म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, चालू आर्थिक पहिल्याच महिन्यात म्हणजे एप्रिल 2018 मध्ये गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये तब्बल 12,400 कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पैशांचा ओघ आल्याने इक्विटी म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) सहा टक्क्यांहून अधिकने वाढून एप्रिलअखेर आठ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचली आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (ऍम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. एप्रिलमध्ये इक्विटी योजनांमध्ये पैशाचा निव्वळ ओघ 86.40 टक्क्यांनी वाढून 12,409 कोटी रुपयांवर पोचला आहे. त्याआधीच्या म्हणजे मार्चमध्ये तो 6,657 कोटी रुपये होता. देशातील 42 म्युच्युअल फंड कंपन्यांकडील एकत्रित "एयूएम' मार्चमधील 21.36 लाख कोटींवरून आता 23.25 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
मार्च 2018 रु. 6,657 कोटी
एप्रिल 2018 रु. 12,409 कोटी