मुंबई: म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (ऍम्फी) आकडेवारीनुसार, मार्च 2018 पर्यंत 2.11 कोटी एसआयपी खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी 1.22 कोटी एसआयपी खाती म्हणजेच 58 टक्के एसआयपी पाच वर्षांहून अधिक काळ सक्रिय आहेत. 2017-18 च्या शेवटच्या तिमाहीत एसआयपी खाती 15.91 लाखांनी वाढली आहेत.
परंपरागत गुंतवणुकीच्या साधनांमधून मिळणारा परतावा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. शिवाय म्युच्युअल फंडाबाबत जागरूकता वाढत असल्याने म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा कल वाढत चालला आहे.
युनियन म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प्रदीपकुमार म्हणाले की, "गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडाबाबत उत्सुकता वाढली आहे. पूर्वी अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओबाबत जागरूक नसायचे. फक्त अधिकाधीक परतावा देणाऱ्या आणि जोखीम जास्त असलेल्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवणूक केली जात होती. मात्र अधिक परताव्याच्या लोभामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांच्या पदरी योग्य परतावा मिळत नाही. आता मात्र एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे.''
ऍम्फीच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवण्यात आलेली 38,808 कोटी रुपयांची गुंतवणूक सक्रिय आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये 20,188 कोटींची गुंतवणूक केली आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये आतापर्यंत 1.98 लाख कोटी रुपये गुंतवण्यात आले आहे. ते म्युच्युअल फंड उद्योगाच्या संपूर्ण एयूएमपैकी 9.3 टक्के हिस्सा आहे.
आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये म्युच्युअल फंड उद्योगामध्ये दर महिन्यात सरासरी 9 .70 लाख एसआयपी खाती जोडली गेली आहेत. त्या आधीच्या वर्षात (2016-17) दर महिन्यात सरासरी 6.27 लाख एसआयपी खाती जोडली गेली होती. बहुतेक एसआयपी वितरकांच्यामार्फत करण्यात आल्या आहेत.