भारतातील पहिल्या कॉर्पोरेट बॉंड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)च्या इश्यूला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. भारत बॉंड ईटीएफचा इश्यू 12 डिसेंबरला खुला झाला होता आणि 20 डिसेंबरला त्याची अंतिम मुदत होती. गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे इश्यूला 1.7 पट प्रतिसाद मिळाला आहे. कॉर्पोरेट बॉंड ईटीएफमधून 12,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे.
या नव्या फंड ऑफरच्या माध्यमातून सरकारचे 15,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या ऑफरचे व्यवस्थापन एडेलवाईस अॅसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे करण्यात आले आङे. या कॉर्पोरेट बॉंड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची किमान रक्कम 1,000 रुपये इतकी आहे. या इश्यूची बेस साईझ 7,000 कोटी रुपयांची आहे.
या ईटीएफच्या माध्यमातून फक्त एएए मानांकन असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या बॉंडमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या ईटीएफचा गुंतवणूक कालावधी तीन वर्ष आणि दहा वर्ष असे असणार आहे. तीन वर्ष मुदत असणाऱ्या बॉंडचा परतावा 6.69 टक्के आणि दहा वर्ष मुदत असलेल्या बॉंडचा परतावा 7.58 टक्के असणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांसाठीच्या कॅबिनेट समितीने 4 डिसेंबरला भारत बॉंड ईटीएफला मंजूरी दिली होती.