मिरॅ अॅसेट टॅक्स सेव्हर फंड हा ईएलएसएस फंड गटातील उत्तम परतावा असलेला फंड आहे. सरलेल्या वर्षात 28 डिसेंबर रोजी फंडाने तीन वर्ष पूर्ण केले आहे.
फंडाने सुरुवातीपासून 16.92 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. फंडाच्या ‘फॅक्टशीट’नुसार फंडाची मालमत्ता 1209 कोटी आहे. प्राप्तिकर कलम 80 (सी) च्या उपलब्ध पर्यायांपैकी ईएलएसएस फंड या गुंतवणूक साधनाने सर्वाधिक परतावा दिला आहे. मागील दहा वर्षांत ईएलएसएस फंडांनी करबचतीव्यतिरिक्त वार्षिक 18.34 टक्के वृद्धी दर राखला आहे. बाजारातील चढ-उतारांना निर्धारपूर्वक सामोरे गेल्यास ईएलएसएस फंडाच्या गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्य आहे.
फंडाच्या ‘फॅक्टशीट’नुसार फंडाने सर्वाधिक 73.57 टक्के गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये 23.15 टक्के गुंतवणूक मिड कॅपमध्ये, 2.09 टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप तर उर्वरित गुंतवणूक आभासी रोकड प्रकारात केली आहे. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्र बँक या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या पाच कंपन्या आहेत. पहिल्या पाच गुंतवणुका जास्त केंद्रित असल्या तरी उर्वरित गुंतवणुकांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. फंडाने पहिला लाभांश मार्च 2017 मध्ये (0.50 टक्के) दुसरा मार्च 2018 (1.25 टक्के) तर तिसरा लाभांश डिसेंबर 2018 (0.55 टक्के) जाहीर केला आहे. ज्या कोणी तीन वर्षांपूर्वी फंडाच्या पहिल्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार 1.5 लाखाची गुंतवणूक केली असेल त्यांच्या गुंतवणुकीचे 19 डिसेंबर 2018 च्या एनएव्हीनुसार 2.52 लाख रुपये झाले आहेत.
--------------------------------------------------
फंडात गुंतवणूक का करावी?
- दीर्घकालीन भांडवली वाढ
- . प्राप्तिकर कलम 80 (सी) च्या उपलब्ध पर्यायांपैकी ईएलएसएस फंड या गुंतवणूक साधनाने सर्वाधिक परतावा
---------------------------------------------------
फंड मॅनेजर:
नीलेश सुराणा हे फंडाचे निधी व्यवस्थापक असून ते मिरॅ अॅसेट टॅक्स सेव्हर फंडासोबत मिरॅ अॅसेट इंडिया इक्विटी फंड, मिरॅ अॅसेट इमर्जिग ब्ल्यूचीप फंड आणि मिरॅ अॅसेट हायब्रीड इक्विटी फंड या फंडांचे निधी व्यवस्थापक आहेत. वर्ष 2008 ते 2018 या कालावधीत नीलेश सुराणा निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांची कामगिरी लखलखीत राहिलेली आहे. दर्जेदार उत्पादने असलेल्या कंपन्या, उत्तम व्यवस्थापन आणि आकर्षक मूल्यांकन ही निधी व्यवस्थापकांची यशाची त्रिसूत्री आहे.