- रोशन थापा , बिझनेस हेड, सकाळ मनी
मागील काही महिने शेअर बाजारासाठी आश्चर्यकारक असे होते. कोरोना महामारीमुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. तात्पुरते कोविड 19च्या घटनेकडे दुर्लक्ष करून शेअर बाजाराच्या घडामोडींकडे पहिले असता हा कालावधी खूपच रोमांचक असा होता हे जाणवेल. 20 जानेवारी रोजी शेअर बाजार (सेन्सेक्स ) 42,273च्या सर्वोच्च पातळीवर पोचला होता. परंतु, महिन्यापेक्षा कमी कालावधीतच, शेअर बाजारात मोठे करेक्शन येऊन बाजार 40 टक्कयांनी खाली घसरला. मात्र तो तेथेच थांबला नाही. काहीच कालावधीमध्ये त्यात 25 टक्क्यांनी सुधार देखील झाला.
शेअर बाजारात रोलर कोस्टर राइडचा अनुभव, बरोबर?
शेअर बाजारात आलेल्या अस्थिरतेमध्ये अनेक जनांनी कमाई करून घेतली. मात्र, बहुतांश लोकांना (विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांनी) थेट इक्विटी किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती गमवावी लागली. अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे पुढे काय? गुंतवणूकदारांचा यापुढे गुंतवणुकीबाबत दृष्टिकोन कसा असला पाहिजे यावर सकाळ मनीने अभ्यासपूर्ण रणनीती तयार केली आहे.
कोविड १९च्या प्रभावापासून वाचण्यासाठी किंवा गुंतवणुकीचे रक्षण करण्यासाठी गुंतवणूकदारांनी काय करावे?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या उद्रेकामुळे भारतीय बाजारपेठेत आलेल्या मंदीने गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. मात्र याकडे सकारात्मकतेने पाहिल्यास, महामारीने सर्व भांडवली नफा पुसून टाकला असल्याने कर उत्तरदायित्वाचा प्रश्न निकाली निघाला आहे.
बाजाराची वर्तमान स्थिती लक्षात घेता गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये खालीलप्रमाणे बदल करून घेतले तर येणाऱ्या रिकव्हरीच्या काळात त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे.
पोर्टफोलिओतील अॅसेट अॅलोकेशनचे पुनरावलोकन करा
इक्विटी बाजारामध्ये झपाट्याने झालेल्या घसरणीमुळे पोर्टफोलिओच्या एकूण मालमत्ता मूल्यांकनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता देखील बदलली आहे. अशावेळी आपल्या पोर्टफोलिओच्या मालमत्तेचे नव्याने संतुलन करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून तुमचे गुंतवणूक उद्दीष्ट आणि जोखीम पातळी लक्षात येईल.
उदा. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि सोन्याचे प्रमाण 50:50 असेल तर ते आता 40:60 असे झाले असेल. परंतु यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तुमची जोखीम घेण्याची क्षमता प्रतिबिंबित करत नाही. त्यामुळे तुम्ही नव्याने काही गुंतवणूक इक्विटीमध्ये करून पुन्हा हे प्रमाण 50:50 केले पाहिजे.
इक्विटीमध्ये गुंतवणूक कशी कराल?
इक्विटी मार्केटमधील अस्थिरता तुमच्या लक्षात आलीच आहेच. त्यामुळे इक्विटीत गुंतवणूक करताना तात्पुरत्या फायद्याचा दृष्टिकोन उपयोगी येणार नसून स्थिर दृष्टिकोनच असणे गरजेचा आहे. स्थिर दृष्टिकोनामुळे कदाचित दोन-तीन दिवसांमध्ये येणारी तेजी किंवा नफा मिळू शकणार नाही मात्र दीर्घ मुदतीत सरासरी पातळीवर ही कसर सहज भरून निघेल.
महत्त्वाचे: जर तुम्हाला एकाच अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे पुरेशी लिक्विडीटी आहे याची खात्री करा.
अल्फा जनरेट करण्याची क्षमता असणारे फंड निवडा
सकारात्मक परताव्याच्या आशेने बऱ्याचदा अनेक गुंतवणूकदार जोखीम असणाऱ्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करतात आणि ती धरून ठेवतात. मात्र फंडाची कामगिरी चांगली नसताना देखील गुंतवणूक अडकून ठेवणे म्हणजे आपल्या पैशांनी आपल्यासाठी जितके कष्ट केले पाहिजेत तितके ते करत नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वर्तमान अस्थिरतेकडे सकारात्मकतेने पाहून नव्याने सुरुवात करण्याची हीच योग्य संधी आहे
महत्त्वाचे : गुंतवणूक करताना एखादा फंड खूपच चांगली कामगिरी करत आहे म्हणून कुठलीही माहिती न घेता आंधळेपणाने त्यात गुंतवणूक करणे टाळा. , कोणताही परतावा शाश्वत स्वरूपाचा नसतो. गुंतवणूक करताना नेहमी फंडाचे सखोल विश्लेषण करणे गरजेचे आहे. फंडाच्या कामगिरीत सातत्य, अल्फा सुसंगतता, बीटा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो, पोर्टफोलिओ अॅलोकेशन आणि फंडामागील टीम या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे.
नीटनेटका पोर्टफोलिओ असण्यावर भर असावा
अनेक गुंतवणूकदार शेअर खरेदी केल्याप्रमाणे म्युच्युअल फंड खरेदी करतात. परिणामी पोर्टफोलिओमध्ये योजनांचा ढीग जमा झालेला असतो. म्युच्युअल फंडांमध्ये सरासरी सुमारे 40 ते 60 शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असते. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खूप योजना असतील तर तुमची गुंतवणूक जवळपास सर्वच शेअरमध्ये केलेली असल्याने तुम्हाला ज्यासाठी आपण गुंतवणूक करतो तो अल्फा फॅक्टर हाती येणार नाही. त्यामुळे गुंतवणूकीतील अस्ताव्यस्तपणा टाळून एकत्रित आणि ठोस पद्धतीने गुंतवणूक करण्याकडे कल असावा. यामुळे योजना अधिक चांगल्या प्रकारे ट्रॅक करण्यास आणि पोर्टफोलिओचे संतुलन राखण्यास मदत होईल.
क्रेडिट रिस्क फंड
जागतिक पातळीवरील नावाजलेली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी फ्रँकलिन टेंपल्टनला नुकतेच काही डेट फंडातील योजना बंद कराव्या लागल्या. यावरून अर्थव्यवस्थेतील तरलतेची परिस्थिती खालावून भारताची पत /क्रेडिट परिस्थिती कशाप्रकारे बिघडली आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
फ्रँकलिन टेंपल्टनने बंद केलेल्या योजना खालीलप्रमाणे :
फ्रँकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बॉन्ड फंड
फ्रँकलिन इंडिया लो ड्युरेशन फंड
फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म इन्कम प्लॅन
फ्रँकलिन इंडिया डायनॅमिक अॅशक्रूअल फंड
फ्रँकलिन इंडिया इन्कम ऑपॉर्च्युनिटी फंड
फ्रँकलिन इंडिया क्रेडिट रिस्क फंड
(संदर्भ : फ्रँकलिन टेंपल्टन)
शेअर बाजाराच्या घसरणीने घाबरलेले गुंतवणूकदार, विशेषत: रिटेल गुंतवणूकदार भोवतालच्या नकारात्मकतेमुळे गुंतवणूक काढून घेत आहेत. फंड हाऊसने बंद केलेल्या फंडांचा सखोल अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले आहे की या सर्वच फंडांमधील जोखीम खूपच जास्त होती. या फंडांमध्ये कोरोना सारख्या बाह्य धक्यांमध्ये सावरण्याची क्षमता नव्हती. इतर फंड तुलनेने कमी जोखमीचे आहेत त्यामुळे त्यातून गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता कमी आहे.
विद्यमान म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय?
गुंतवणूकदार म्हणून खालील मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे .
• घाबरून जाऊ नका ; रणनीती तयार करा
घाईघाईने कोणताही निर्णय घेण्याऐवजी व्यवस्थित रणनीती आखणे केंव्हाही चांगले. क्रेडिट जोखीम कमी करून सुरक्षित फंडांमध्ये गुंतवणूकीचा विचार केला पाहिजे. येत्या काळात एनबीएफसी क्षेत्रामध्ये नोकर कपात किंवा व्यवसाय बंद किंवा पेमेंट डिफॉल्ट झाले तर मात्र म्युच्युअल फंडाची परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशा परिस्थितीत संतुलित, अधिक सुरक्षित पोर्टफोलिओ शोधले पाहिजेत ज्यामध्ये जास्त परताव्याची अपेक्षा करून कमी रेटिंगच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केलेली नसेल. कॉर्पोरेट बाँड्स, बँकिंग आणि पीएसयू बाँड फंड सारख्या काही योजना सुरक्षित मानल्या जाऊ शकतात.
• म्युच्युअल फंडांच्या बचावासाठी आरबीआय सरसावली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड उद्योगाच्या मदतीला धावून आली असून बँकेने 50 हजार कोटी रुपयांचे विशेष तरलता पॅकेज जाहीर केले आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होऊन काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याची खात्री पटली आहे. आम्हाला खात्री आहे की म्युच्युअल फंडात नव्याने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार किमान कोरोना महामारीचा प्रभाव कमी होईपर्यंत डेट फंडांमध्ये (विशेषत: उच्च-जोखीम असलेल्या डेट फंडांमध्ये) गुंतवणूक करताना सावध राहतील आणि विद्यमान गुंतवणूकदार त्यांचा पोर्टफोलिओ समान /सरासरी पातळीवर आणण्याचा आणि अभ्यास करूनच गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतील.
एनएफओची बाजारातील परिस्थिती काय आहे?
शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका न्यू फंड ऑफरला (एनएफओ) बसला आहे. परिणामी एनएफओंची संख्या जानेवारी महिन्यातील 11 वरून मे महिन्यात 2 वर आली आहे.
सकाळ मनी आऊटलूक
कोरोना प्रादुर्भावामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने त्याचा शेअर बाजारावर परिणाम होऊन म्युच्युअल फंडांमधील परताव्याला मोठा फटका बसला आहे. परंतु इतिहासात डोकावल्यास आपल्या लक्षात येईल की अशा परिस्थितीनंतर शेअर बाजार आणि फंड परताव्यांनी मोठी उसळी घेतली आहे. हे लक्षात ठेवून, गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक सुरूच ठेवून स्थिर दृष्टीकोन बाळगावा. तुम्हाला देखील तुमच्या पोर्टफोलिओचे संतुलन करण्यासाठी किंवा पुनर्रचना करण्यासाठी कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास निःसंकोचपणे आमच्या रिलेशनशिप मॅनेजरशी त्वरित संपर्क साधा आणि विनामूल्य डिजिटल वेल्थ कॅम्पसाठी नोंदणी करून पूर्ण निःपक्षपातीपणे पोर्टफोलिओची आरोग्य तपासणी करून घ्या. अधिक माहितीसाठी सकाळ मनीच्या सोशल मीडियावर - फेसबुक आणि लिंक्डइनवर जाऊन आमचे पेज लाईक करा आणि गुंतवणुकीसंदर्भातील घडामोडींबाबत अद्ययावत रहा.