भारतीय आता डिजिटल व्यवहार पद्धतीला सरावले आहेत. त्यामुळे ग्राहक आणि ऑनलाइन सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या या दोघांनाही त्याचा फायदा होणार आहे. मात्र त्याचवेळी डिजिटल व्यवहारांमध्ये होणारे "फ्रॉड'देखील वाढत आहेत. त्यामुळे "फ्रॉड'पासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
"एटीएम'द्वारे व्यवहार करताना...
असा होऊ शकतो फ्रॉड : छुपे कॅमेरे किंवा स्कीमर्सच्या मदतीने पिन नंबरची चोरी.
खबरदारी : 1. पिन नंबर टाकताना "की पॅड'वर तुमचा हात झाका.
2. व्यवहार अधिकृत असल्याची खात्री करण्यासाठी बॅंकेत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल नोंदवून ठेवा. जेणेकरून तुमच्या कार्डवरून व्यवहार होताना तुम्हाला "अलर्ट' संदेश मिळेल.
ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना...
असा होऊ शकतो फ्रॉड : ऑनलाइन व्यवहार करताना कार्ड किंवा वैयक्तिक गोपनीय माहिती हॅक होणे.
खबरदारी : 1. वेबसाईट अधिकृत असल्याची म्हणजेच 'URL' हा 'https' आहे का याची खात्री करा. तसेच त्याच्या बाजूला "लॉक आयकॉन'देखील असायला हवा.
2. सायबर कॅफे, नवीन कॉम्प्युटर किंवा मित्रांच्या स्मार्टफोनवरून डिजिटल व्यवहार करणे टाळा.
3. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या "वाय-फाय'चा डिजिटल व्यवहारांसाठी वापर करू नका.
4. कोणत्याही वेबसाईटवर आपले पासवर्ड सेव्ह करून ठेवू नका आणि कायम "व्हर्च्युअल की-बोर्ड'चा वापर करा. ऑटो लॉक पर्यायाचा वापर करा.
5. गॅझेट्ससाठी उत्तम दर्जाचे अँटी-व्हायरस वापरा.
पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिन फ्रॉड
असा होऊ शकतो फ्रॉड : 1. कार्ड क्लोनिंग किंवा पासवर्डची माहिती गोळा करून गैरव्यवहार.
2. ट्रान्झॅक्शन नाकारले गेले आहे असे सांगून दुसऱ्यांदा व्यवहार करायला लावणे.
खबरदारी : 1. डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताना एटीम व्यवहारात सुचविलेल्या सूचनांचे पालन आवश्यक.
2. एटीएम पिन आणि पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.
3. ट्रान्झॅक्शन खरोखर नाकारले गेले आहे किंवा नाही याची खात्री करा.
संजय काऊ, मुख्य व्यवसाय अधिकारी, उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंक