गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ म्हणजेच आपण केलेली आर्थिक गुंतवणूक योग्यपणे झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी "सकाळ मनी'ने पुण्यात नुकत्याच आयोजित केलेल्या "पोर्टफोलिओ चेक-अप कॅम्प'ला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला.
नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे पुण्यात पाठोपाठ तिसऱ्यांदा आयोजित केलेल्या या उपक्रमात वेगवेगळ्या वयोगटांतील नागरिक सहभागी झाले होते. त्यात तरुण, महिला, पती-पत्नी इतकेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले. "सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर' (सीएफपी) असलेल्या तज्ज्ञांकडून (मनी डॉक्टर) मार्गदर्शन घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. गुंतवणुकीबाबतचे विविध समज-गैरसमज; तसेच शंकांचे निरसन झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि यानिमित्ताने आपल्या गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच या अभिनव उपक्रमाबद्दल "सकाळ मनी'चे आभार मानले.
या उपक्रमात अंकित सावला, गुरुदत्त अजगावकर, कमल वोरा, जिग्नेश वस्तानी, दर्शन अथा, निनाद लुंकड, आनंद पोफळे, रवींद्र देशमुख, योगेश पिंगळे, हर्षवर्धन भुसारी आणि श्वेता शास्त्री या "सीएफपीं'नी सहभागी होऊन गुंतवणूकदारांना मोलाचे मार्गदर्शन केले.