सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महिना अगोदरच दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या (GPF) व्याजदरात सरकारकडून तब्बल 0.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीसाठी जीपीएफचा व्याजदर 7.6 टक्क्यांहून 8 टक्के करण्यात आला आहे. याचा लाखो सरकारी कर्मचा-यांना फायदा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारनं छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात देखील 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती.
जीपीएफ बद्दल थोडक्यात
जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड. हे असं खातं आहे जे फक्त सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. या खात्यात स्वतःच्या पगारातील ठरावीक रक्कम ठेवून सरकारी कर्मचाऱ्यांना सदस्य बनता येते. हे खातं निश्चित पगार असलेल्या कर्मचा-यांसाठीच असते.
निवृत्तिवेतनाप्रमाणेच या खात्यात जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचा-यांना मिळते. तसेच ही गुंतवलेली रक्कम प्राप्तिकर कायदा 80 सीअंतर्गत येत असल्यानं करातूनही सूट मिळते.
जीपीएफ हे बचत खात्याप्रमाणे काम करते. निश्चित कालावधीसाठी पगारातील ठरावीक रक्कम या खात्यात जमा करता येते. या खात्यातील रक्कम निवृत्तीनंतर दिली जाते. तसेच खातेधारकाला नॉमिनीही निवडता येऊ शकतो. खातेधारकाचं अपघाती निधन झाल्यास नॉमिनीला फायदे मिळतात.
जीपीएफ खात्यामध्ये तुम्हाला जीपीएफ अॅडवान्स हे फीचर मिळतं. यातून बिनव्याजी कर्जस्वरूप रक्कम काढता येते. जीपीएफ खात्यातून काढण्यात आलेल्या रकमेवर कोणताही कर लागत नाही.