तुम्हाला तुमचे विद्यमान डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बदलून घेण्यासाठी बँकेकडून विचारणा करण्यात आली आहे? मात्र, तुम्ही ते अजून बदलून घेतले नसेल तर तुम्हाला बँकेशी संपर्क करून लवकरात लवकर बदलून घेणे गरजेचे आहे. कारण भारताची मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया -आरबीआयने या संदर्भातील एक परिपत्रक जाहीर केले असून, ज्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) आहे अशी कार्ड ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून देण्यास भारतातील सर्व बँकांना सांगण्यात आले आहे.
'ईएमव्ही' कार्ड आणि त्याचे महत्व
ईएमव्ही म्हणजे युरो-पे, मास्टरकार्ड आणि व्हिसा. म्हणजेच तीन स्वतंत्र कंपन्यांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन हे नाव देण्यात आले आहे. याला 'चिप कार्ड' किंवा 'चिप आणि पिन' कार्ड असे देखील संबोधले जाते.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे कार्ड अधिक सक्षम असणार आहे. 'पॉईंट ऑफ सेल (पीओएस)' वर एखादा व्यवहार करताना हे कार्ड स्वाईप केल्यास तुम्हाला 'पिन' टाकणे बंधनकारक आहे. यामुळे व्यवहाराला अधिक संरक्षण दिले जाणार आहे. जुन्या म्हणजे मॅग्नेटिक स्ट्रीप असलेल्या कार्डवर पिन टाकणे गरजेचे नव्हते.
सर्वात महत्वाचे म्हणजे, हे कार्ड 'स्किमिंग किंवा क्लोनिंग' प्रतिबंधित असल्याने या कार्डाचे 'डुप्लिकेट' बनवून व्यवहार करता येत नाही. (डेबिट कार्डाचे क्लोनिंग करून नुकताच झालेले कॉसमॉस बॅंकेतील हॅकिंग यासारख्या बाबींना यामुळे आळा बसणार आहे.)
जगभरात डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून गैरव्यवहार करण्याचे प्रकार वाढले आहेत. कारण, हॅकर्सने ज्या ठिकाणी क्लोनिंग करणारे सॉफ्टवेअर अपलोड केले आहे त्या ठिकाणी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड वापरल्यास ग्राहकाची सर्व 'स्टॅटिक' माहिती हे सॉफ्टवेअर कॉपी करून घेते व त्याच्या मदतीने डुप्लिकेट कार्ड बनविणे सोपे जाते. मात्र, ईएमव्ही कार्ड मध्ये ग्राहकाच्या स्टॅटिक माहितीऐवजी डायनॅमिक माहितीचा वापर असल्यामुळे डुप्लिकेट कार्ड्स बनविणे अवघड जाणार आहे.