गुंतवणूक क्षेत्रात रस असणाऱ्या व्यक्तींना वॉरन बफे यांची ओळख करून देण्याची गरज नाही. "फॉर्च्युन' मासिकाच्या श्रीमंतांच्या यादीतील ही एकमेव व्यक्ती अशी आहे, की ज्यांनी आपली सर्व संपत्ती गुंतवणुकीतून मिळवली आहे. ते अध्यक्ष असलेल्या बर्क शायर हॅथवे या कंपनीच्या एका शेअरची सध्याची किंमत 3,28,000 डॉलर (2 कोटी 43 लाख रुपये) एवढी आहे. वॉरन बफे लवकरच नव्वदी पार करतील, तर या कंपनीचे उपाध्यक्ष चार्ली मुंगर हे 96 वर्षांचे आहेत. या दोन "चिरतरुणांनी' वेळोवेळी तरुणपिढीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सांगितलेले मंत्र असे -
1) तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक! आपली "पॅशन' काय आहे, ते लवकरात लवकर ओळखा आणि त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान मिळवा आणि ज्ञानात भर घालण्याचे कधीच थांबवू नका.
2) आपल्याला आयुष्यात एकच शरीर आणि मन मिळत असल्याने शरीराचे आणि मनाचे सातत्याने संगोपन करा.
3) आत्मपरीक्षण करून आपल्या वाईट सवयी शोधून काढा. आणि त्यानंतर लवकरात लवकर ताबा मिळवा उदा. अनावश्यक खर्च करणे.
4) आयुष्यात शक्य तितक्या लवकर एखादा चांगला "मेंटॉर' (मार्गदर्शक) मिळवा आणि त्याच्याकडून फक्त घेण्याची वृत्ती न ठेवता त्याला देण्याची ही वृत्ती ठेवा.
5) आपली शक्तिस्थाने आणि मर्यादा नीट ओळखा आणि आपल्या "सर्कल ऑफ कॉम्पिटन्स' (शक्तिस्थानांच्या) बाहेर जाऊ नका.
6) आपल्याला जे काम मनापासून आवडते तेच काम करा आणि स्वतःपेक्षा सक्षम/ श्रेष्ठ व्यक्तींच्याच सहवासात रहा.
7) येणाऱ्या उत्तम संधी कधीही वाया घालवू नका. संधी उत्तम हे कसे ओळखायचे - तर जी संधी तुम्हाला काहीशी अस्वस्थ करते ती संधी उत्तम समजावी.
8) आयुष्यातील मिळालेला वेळ अजिबात वाया घालवू नका; कारण तो तुमचा सर्वात मौल्यवान "ऍसेट' आहे आणि तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी विकत घेता येत नाही.
9) आयुष्यात नावलौकीक कमवायला 20 वर्षे सुद्धा लागू शकतात. परंतु मिळवलेली प्रतिष्ठा 5 मिनिटात ही नष्ट होऊ शकते, हे कधीच विसरू नका.
10) खर्च करताना मनावर ताबा ठेवा आणि क्रेडिट कार्डचा वापर टाळा.
स्वतःच्या 90 अब्ज डॉलर एवढ्या प्रचंड संपत्तीचा बहुतांश हिस्सा, मानवजातीच्या कल्याणासाठी राखून ठेवणाऱ्या या आधुनिक युगातील संतांच्या वरील मार्गदर्शक सूचना केवळ तरुणांनाच नव्हे, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशादर्शक ठरतील.
-----
- अतुल सुळे