले आहे.
सरकारी कर्जरोख्यातून भारतीय आयुर्विमा महामंडळाला मिळणारा परताव्याचा मागील 10 वर्षांच्या संदर्भात विचार करता, 2017-18 मध्ये हे प्रमाण 31 बीपीएस इतके होते. 2018-19 या आर्थिक वर्षात यात घट होऊन ते 24 बीपीएसवर आले आहे. हे प्रमाण मागील पाच वर्षांतील सर्वात निचांकी स्तरावर आहे. व्याजदरांमधील घट आणि घसरलेले औद्योगिक उत्पादन याचा विपरित परिणाम बॉंडमधून मिळणाऱ्या परताव्यावर झाला आहे.
मोठ्या प्रमाणावर करण्यात येणाऱ्या इक्विटीमधील गुंतवणुकीसाठी योग्य शेअरची निवड करणे हे भारतीय आयुर्विमा महामंडळासारख्या मोठ्या गुंतवणुकदारांसाठी एक आव्हानच आहे. टॉप 100 कंपन्यांच्या शेअरपलीकडे जाऊन विचार करायचा झाल्यास शेअर बाजारातील उपलब्ध पर्याय मर्यादितच आहेत, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.