गेल्या आठवड्याच्या प्रारंभी अमेरिकी शेअर बाजाराने तेजी दर्शविल्याने; तसेच आपल्या देशातील उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक आठ वर्षांच्या उच्चांकाला पोचल्याने अर्थसंकल्पानंतरच्या पडझडीतून सावरून "सेन्सेक्स'ने जोरदार तेजीने सुरवात केली. यानंतर रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर स्थिर ठेवत असताना, भविष्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याचा पवित्रा दर्शविल्याने गुरुवारीदेखील बाजाराने तेजीचा जोर धरला. एकंदरीत सलग चार दिवस तेजी दर्शविल्यानंतर आठवड्याच्याअखेरीस "सेन्सेक्स' 164 अंशांची किरकोळ घसरण दर्शवून 41,141 अंशांवर, तर "निफ्टी' 39 अंशांनी खाली येऊन 12,098 अंशांवर बंद झाला. आलेखाचा विचार करता, "निफ्टी' जोपर्यंत 11,614 अंशांच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे. मात्र, "निफ्टी'चे फंडामेंटल्स पाहता म्हणजेच "पीई'प्रमाणे (प्राइज अर्निंग रेशो) भारतीय शेअर बाजार महाग झाला आहे. यामुळे आगामी कालावधीत आलेखानुसार तेजीचे संकेत असले, तरी "ट्रेडर्स'नी मर्यादित भांडवलावर मर्यादितच धोका स्वीकारून ट्रेड करणे; तसेच ट्रेडिंग करताना "स्टॉपलॉस'चा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
आलेखानुसार ट्रेंट, आयनॉक्स लेझर, पीआय इंडस्ट्रीज आदी कंपन्यांचे शेअर तेजीचे संकेत देत आहेत. 29 जानेवारीपासून रु. 1595 ते रु. 1471 या "लिमिटेड रेंज'मध्ये चढ-उतार दर्शविल्यानांतर पीआय इंडस्ट्रीज या शेअरने शुक्रवारी रु. 52 ची तेजी दर्शवून रु. 1598 चा बंद भाव दिला. अल्पावधीसाठी म्हणजेच शॉर्ट टर्मसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी काळात बाजाराने; तसेच पीआय इंडस्ट्रीज या शेअरने तेजी दाखविल्यास रु. 1525 चा "स्टॉपलॉस' ठेवून या शेअरची खरेदी करणे योग्य ठरू शकेल. मात्र, वर नमूद केल्यानुसार मर्यादित भांडवलावर मर्यादितच धोका स्वीकारणे गरजेचे आहे. कारण आलेखानुसार "ऑल इज वेल' असले तरी बाजाराचे "पीई' मूल्याकंन महाग आहे. त्यामुळे तेजीचा मनोहर असला तरी कळावे लोभ नसावा!
भूषण गोडबोले
(लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)