मुंबई, ता. 9 (वृत्तसंस्था) : म्युच्युअल फंडांतील एकूण
गुंतवणूक (गंगाजळी) नोव्हेंबरअखेर 27.04 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
ऑक्टोबरअखेरच्या पातळीवरून त्यात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.
ऑक्टोबर
महिन्यात म्युच्युअल फंडांतील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) 26.33 कोटी
रुपये होती. नोव्हेंबर महिन्यात समभागात गुंतवणूक करणाऱ्या (इक्विटी) फंडातील
गुंतवणुकीला मात्र ओहोटी लागल्याचे म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असलेल्या
"असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया'च्या (ऍम्फी) सोमवारी प्रसिद्ध झालेल्या
आकडेवारीनुसार समोर आले आहे. गेल्या महिन्यात म्युच्युअल फंडामध्ये एकूण 54 हजार
419 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्याआधीच्या ऑक्टोबर महिन्यात 1.33 लाख कोटी
रुपयांची गुंतवणूक झाली होती. नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी
अस्थिरता दिसून आली. एका बाजूला "क्रेडिट रिस्क फंडा'मधून गुंतवणूकदारांनी पैसा
काढून घेतला तर "इक्विटी' प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीत 85
टक्क्यांची घट झाली. नोव्हेंबरमध्ये "इक्विटी' प्रकारातील योजनांमध्ये 933 कोटी
रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हा गेल्या तीन वर्षांतील नीचांक आहे.
नोव्हेंबर
महिन्यात "इक्विटी' प्रकारातील गुंतवणुकीत मोठी घट झाली आहे. यात गुंतवणूकदारांनी
नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक काढून घेणे हेसुद्धा एक कारण आहे. तरीसुद्धा म्युच्युअल
फंड व्यवसायातील एयूएम 27 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे, असे ऍम्फीच्या आकडेवारीवरून
स्पष्ट झाले आहे.
उद्दिष्टावर आधारित दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच्या
"एसआयपी'सारख्या गुंतवणूक प्रकारातील गुंतवणुकीत गुंतवणूकदारांकडून सातत्याने वाढ
होत आहे. "एसआयपी'द्वारे केलेली एकूण गुंतवणूक 3.12 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे.
ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे.
- एन. एस. वेंकटेश, मुख्य कार्यकारी
अधिकारी, ऍम्फी