स्मार्टफोन उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या सॅमसंग कंपनीच्या जगातील सर्वात मोठ्या फॅक्टरीचे आज उद्घाटन होणार आहे. नोयडा येथील सेक्टर ८१ मध्ये सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सच्या भव्य कारखान्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि द.कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन याच्या उपस्थितीत होत असून सॅमसंगचा हा जगातील सर्वात मोठा मोबाईल उत्पादन कारखाना आहे. ३५ एकर जागेत तो उभारला गेला असून यात मोबाईल बरोबर फ्रीज, टीव्ही व अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणे बनविली जाणार आहेत. मून जे इन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
दक्षिण कोरियाची सॅमसंग ही २०१६ मध्ये मोबाइल फोन व स्मार्टफोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
सॅमसंगने १९९० च्या दशकात भारतात पहिले इलेक्ट्रोनिक उत्पादन केंद्र सुरु केले होते. १९९७ पासून तेथे टीव्ही बनू लागले. २००५ पासून येथे मोबाईलची निर्मिती केली जाते. गतवर्षी कंपनीने येथे ४९१५ कोटींची गुतंवणूक केली आणि कारखान्याचा विस्तार केला. आता या कारखान्यात मोबाईलचे उत्पादन दुपटीने वाढणार आहे. सध्या कंपनी भारतात ६.७ कोटी मोबाईल तयार करते ते प्रमाण आता १२ कोटी मोबाईलवर जाणार आहे. यामुळे जवळजवळ ७० हजार नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.