इतिहासामध्ये किंवा दंत कथामध्ये शुद्धता, सात्त्विकता किंवा एकमेकाद्वियता असे वर्णन करण्यासाठी 'युनिकॉर्न' या एकशृंगी घोड्याचे वर्णन केले आहे. थोडक्यात हजारातील एक म्हणून त्याचे वेगळेपण दाखविण्यासाठी 'युनिकॉर्न' ही कल्पना केली जाते. उद्योग विश्वात देखील ही संकल्पना रुळलेली आहे. एखादया स्टार्टअप कंपनीचे मूल्य 1 बिलियन डॉलर झाले की तिला 'युनिकॉर्न' कंपनी म्हटले जाते. 10 बिलियन साठी 'डेकाकॉर्न' आणि 100 बिलियन डॉलरच्या कंपनीसाठी 'हेक्टाकॉर्न' अशा प्रकारची संकल्पना अमेरिकन व्हेंचर कॅपिटॅलिस्ट (गुंतवणूकदार) अलेन ली या महिलेने 2013 साली आणली. 'युनिकॉर्न' कंपनीचा 'टॅग' मिळवणं हे काही वर्षांपूर्वी अतिशय अवघड गोष्ट समजली जायची. मात्र, आता नवनवीन कल्पनांना व्यावसायिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याने 'युनिकॉर्न' कंपन्यांची संख्या वाढत आहे. देशभरातील अशाच काही कंपन्यांची माहिती घेऊ.
पॉलिसीबझार
गुरगाव, हरियाणा येथे मुख्यालय असलेली ही कंपनी ऑनलाईन विमा विक्री क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचबरोबर पैसाबझार या फायनान्स कंपनीच्या साथीने कंपनीने युनिकॉर्नचा टप्पा केंव्हाच पार केला आहे. याशिष दहिया हे कंपनीचे सीईओ आहेत.
डेल्हीव्हरी
मे 2011 साली गुरगाव, हरियाणा येथे सुरुवात केलेल्या स्टार्टअपने मोठी मजल मारली आहे. लॉजिस्टिक्स व्यवसायात कार्यरत हे स्टार्टअप लवकरच आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. साहिल बरुआ, मोहित टंडन, भावेश मंगलाणी, सूरज सहारन, कपिल भारती यांनी एकत्र येत या स्टार्टअपची पायाभरणी केली आहे.
पाइन लॅब्स
पाइन लॅब्स ही डिजिटल पेमेंट क्षेत्रात कार्यरत आहे. रिटेल पीओएस (पॉइंट ऑफ सेल) डिजिटल व्यवहारात देशातील प्रमुख स्टार्टअप म्हणून कंपनीकडे पहिले जाते. व्हिसा आणि मास्टरकार्ड कंपन्यांचा दांडगा अनुभव असलेल्या विक्की बिंद्रा हे कंपनीचे सीईओ आहेत.
ओयो रूम्स
स्वस्त दरात ग्राहकांना राहण्याची सोय करण्यासाठी ओळखले जाणाऱ्या 'ओयो रूम्स'चा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. कंपीनीने चीन, इंग्लंड इत्यादी देशात आपला व्यवसाय विस्त्रायला सुरुवात केली आहे. वयाच्या 20 व्या वर्षी 2013 मध्ये स्टार्टपला सुरुवात केल्यानंतर रितेश अग्रवाल यांनी केलेला कंपनीचा विस्तार अचंबित करणार आहे.
स्विगी
युनिकॉर्न क्लब मध्ये अवघ्या चार वर्षात प्रवेश मिळविलेल्या स्विगीची कामगिरी थक्क करणारी आहे. फूड टेक्नॉलॉजी क्षेत्रात सरावात वेगाने वाढणारी कंपनी म्हणून स्विगीकडे पहिले जाते. व्यवसाय स्वरूपात बदल केल्यानंतर कंपनीला प्रचंड मोठा फायदा झाला आहे. श्रीहर्ष मजेटी, नंदन रेड्डी आणि राहुल जैमिनी हे स्विगीचे सह-संस्थापक आहेत.
बैजू
आपल्याकडे असलेल्या कलेला नाविन्याची आणि कल्पकतेची जोड दिल्यास नवीन यशस्वी व्यवसाय कसा अल्पावधीत स्थिरावतो याचे काळातील उदाहरण म्हणजे बैजू. शिकवण केलेला / टिचिंगला आधुनिकतेची जोड दिलेल्या शिक्षण क्षेत्रातील स्टार्टअपने अवघ्या तीन वर्षात युनिकॉर्न कंपनीचा टप्पा गाठला आहे. बैजू रविन्द्रन या आधुनिक काळातील शिक्षकाने ही किमया साधली आहे.