महिला विविध क्षेत्रात आघाडीवर असून त्यात त्यांनी ठसा उमटविला आहे. वित्तीय आणि विमा क्षेत्रदेखील याला अपवाद नाही. विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या "एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड'च्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर यांच्याशी "सकाळ'ने केलेली बातचीत...
प्रश्न: आयुर्विम्याकडे सुरक्षेचे साधन म्हणून बघावे की गुंतवणुकीचे? काय सांगाल?
उत्तर: कुटुंबासाठीच्या आर्थिक नियोजनातील विमा ही अतिशय महत्त्वाची व पहिली पायरी आहे. आयुर्विमा हे असे एकमेव आर्थिक साधन आहे जे संरक्षणासह दीर्घ मुदतीच्या बचतीचा दुहेरी लाभदेखील देते. मात्र, मुख्यतः सुरक्षेचे साधन म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. आयुर्विम्याचे दोन प्रकार आहेत. पारंपरिक आणि युनिट लिंक्ड. पारंपरिक योजना प्रामुख्याने "डेट इन्स्ट्रुमेंट' मध्ये गुंतवणूक करतात तर युनिट लिंक्ड योजना इक्विटीला प्रोत्साहन देतात. पारंपरिक योजनामध्ये जोखीम नसते, पण रिटर्नस् बेताचेच असतात. परंतु, ज्यांची जोखीम घेण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठी युनिट लिंक्ड योजना हा पर्याय आहे जिथं अधिक चांगले रिटर्नस् शक्य असतात. मात्र, मी असं म्हणेन की त्याबरोबरच आपल्या कुटुंबासाठी विमा सुरक्षा कवच घेणे जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी टर्म इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्समध्ये विमाधारक निश्चित स्वरूपाचा प्रिमियम ठरावीक मुदतीसाठी भरतो आणि या काळात मृत्यू ओढवल्यास त्याच्या कुटुंबासाठी मोठ्या रकमेची तरतूद करतो.
प्रश्न: आयुर्विमा घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
उत्तर: आयुर्विमा पॉलिसी घेताना त्या योजनेचे फायदे, संभाव्य परतावा आणि जोखीम या बाबी वाचून आणि नीट समजून घेणे आवश्यक आहे. प्रथम आपला आयुर्विमा विमा घेण्याचा उद्देश निश्चित करा आणि मग त्या योजनेची वैशिष्ट्ये त्याच्याशी जुळतात का हे पडताळून पहा. पॉलिसी दस्तऐवज मिळाल्यानंतर त्यात नमूद केलेले फायदे, विमा रक्कम, मुदत, प्रिमियमचा हप्ता इत्यादी गोष्टी तपासून पाहून बरोबर असल्याची खात्री करून घ्या. जर एखादी व्यक्ती विमा योजनेचे फायदे, तरतुदी याबाबत समाधानी नसेल तर पॉलिसी परत देऊन कंपनीकडून पैसे परत घेऊ शकतो. मात्र, हा हक्क पॉलिसी मिळाल्यापासून दिवसाच्या 15 आतच (फ्री लुक कालावधीतच) बजावता येतो.
प्रश्न: आयुर्विमा क्षेत्रात काय महत्त्वाचे बदल होत आहेत?
उत्तर : ग्राहकांसाठी आता व्यवसाय आणि कामकाजाची पद्धत बदलली आहे. पूर्वी "उत्पादन केंद्रित मॉडेल' होते. ते आता बदलून ग्राहक केंद्रित मॉडेल करण्याकडे भर देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांची गरज ओळखून आणि त्यांना काय हवे हे जाणून त्याप्रकारे योजना आणि सेवा दिल्या जात आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाने आयुर्विमा घेणे गरजेचे आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे...म्हणजे अगदी कौटुंबिक पातळीपासून ते अगदी "बिझनेस वूमन'पर्यंत. ती घरापासून व्यवसायापर्यंत सगळ्यांची काळजी घेते. म्हणूनच प्रत्येक महिलेने विम्याच्या संदर्भातही जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.
प्रश्न: सध्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि लोकसंख्येकडे पाहता, लहान शहरे आता महानगरांच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सर्वांसाठी आयुर्विम्याची आवश्यकता पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे. मात्र, आयुर्विम्याबाबत जागरूकता अजूनही दिसत नाही. का?
उत्तर: केंद्र सरकारने सर्वांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय), पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची (पीएमजेजेबीवाय) सुरुवात केली आहे. यामुळे विम्याबद्दल तळागाळापर्यंत जागरूकता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, लोक अजूनही वाहनाबाबत जागृत असतात, वाहनाचा विमा करतात. मात्र, आयुर्विमा घेणे टाळतात. त्यामुळेच मला वाटते की, प्रत्येक व्यक्तीचे किमान मुदतीचे विमा संरक्षण असणे अनिवार्य असायला हवे. सरकारने सुरक्षा आणि आरोग्य यांसारख्या प्राथमिक गरजांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच लोक याबाबत जागरूक होतील.

प्रश्न: भारतात बहुतेक लोक संयुक्त कुटुंबात राहत होतो, आता हा कल हळूहळू कमी होत विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येत आहे. संयुक्त कुटुंब प्रणालीमुळे आयुर्विम्याच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष झाले का? यावर आपले मत काय आहे.
उत्तर: व्यवसायाच्या आणि नोकरीच्या चांगल्या संधी आणि चांगल्या जीवनशैलीच्या शोधात लोकांचा शहरांकडे ओढा वाढतोय. त्यामुळे भारतात विभक्त राहणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढते आहे.पूर्वी संयुक्त कुटुंबात, आजारपण किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आर्थिक ओझे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे वाटले जात होते. मात्र विभक्त कुटुंबात ही जबाबदारी संपूर्णतः कमावणाऱ्या व्यक्तीवर येते. यामुळे उदरनिर्वाहाचा खर्च एकाच व्यक्तीवर येतो. तसेच वैद्यकीय खर्च सतत वाढत आहेत. कमावणाऱ्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्यावर अवलंबून असणाऱ्या प्रिय व्यक्तींसाठी आयुर्विमा घेणे गरजेचे आहे.
प्रश्न: भविष्यात आयुर्विमा उद्योगाचे भावितव्य काय असेल?
उत्तर :या दशकाच्या अखेर या क्षेत्रातील खाजगी उद्योग 20 वर्षांचे होतील. मात्र, सध्या आयुर्विमा उद्योगाचे एकूण देशांतर्गत उत्पादनातील योगदान 2.7 टक्के आहे. वर्ष 2050 पर्यंत भारतातील 6 मधील 1 व्यक्ती 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल. तसेच वाढत्या जागरूकतेमुळे लोकांचा आयुर्विमा घेण्याकडे नक्की कल वाढेल.