मुंबई: म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) एप्रिलमध्ये 1.37 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. भारतात सध्या असलेल्या 42 म्युच्युअल फंड कंपन्यांकडील मालमत्ता (एयूएम) 23.25 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात कॉर्पोरेट्सने आपल्याकडील अतिरिक्त निधी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून लिक्विड फंडात 1.16 लाख कोटी रुपये गुंतवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून इन्कम फंडातील निधी बाहेर काढला जात होता मात्र आता त्यात 5,200 कोटी रुपयांचा निधी ओतला गेला आहे.
सरलेल्या वर्षात इक्विटी, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, ईएलएसएस आणि इन्कम फंडांद्वारे 2.69 लाख कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडाकडे आला आहे. केंद्र सरकारने एप्रिलपासून 10 टक्के लाभांश कर लावल्यामुळे याकाळात बॅलन्स फंडातील गुंतवणूक 6,754 कोटी रुपयांवरून कमी होऊन 3,500 कोटीं रुपयांवर पोचली आहे. एप्रिलमध्ये इक्विटी एमएफ योजनांमध्ये पैशाचा निव्वळ ओघ 86.40 टक्क्यांनी वाढून 12,409 कोटी रुपयांवर पोचला आहे. जो मार्चमध्ये 6,657 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये 9,429 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. अशा प्रकारे म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये विक्रमी गुंतवणूक होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.